तरुण भारत

लोटे कंपनीतील स्फोटात तीन कामगार ठार

वार्ताहर/ लोटे

लोटे औद्योगिक वसाहतीत स्फोटांची मालिकाच सुरू झाली आहे. रविवारी सकाळी 9.20 च्या सुमारास अमित प्रकाश जोशी यांच्या मालकीच्या श्री समर्थ इंजिनिअर्स या कारखान्यात रिऍक्टर प्लॅन्टचे तापमान वाढल्याने मॅन्युअल उडून झालेल्या स्फोटात 3 कामगार जागीच ठार तर 7 कामगार जखमी झाल्याची घटना घडली.

Advertisements

 मंगेश जानकर (22, रा. कासई-खेड), विलास कदम (35, रा. भेलसई-खेड), सचिन तलवार (23, रा. बेळगाव सध्या लोटे) अशी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. तर परवेझ आलम (25, मूळ उत्तरप्रदेश सध्या लोटे), आंsकार साळवी (22, रा. खेर्डी), आनंद जानकर (25, रा. कासई-खेड), रामचंद्र बहुतुले (55, रा. भेलसई-खेड), विश्वास शिंदे (55, रा. घाणेकुंट-खेड), जितेश आखाडे (24, रा. तलारीवाडी लोटे), विलास खरवते (रा. तलारीवाडी-लोटे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

  रविवारी सकाळी पहिल्या पाळीत रिऍक्टर प्लॅन्टमध्ये सॉल्वन डिस्टीलेशनचे काम सुरू होते. या पाळीसाठी 15 कामगार काम करत होते. अचानक रिऍक्टरचे तापमान वाढून झालेल्या स्फोटाने प्लॅन्टला आग लागली. तत्काळ लोटे औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी परब व नवनाथ पारसे यांनी आपले कर्मचारी व दोन अग्निशमन गाडय़ा आणि रूग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. प्लॅन्टमध्ये आगीचे डोंब उसळले होते. फोमच्या सहाय्याने मारा करून दोन ते अडीच तासांच्या दरम्यान आग आटोक्यात आणण्यात आली. चिपळूण व खेड येथील नगरपालिका अग्निशमन दलाच्या गाडय़ाही मदतीला धावून आल्या होत्या.

या भीषण स्फोटात 2 कामगार जागीच गतप्राण झाले, तर गंभीररित्या भाजलेल्या एका कामगारास प्लॅन्टमधून बाहेर काढून रूग्णवाहिकेतून घेऊन जात असतानाच त्याने प्राण सोडला. तसेच अन्य 7 कामगार आगीत पोळून जखमी झाले. जखमींना पर्शुराम रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर बनलेल्या जखमींपैकी तिघांना चिपळूण लाईफ केअर व तिघांना सांगली येथे हलवण्यात आले.

 आवाजाने घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या

&ंघटनास्थळी लोटेचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम अन्य कर्मचाऱयांसह दाखल झाले. जादा बंदोबस्त मागवण्यात आला. सर्व राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थांना कारखान्याजवळ जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. सकाळी घडलेल्या स्फोटाच्या आवाजाने औद्योगिक वसाहतीसह परिसरातील ग्रामस्थही भयभीत झाले होते. स्फोटाच्या प्रचंड आवाजाने परिसरातील नागरी वस्ती व 3 कि.मी.चा परिसर चांगलाच दणाणला. यामध्ये कोणाची घरे व छप्पर हादरले, तर कोणाच्या घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या.

  परिसरातील वीजपुरवठा केला बंद

आगीनंतर कारखान्यातील मटेरियलचे काही ड्रम तत्काळ बाहेर हलवण्यात आले. परिसरातील कारखान्यांचे उत्पादन पोलिसांच्या आवाहनानंतर बंद करण्यात आले. मात्र दीपचंद कंपनी व्यवस्थापनाने उत्पादन बंद न केल्याने त्यास खाकी हिसका दाखवून ते बंद पाडण्यात आले. कंपनीलगतचा महावितरणचा विद्युत रोहित्र आगीमुळे जळाल्याने परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. घरडा केमिकल्स कंपनीचे मुख्य व्यवस्थापक रामकृष्ण कुलकर्णी हे आपल्या फायर सेफ्टी टीमसह आग आटोक्यात आणण्यासाठी मदतीला धावले. तसेच कंपनीची रूग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली.  

 गेल्या महिन्यापासून सुप्रिया लाईफ सायन्समधील स्फोट, पुष्कर कंपनीतील वायूगळती व घरडा कंपनीतील स्फोटांमध्ये 5 कामगार मृत्यू पावल्याची घटना ताजी असताना पुन्हा रविवारी श्री समर्थ इंजिनिअर्समधील स्फोटात 3 कामगार जागीच ठार होऊन सातजण जखमी झाले. लोटे परिसरात स्फोटांची मालिकाच सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

चिपळूण येथील प्रदूषण मंडळाचे क्षेत्रिय अधिकारी अजय चव्हाण हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. तसेच कोल्हापूर येथील औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक जोशी व उपसंचालक खरमल यांना माहिती समजल्यानंतर ते ही दुपारी घटनास्थळी हजर झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जि. प. सदस्य अरूण कदम, लोटे सरपंच चंद्रकांत चाळके, गुणदे सरपंच रवींद्र आंब्रे, एस. के. आंब्रे यांनीही घटनास्थळी भेटी दिल्या.  

Related Stories

सहा मासळी केंद्रांचा प्रस्ताव केंद्रास सादर

Patil_p

वेंगुर्ले-केळूस ग्रामंचायतीच्या सरपंचासह सदस्यांची पदे रद्द करा

NIKHIL_N

तिरुअनंतपूरम-वेरावल एक्सप्रेसच्या डिसेंबरमधील फेऱ्या रद्द

Abhijeet Shinde

भालावल गावात बियाणे पेरणीचे प्रात्याक्षिकासहीत मार्गदर्शन

Ganeshprasad Gogate

नियमाबाबत संभ्रमावस्थेने संचारबंदीचा विसर!

Patil_p

सीआरझेडची ऑनलाईन सुनावणी पूर्ण

NIKHIL_N
error: Content is protected !!