तरुण भारत

कोरोनाचे तांडव : तब्बल 30 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोना रुग्णाला खाट मिळणे झाले मुश्किल : गेल्या चोविस तासात नव्याने 2321 जणांना लागण,लोक शिस्त पाळत नसल्याने वाढतोय कोरोना फैलाव

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गोव्यात कोरोना बळींनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी 38 जणांचे प्राण गेल्यामुळे राज्यात आता मृत्यूचे तांडव सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. आता लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे समोर येत असून तशी मागणी जोर धरू लागली आहे. दिवसा सर्व व्यवहार चालू ठेवून व फक्त रात्री संचारबंदी लागून काहीच निष्पन्न होणार नाही तर शेजारील महाराष्ट्र, कर्नाटक राज्याप्रमाणे लॉकडाऊन करावेच लागेल नाहीतर कोरोनाचा संसर्ग, बळी वाढत जाऊन माणसे मरत राहातील अशी भिती जनतेमध्ये व्यक्त होत आहे.

चालू एप्रिल महिन्यात 1 ते 26 एप्रिल या काळात कोरोनामुळे 224 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या वर्षापासून आतापर्यंत मिळून एकूण 1055 जणांचे बळी गेले असून मागील वर्षापेक्षा या वर्षीचा हा मृत्यूदर जास्त आहे आणि तो 40 टक्याच्या वर गेला आहे.

कोरोना रुग्णाला खाट मिळणे झाले मुश्किल

गेल्या 24 तासात गोमेकॉत 23 जणांनी तर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात 9 जणांनी जीव गमावला आहे. प्रत्येक तासाला एक किंवा त्यापेक्षा जास्त बळी अशी त्याची सरासरी येत आहे. बळी जाणाऱयांमध्ये सर्व वयोगटातील कोरोना रुग्णांचा समावेश असून आता तर राज्यातील इस्पितळात कोरोना रुग्णांसाठी खाट मिळणे देखील मुश्कील होऊन बसले आहे.

चोविस तासात नव्याने 2321 जणांना लागण

कोरोना बळींच्या उच्चांकाप्रमाणे गेल्या 24 तासातील नवीन रुग्णांच्या संख्येने देखील उच्चांक प्रस्थापित केला असून 2321 जणांना लागण झाली आहे तर 712 जण बरे होऊन घरी परतले आहेत. सक्रीय कोरोना रुग्णांनी 15000  चा पल्ला पार केला असून तो आकडा 15260 वर पोहोचला आहे. संशयित रुग्ण म्हणून 178 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 632 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. गोवा राज्यात विविध मार्गाने आलेल्या 30 प्रवाशांना, पर्यटकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा संसर्गबळी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे स्पष्ट होत आहे.

गोव्यात गेल्यावर्षीपासून आतापर्यंत मिळून एकूण कोरोना रुग्णांचा आकडा  79798 एवढा झाला आहे. त्यातील 63483 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

 विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

 डिचोली 424, सांखळी 428, पेडणे 363, वाळपई 243, म्हापसा 878, पणजी 968, हळदोणे 292, बेतकी 155, कांदोळी 1380, कासारवर्णे 94, कोलवाळ 273, खोर्ली 309, चिंबल 529, शिवोली 500, पर्वरी 1273, मये 144, कुडचडे 258, काणकोण 253, मडगाव 1418, वास्को 745, बाळ्ळी 265, कासावली 511, चिंचणी 193, मडगाव आरोग्य केंद्रातील रुग्णसंख्या 1418 वर पोहोचली असून ती 1500 पल्ल्याकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे.

पणजी आरोग्य केंद्राची रुग्णसंख्या 968 झाली असून वाढता कल पाहिल्यास ती 1000 चा पल्ला गाठणार अशी चिन्हे आहेत. कांदोळी आरोग्य केंद्रातील रुग्ण संख्या 1380 नोंदवण्यात आली असून  शिवोली आरोग्य केंद्राने 500 चा आकडा गाठला आहे. पर्वरी आरोग्य केंद्रात 1273 रुग्णांची नेंद झाली असून म्हापसा, कुठ्ठाळी व फोंडा येथील आरोग्य केंद्रानी कोरोना रुग्णांचा 800 चा पल्ला पार केला आहे. येथे अनुक्रमे 878, 890 व 863 रुग्णांची नोंद आहे. कुठ्ठाळी 890, कुडतरी 208, लोटली 253, मडकई 176, केपे 172, सांगे 111, शिरोडा 195, धारबांदोडा 234, फोंडा 863, नावेली 233, सर्वच आरोग्य केंद्रातील कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत असून बरे होण्याचे प्रमाण घसरत आहे.

महाराष्ट्र, कर्नाटकप्रमाणे गोव्यातही लॉकडाऊन गरजेचे – आरोग्यमंत्री

गोव्यातील कोरोना बळींचे वाढती संख्या पाहता राज्यात त्वरित लॉकडाऊनची गरज असून ते करण्याची मागणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही शेजारील राज्यांच्या धर्तीवर गोवा राज्यातही ठराविक काळासाठी लॉकडाऊन हवे असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या आपल्या मागणीला पाठिंबा देतील अशी आशा त्यांनी प्रकट केली आहे.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांनी शाळेत येऊ नये

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने पुढील आदेशापर्यंत शाळेत येवू नये असा फतवा शिक्षण खात्याने जारी केला आहे. कोरोना संसर्ग, बळी यांच्या वाढत्या प्रकोपामुळे खात्याने हा निर्णय घेतला असून तसा आदेश शिक्षण खाते संचालक डी. आर. भगत यांनी काढला आहे.

लॉकडाऊन हा पर्याय नाहीच : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले स्पष्ट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोना आपत्ती व्यवस्थापनाची उच्चस्तरीय तातडीची बैठक काल सोमवारी घेतली. सायंकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी लॉकडाऊन हा पर्याय नसून तो करणार नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले. लग्न व इतर मोठय़ा गर्दीच्या समारंभांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, कोरोनामुळे 38 मृत्यू पावले हे दुःखदायक आहे. कोरोनाची दुसरी लाट धोकादायक असून सर्वांनी त्यापासून सावध राहणे गरजेचे आहे. अनेकजण अगदी शेवटच्या क्षणी हॉस्पिटलात येतात. काहीजण आधीच मृत झालेले असतात तर अनेकजण हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर 24 तासात मृत होतात म्हणून मृतांचा आकडा वाढत आहे. लोकांनी कोरोनाची लक्षणे दिसताच वेळ न घालवता तपासणी करुन घ्यावी आणि उपचार सुरु करावेत, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

खाटा वाढवणार, औषधांचा पुरेसा साठा

खाटांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. ते मिळतील अशी व्यवस्था करण्यात येत असून उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलचा दुसरा मजला कोरोना रुग्णांसाठी तयार केला जाणार आहे. शिवाय फोंडा, ईएसआय व दक्षिण गोवा या तिन्ही इस्पितळात खाटांची संख्या आणखी वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. गोव्यातील सरकारी इस्पितळात ऑक्सिजन, रेमडेसवीर व इतर औषधांचा पुरेसा साठा असल्याचा दावा त्यांनी केला.

लॉकडाऊन परवडणारे नाही

कोरोनाचे वाढणारे बळी कमी करण्याचे सर्व ते प्रयत्न सरकारतर्फे करण्यात येत असून लोकांचे जीव वाचविण्यासाठी आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊन केले तर सर्व बंद करावे लागणार आणि ते सध्या परवडणारे नाही. गोव्यात मोठय़ा संख्येने औषध कंपन्या आहेत. त्या बंद होतील व औषध निर्मितीवर परिणाम होईल. आरोग्य, पोलीस व इतर महत्त्वाची खाती तसेच सरकारी कार्यालये चालू राहायला हवीत. सर्व जर बंद केले तर कामे करायची कोणी? असा प्रश्न उपस्थित केला.

मार्केटात भाजी आहे, ग्राहक नाहीत!

कर्नाटकात शनिवार आणि रविवार अचानक लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने  गोव्याला भाजीचा पुरवठा झाला नाही. परंतु याचा परिणाम पणजी बाजारपेठेत अंशतः दिसून आला.भाजी भरपूर आहे, पण ग्राहक नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे.

 आज मंगळवारपासून कर्नाटकात दोन आठवडय़ांचा लॉकडाऊन कर्नाटक सरकारने जाहीर केला आहे. तसेच अत्यावश्यक सेवांनाही मुभा देण्यात आली असली तरी याचा परिणाम गोव्याच्या भाजी बाजारपेठेवर कितपत होतो हे सांगणे कठीण आहे.

सध्या बाजारपेठेत भाजीमाल असला तरी ग्राहक नसल्याने व्यापारीवर्ग चिंतेत आहेत. शनिवारी व रविवारी कर्नाटकात लॉकडाऊन झाले तरी त्याचा परिणाम पणजी बाजारपेठेवर दिसून आला नाही. कारण ग्राहकच नसल्यामुळे भाजीची जास्त प्रमाणात मागणी झाली नाही. याशिवाय कोरोनामुळे महाराष्ट्र, कर्नाटकात व इतर राज्यात निर्बंध असल्यामुळे गोव्यात पर्यटकांचीही संख्या कमी झाली आहे. त्यामुळे स्थानिक ग्राहकांबरोबर पर्यटकही बाजारपेठेत फिरकत नसल्याने भाजी व फळवाल्यांचा व्यवसाय नुकसानीत जात असल्याचे एका पणजी बाजारपेठेतील भाजी विक्रेत्याने सांगितले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बाजारात स्थानिक भाज्या मुबलक प्रमाणात येत आहेत. काही भाजी विक्रेत्या महिलांकडे स्थानिक भाजीचे दर चढे आहेत. सोमवारी फलोत्पादन महामंडळाची दालने बंद होती. परंतु आज मंगळवारी फलोत्पादन महामंडळाची दालने खुली राहणार आहेत.

ग्राहक कमी असल्यामुळे भाज्यांचे दरही उतरले आहेत. सध्या पणजी बाजारपेठेत कांदा 25 रूपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. टॉमेटो 25 रूपये किलो, बटाटे 30 रूपये किलो, कारली 40 रूपये किलो, वांगी 30रूपये प्रतिकिलो, काकडी, भेंडी, 40 रूपये प्रतिकिलो, हिरवी मिरची 60 रूपये किलो, बीट 30 रूपये किलो, कोबी 20 रूपये, फ्लॉवर 30रूपयाला एक, सिमला मिरची50 रूपये किलो, चिटकी 40 रूपये, लसूण 160 रूपये, आले 80 रूपये, गाजर 40 रूपये, वालपापडी 70 रूपये किलो, कोथिंबीर 20 रूपये जुडी या दराने भाजी विकली जात आहे.

कर्नाटकात दोन आठवडय़ांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असले तरी अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आल्याने त्याचा परिणाम गोव्याच्या बाजारपेठेवर होण्याची शक्यता कमी आहे. सध्या पणजी बाजारपेठेत तुटवडा नाही. दररोज कर्नाटकातून पणजी बाजारपेठेत 20 ते 25 टन भाजीपाला येतो अशी माहिती पणजी मार्केट समितीचे शेखर डेगवेकर यांनी दिली.

Related Stories

संकटावर मात करण्यासाठी सर्व रेती व्यवसायिकांनी एकत्र यावे

Patil_p

फाळकेंनी भारतीय चित्रपटक्षेत्रात आत्मनिर्भरता आणली

Amit Kulkarni

विरोधकांचा सभागृहात प्रचंड गदारोळ

Amit Kulkarni

शेवटी ‘108’ ने घातला खो…

Patil_p

तृणमूलशी युती? कदापी नाही!

Amit Kulkarni

कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!