तरुण भारत

अश्विन, झाम्पा, रिचर्डसनची आयपीएलमधून माघार

अहमदाबाद/ वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियन गोलंदाज ऍडम झाम्पा, केन रिचर्डसन, तसेच अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांनी उर्वरित आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. यापैकी, ऍडम झाम्पा व केन रिचर्डसन हे आरसीबीचे तर अश्विन दिल्ली कॅपिटल्स संघाचे सदस्य आहेत.

Advertisements

‘झाम्पा व रिचर्डसन हे आमच्या संघातील सदस्य वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतत आहेत आणि उर्वरित आयपीएल हंगामात ते खेळू शकणार नाहीत. आरसीबीचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो’, असे आरसीबी प्रँचायझीने पत्रकाद्वारे नमूद केले. आरसीबीने लेगस्पिनर झाम्पाला 1.5 कोटी रुपये तर रिचर्डसनला 4 कोटी रुपये मोजत करारबद्ध केले होते.

रिचर्डसन यापूर्वी आरसीबीतर्फे राजस्थान रॉयल्सविरुद्ध लढतीत सहभागी झाला. तेथे 3 षटकात 29 धावात 1 बळी, असे त्याचे पृथक्करण राहिले. झाम्पाला मात्र पहिल्या सामन्यात खेळता आले नव्हते. आरसीबी संघात ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्तियन, डॅनिएल सॅम्स असे आणखी 3 ऑस्ट्रेलियन खेळाडू असून त्यांनी मात्र प्रशिक्षक सायमन कॅटिच यांच्यासह आरसीबी संघात कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आरसीबीचा संघ 5 सामन्यात 4 विजयांसह गुणतालिकेत तिसऱया स्थानी आहे. आयपीएल स्पर्धेत सध्या 14 ऑस्ट्रेलियन खेळाडू विविध प्रँचायझींकडून प्रतिनिधीत्व करत आले असून यात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय, रिकी पाँटिंग व कॅटिच हे प्रशिक्षक तसेच समालोचक मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकल स्लेटर, लिसा स्थळेकर हे ऑस्ट्रेलियन देखील आयपीएल स्पर्धेशी संलग्न आहेत.

भारतातील कोरोनाच्या उद्रेकामुळे आमचे अनेक ऑस्ट्रेलियन सहकारी चिंतेत आहेत. ऑस्ट्रेलियात परतता येईल की नाही, याचीही खात्री नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात, यानंतरही ही स्पर्धा निर्धोकपणे पूर्ण व्हावी, अशी आमची इच्छा आहे.

-केकेआरचे ऑस्ट्रेलियन मार्गदर्शक डेव्हिड हसी

आम्ही सर्व पदाधिकारी, खेळाडू, साहायक पथकातील सर्व सदस्य येथील बायो-बबलमध्ये अतिशय सुरक्षित वातावरणात आहोत. पण, बाहेरील स्थिती मात्र भयावह आहे. आम्ही सर्व ब्रेकफास्टसाठी एकत्र आलो, त्यावेळी मी आमच्या संघातील स्थानिक खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांविषयी चौकशी केली.

-दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग

कुटुंबातील व्यक्ती कोरोनाग्रस्त झाल्याने अश्विनची माघार

चेन्नई ः माझे कुटुंबिय कोरोनाविरुद्ध लढत आहेत आणि आता माझे पाठबळ त्यांच्या पाठीशी असेल. परिस्थितीत वेळीच सुधारणा झाल्यास मी दिल्ली कॅपिटल्स संघात परतू शकेन, असे ट्वीट करत 34 वर्षीय अश्विनने आयपीएल स्पर्धेतून आपण ब्रेक घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. रविवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना पूर्ण झाल्यानंतर काही वेळेत त्याने हे ट्वीट केले होते. अश्विनच्या कुटुंबातील निकटची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सध्या संकेत आहेत.

दिल्ली कॅपिटल्सने अश्विनच्या निर्णयाचा आपल्याला आदर असल्याचे नमूद केले आहे. अश्विन हा यंदाच्या लीगमधून कोरोनामुळे माघार घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

ऍन्डय़्रू टायचा देखील आयपीएलला अलविदा

नवी दिल्ली ः राजस्थान रॉयल्स संघातील आणखी एक ऑस्ट्रेलियन खेळाडू ऍन्डय़्रू टायने देखील यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली असून यामुळे राजस्थानच्या ताफ्यातील आणखी एक विदेशी खेळाडू कमी झाला आहे. या प्रँचायझीतील बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर हे अव्वल खेळाडू दुखापतीमुळे बाहेर फेकले गेले तर लियाम लिव्हिंगस्टोनने बायो-बबलला कंटाळून आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले.

यादरम्यान, एकाच वेळी चार खेळाडू बाहेर गेल्याने राजस्थान रॉयल्सचा संघ स्पर्धेत सहभागी अन्य संघांकडून काही खेळाडू लोनवर घेणार असून यासाठी त्यांनी आयोजकांना विनंती केली आहे. आयपीएलच्या नियमानुसार, हंगामात दोनपेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूंना लोनवर देता येईल. मात्र, असे खेळाडू आपल्या मूळ संघाविरोधात खेळू शकत नाहीत. रॉयल्सने आतापर्यंत 5 सामन्यात 2 विजय नोंदवले असून त्यांचा पुढील सामना गुरुवारी दिल्लीविरुद्ध होणार आहे.

Related Stories

केकेआरने जिंकले ‘लो स्कोअरिंग एन्काऊंटर’

Patil_p

भुवनेश्वर कुमारला पितृशोक

Amit Kulkarni

दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्स विजयपथावर

Amit Kulkarni

झेक प्रजासत्ताकचा स्कॉटलंडला झटका

Patil_p

द.आफ्रिका 29 धावांनी आघाडीवर, डुसेन, मार्करमची अर्धशतके

Amit Kulkarni

सलामी लढतीत ‘त्या’ खेळाडूंच्या उपलब्धतेबद्दल साशंकता कायम

Patil_p
error: Content is protected !!