तरुण भारत

माजी मंत्री सोमनाथ जुवारकर यांचे निधन

प्रतिनिधी / पणजी

गोव्याचे माजी सहकारमंत्री व ताळगाव मतदारसंघातून सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आलेले सोमनाथ जुवारकर ऊर्फ भाऊ यांचे बुधवारी पहाटे 1 वा. एका खासगी इस्पितळात कोविड-19 च्या बाधेमुळे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमनाथांच्या निधनाने दुःख व्यक्त केले आहे.

Advertisements

गेले काही दिवस कोविडमुळे आजारी असलेल्या सोमनाथ जुवारकर यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. सोमनाथ जुवारकर यांनी आपली कारकीर्द ताळगावचे सरपंच म्हणून सुरू केलेली. त्य़ानंतर त्यांना काँग्रेसतर्फे ताळगाव मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि 1989 मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. काँग्रेस पक्षात 1990 मध्ये फूट पडली. आठ आमदारांनी लुईस प्रोतो बार्बोझा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षातून बंड केले व मगो पक्षाबरोबर पुलोआ सरकार स्थापन केले गेले. त्यात सोमनाथ जुवारकर हे वीजमंत्री होते. हे सरकार आठ महिन्यांनंतर कोसळले. 1993 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 1996 च्या निवडणुकीत सोमनाथ जुवारकर पुन्हा विजयी झाले आणि हंगामी सभापती बनले.

त्यानंतर ते काही दिवसांतच प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये सहकारमंत्री बनले. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा काँग्रेसच्या उमेदवारीवर ताळगावातून विजयी ठरले. मात्र त्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनलेल्या लुईझीन फालेरो यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने फ्रांसिस्क सार्दिन यांच्या नेतृत्वाखालील 11 काँग्रेस आमदारांनी जे बंड पुकारले त्यात सोमनाथ जुवारकर यांचा समावेश होता. भाजपच्या सहकार्याने स्थापन झालेल्या या सरकारात सोमनाथ जुवारकर हे नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते. इ. स. 2000 मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली आणि रवी नाईक यांच्यासह काँग्रेसचे 8 आमदार फुटून भाजपमध्ये गेले. भाजपने सार्दिन सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सार्दिन सरकार कोसळले व जुवारकरांचे मंत्रीपदही गेले.

इ. स. 2002 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर राज्य विधानसभा बरखास्त केली. मध्यावधी निवडणुकीत सोमनाथ जुवारकर यांचा पराभव बाबुश मोन्सेरात यांनी केला. त्यानंतर जुवारकर यांना पुन्हा राजकारणात सक्रिय होणे शक्य झालेच नाही. गेल्या पाच वर्षांपासून तर ते राजकारणापासून पूर्णपणे अलिप्तच राहिले. संपूर्ण ताळगावात ते ‘भाऊ’ या नावानेच परिचित होते. दानशूर व्यक्तिमत्त्व असलेल्या जुवारकर यांनी अनेक अडलेल्यांना मदत केली होती.

जुवारकर यांना गेले काही दिवस कोविडची बाधा झाली होती व त्यातून त्यांचा आजार वाढतच गेला. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. जुवारकर यांच्या पश्चात पत्नी रेषा, चिरंजीव सोहन व एक कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी जुवारकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Related Stories

चोडणकरसह इतरांनी काँग्रेसचे राजीनामे द्यावेत

Amit Kulkarni

वादग्रस्त अध्यादेश मागे घेतल्याने शॅडो कौन्सिलकडून आनंदोत्सव

Patil_p

सांकवाळ पंचायतीकडून झुआरीनगरातील अतिक्रमणाविरूध्द कारवाई

Amit Kulkarni

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या

tarunbharat

विर्डी सखळीत नवीन 5 रूग्ण, एकूण रूग्णसंख्या 11.

Patil_p

फोंडय़ात 12 हजारांचा गांजा जप्त

Patil_p
error: Content is protected !!