तरुण भारत

पुतिन यांची हुकूमशाही आणि रशियातील असंतोष

रशियात सध्या अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात निदर्शने होत आहेत. विरोधी पक्षनेते अलेक्सी नवालनी यांना तुरुंगात टाकले आहे. गेले 22 दिवस ते अन्न सत्याग्रह करीत आहेत. त्यांचे वजन झपाटय़ाने कमी होत असून त्यांच्या जीवाला कधीही धोका होऊ शकतो. नवालनी यांच्या या स्थितीविषयी अध्यक्ष पुतिन यांना जबाबदार धरून ही निदर्शने सुरू आहेत.
मॉस्को व पिट्सबर्गसह देशाच्या कानाकोपऱयात या निदर्शनात लोक सहभागी होत आहेत. वयाच्या चाळीशीत असलेले नवालनी हे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे सर्वात मोठे विरोधक असून गेल्या जानेवारी महिन्यात कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. राजकीय विरोधामुळे आपल्या विरोधात हे कुभांड रचलेले असून त्यात काडीमात्र तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण या संदर्भात नवालनी यांनी दिले आहे. स्वतःच्या वैद्यकीय पथकास तब्येत तपासण्यास परवानगी नाकारल्याच्या विरोधात 31 मार्चपासून त्यांनी अन्न सत्याग्रह सुरू केला आहे. रशियातील तुरुंगात नवालनी यांच्यावर जाणीवपूर्वक योग्य उपचार झालेले नाहीत, असे बऱयाच रशियन नागरिकांचे त्याचप्रमाणे अनेक देशांचेही म्हणणे आहे. अमेरिकेच्या ज्यो बायडेन यांनीही याला दुजोरा दिला आहे. या साऱया परिस्थितीमुळे पुतिन हे पुन्हा वादग्रस्ततेच्या चक्रात सापडले आहेत.

या संदर्भात पुतिन यांचा इतिहास पाहता असे दिसून येते, की आपल्या दोन दशकाहून अधिक काळाच्या कारकिर्दीत कोणत्याही थराला जाऊन विरोधकांना संपवण्यासाठी ते कुप्रसिद्ध आहेत. साधारणतः 21 वर्षांपूर्वी त्यांना रशियाच्या अध्यक्षपदी पोचविण्यासाठी कारणीभूत ठरलेले, गणितात डॉक्टरेट मिळवलेले, पूर्वाश्रमीचे प्राध्यापक आणि त्यानंतरचे व्यावसायिक बेरेझोव्हस्की यांच्या वाढत्या प्रभावास दूर करण्यासाठी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून त्यांना लंडनमध्ये आश्रय घ्यावयास लावला. पुढे तेथेच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर एका कथित बॉम्बस्फोटाचा बनाव आपल्या अंगलट येण्याच्या शक्मयता दिसू लागताच एक वकील व गुप्तहेर खात्यातील अनुभवी व्यक्तिमत्त्व मिखाईल ट्रेपाश्किन यांचा त्यांनी काटा काढला. आपल्याविरुद्ध भ्रष्टाचाराची प्रकरणे खोदून काढणारे रशियातील एक धडाडीचे पत्रकार आर्टिम बोरोविक यांना कथित अपघातात संपविले. ऍना पोलित्कोव्हस्काया या पुतिनविरोधी महिला पत्रकाराचा मॉस्कोतील त्यांच्या घरीच गोळय़ा झाडून खून करण्यात आला. एकेकाळचे जगज्जेते माजी बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह विरोधात गेल्याने त्यांना प्रचंड त्रास आणि हल्ले करून देशत्याग करण्यास भाग पाडले. अशीच आणखी अनेक उदाहरणे देता येतील. तात्पर्य हे की, पुतिन यांनी रशियात आपणास आणि आपल्या निरंकुश हुकूमशाही सत्तेस कोणीही आव्हान देऊ नये, अशी परिस्थिती क्रूर मार्ग वापरून निर्माण करून ठेवली आहे.

Advertisements

अलेक्सी नवालनी हे विरोधी पक्षनेते. त्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये भ्रष्टाचार विरोधी लढय़ाचा भाग म्हणून आपल्या सहकाऱयांसह सैबेरिया गाठले. या भागातील भ्रष्ट स्थानिक राजकारणी जे पुतिन यांचे समर्थक व पाठीराखे होते, त्यांच्या कारवायांवर प्रकाश टाकणारा एक लघु चित्रपट त्यांनी तयार केला. याच दरम्यान स्थानिक निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुकांत या लघु चित्रपटाने पुतिन विरोधात मुख्य प्रचारकाची भूमिका बजावली. त्याचा प्रचंड प्रभाव मतदारांवर पडला व त्याचा फटका पुतिन यांच्या पक्षास बसला. यानंतर नवालनी मॉस्कोला जाण्यासाठी विमानात बसले. विमानात शुद्ध हरपल्याचे निमित्त होऊन त्यावेळी त्यांना इस्पितळात हलवण्यात आले. इस्पितळाभोवती कडक सुरक्षा लावण्यात आली. मात्र, दिवसेंदिवस नवालनी यांची प्रकृती ढासळत गेल्याने त्यांच्या सहकाऱयांनी व हितचिंतकांनी महत्प्रयासाने नवालनी यांना जर्मनीतील इस्पितळात दाखल केले. सदर इस्पितळात त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट झाले. जर्मन डॉक्टर्सनी योग्य ते उपचार देऊन त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. त्यानंतर जानेवारी महिन्यात ते पुन्हा रशियास परतले. विमानतळावरच त्यांना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आणि आता दुसऱयांदा केवळ वर्षभरातच नवालनी यांच्यावर पुन्हा प्राणघातक वेळ ओढवली आहे.

पुतिन यांनी विरोधकांच्या नष्टचर्याचे जे सत्र आरंभले आहे, त्यावरून त्यांची सत्तालालसा, हुकूमशाही प्रवृत्ती स्पष्ट होत आहे. वास्तविक कम्युनिझम नको, उदारमतवादी लोकशाही रशियात प्रस्थापित होऊन हा देश आधुनिक जगाच्या मुख्य प्रवाहात यायला हवा, अशी आशा दाखवून पुतिन 20 वर्षांपूर्वी सत्तेत आले होते. पण यानंतर आतापर्यंत त्यांचे वर्तन हे निवडणुकात हेराफेरी करून निकाल आपल्या बाजूने फिरवणे, विरोधकांना संपविणे, युनो व इतर देशांना न जुमानणे असे अधोगतीस जाताना दिसते. रशियन जनतेत त्यांच्या विरोधातील असंतोष दिवसेंदिवस बळावत चालला आहे. तथापि, सुरक्षा व्यवस्था आणि सैन्य यावर घट्ट पकड असल्याने पुतिन आतापर्यंत तरी हा असंतोष दडपण्यात यशस्वी झाले आहेत. पुतिन यांना एकचालकानुवर्ती सत्तेची लालसा इतकी आहे, की इ. स. 2036 पर्यंत स्वतःच रशियाच्या अध्यक्षपदी राहण्यासंबंधीचे घटनात्मक सार्वमत आपल्या बाजूने वळवण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. पुतिन सध्या सत्तरीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्या इच्छेप्रमाणे 2036 पर्यंत ते जर राष्ट्राध्यक्षपदी राहिले तर त्यावेळी ते 85 वर्षांचे असतील. त्यांची एकूण मानसिकता पाहिल्यास त्यांच्या हातून जी अपकृत्ये घडली आहेत, त्याचा जाब विचारून आपणास कठोर शासन होण्याची भीतीही त्यांना पछाडून आहे. एका बाजूस सत्तालालसा आणि दुसऱया बाजूस भविष्यकाळाची भीती यामुळे यापुढेही आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत सत्तासूत्रे या ना त्या प्रकारे आपल्या हाती ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

रशियात झारची दीर्घकालीन सत्ता रशियन क्रांतीद्वारे कोसळली. त्यानंतर सत्तर वर्षांहून अधिक काळ असलेली साम्यवादी सत्ताही कोसळली. ही पार्श्वभूमी पाहता दुसरा झार म्हणून संबोधल्या जाणाऱया पुतिन यांचीही सत्ता रशियन जनता कोसळवून तेथे परिवर्तन आणेल, हे जनतेच्या वाढत्या अस्वस्थतेतून स्पष्ट होत आहे.

अनिल आजगावकर, मोबा.9480275418

Related Stories

नारदांनी पत्ता दिला

Patil_p

स्वस्त वीज – नवा अध्याय

Patil_p

सावधान! ओल्ड गोवा बनतेय गोव्याचे चेरापुंजी

Patil_p

कोण्या कर्मे तुज हे दशा

Patil_p

शिक्षण महर्षि – सिंबायोसिसचे शां. ब. मुजुमदार

Patil_p

बारावा गुरु भ्रमर

Patil_p
error: Content is protected !!