तरुण भारत

एपीएमसीने दिवसातून दोनवेळा लिलाव सुरू करावा

शेतकरीवर्गाची मागणी : भाजी उत्पादकांची मोठी गैरसोय, वेळ वाया जाण्यासह आर्थिक भुर्दंड

वार्ताहर / सांबरा

Advertisements

बेळगाव एपीएमसीमध्ये सध्या सुरू असलेल्या भाजी मार्केटमध्ये केवळ सकाळचा एक वेळच लिलाव करण्यात येत असून सायंकाळचा लिलाव बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भाजी उत्पादक शेतकरीवर्गाची मोठी गैरसोय होत असून एपीएमसीने दिवसातून दोन्ही वेळा लिलाव सुरू करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये सकाळी सहा ते अकरापर्यंत भाजी लिलाव करण्यात येत आहे. यामुळे शेतकरीवर्गाची प्रचंड धावपळ होत असून भाजीपाला भाजी मार्केटपर्यंत पोहोचवेपर्यंत शेतकऱयांच्या नाकीनऊ येत आहे. सायंकाळचा लिलाव बंद करण्यात आल्याने दिवसभर काढलेला भाजीपाला परत घरात किंवा शेतात साठवून ठेवावा लागत आहे. अशाने शेतकऱयांचा वेळ वाया जात आहे व आर्थिक भुर्दंडही बसत आहे. पुन्हा पहाटे तीन वाजता उठून भाजीपाला पोत्यामध्ये किंवा टेमध्ये भरून पहाटे चार वाजता तो मार्केटला पाठवावा लागत आहे. अशाने शेतकऱयांना व टेम्पो चालकांना दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. आज काढलेला भाजीपाला दुसऱया दिवशी भाजी मार्केटमध्ये लिलाव होईपर्यंत शेतकऱयांना देखभाल करावी लागत
आहे.

पूर्वी दोन्ही वेळा लिलाव होत होता. त्यावेळी शेतकरीवर्ग सकाळपासून दुपारपर्यंत भाजीपाला काढून सायंकाळी मार्केटला पाठवत असे. त्यामुळे भाजीपाल्याला योग्य दरही मिळत होता. शेतकऱयाला कामही कमी लागत होते. मात्र, आता एपीएमसीमध्ये सायंकाळचा लिलाव बंद करण्यात आल्याने शेतकऱयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भाजी उत्पादक शेतकऱयांचे खरोखर हित जपायचे असेल तर एपीएमसी व्यवस्थापनाने पूर्वीप्रमाणे दोन्ही वेळेला भाजीपाल्याचा लिलाव सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
लोकप्रतिनिधींनीही आवाज उठवावा

याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींनीही आवाज उठवावा, अशीही मागणी होत आहे. सकाळच्या वेळी होणाऱया लिलावात व्यापारीवर्गाला आदल्या दिवशीचा भाजीपाला मिळत आहे. ताजा भाजीपाला उपलब्ध होत नसल्याने भाजीपाल्याला दरही कमी मिळत आहे.

पिराजी अंतोजी (शेतकरी-बाळेकुंद्री खुर्द)

एपीएमसी भाजी मार्केटमध्ये सायंकाळच्या वेळेचा लिलाव बंद केल्याने आमची मोठी गैरसोय होत आहे. दिवसभर काढलेला भाजीपाला कुठे ठेवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या उन्हाळा वाढला असून उन्हाच्या तडाख्यामुळे भाजी लगेच कोमेजून जात आहे. यामुळे दुसऱया दिवशी सकाळपर्यंत सांभाळून ठेवणे कठीण होत आहे. शेतकरीवर्ग रात्रंदिवस घाम गाळून पिके घेतो. मात्र, अशा जाचक अटी लावण्यात येत असल्याने भाजीपाल्याला दरही मिळेनासा झाला आहे. यासाठी त्याचा विचार करून तातडीने सायंकाळचा लिलावही चालू करावा.

आप्पाण्णा जक्कण्णावर (शेतकरी-बाळेकुंद्री खुर्द)

एपीएमसीत लिलाव बंद झाल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सायंकाळनंतर भाजीपाला काढायचा झाल्यास मजुरांना दिवसभराची मजुरी द्यावी लागते. मात्र, भाजीपाला जास्त काढून होत नाही. काढलेला भाजीपाला दुसऱया दिवशी सकाळपर्यंत ठेवायचा कुठे, हा प्रश्न आहे. त्यासाठी एपीएमसीने तातडीने सायंकाळचा लिलाव सुरू करावा.

Related Stories

सिद्धीविनायक स्पोर्ट्स संघाला अजिंक्यपद

Patil_p

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

Omkar B

मण्णूर येथे घराला आग लागून दोन लाखाचे नुकसान

Patil_p

खानापूरनजीक भीषण अपघातात महिला ठार, दोघे जखमी

Amit Kulkarni

ऑनलाईन लग्नाचा फंडा, घातला लाखाचा गंडा!

Amit Kulkarni

बेंगळूर: ख्रिस्त विद्यापीठाला परीक्षा न घेण्याचा सरकारकडून सल्ला

triratna
error: Content is protected !!