तरुण भारत

जगात काय चाललंय

सोशल मीडियावर तुम्ही एखादे मत मांडले आणि ते एखाद्या गटाला पसंत पडले नाही तर त्या गटाचे गुंड तुमच्यावर श्लील-अश्लील भाषेत टीकेचा भडिमार करतात. तुम्हाला सळो की पळो करून सोडतात. हे आता जुने झाले, यात नवीन काय असे तुम्ही विचाराल. पण मीच तुम्हाला काही प्रश्न विचारतो. कारण माझ्या मनात बऱयाच शंका आहेत.

दूर युरोप आणि अमेरिकेत कोरोनाच्या साथीचा मुकाबला कसा करीत असतील लोक आणि तिथली सरकारे आणि तिथले राजकीय पक्ष? माझ्या मनात कुतूहल आहे. मी विदेशी वृत्तपत्रे वाचत नाही. मला इंटरनेटचे ज्ञान नाही. म्हणून विचारतोय.

Advertisements

उदाहरणार्थ अमेरिकेत बायडन अध्यक्ष आहेत. पण एखाद्या स्टेटमध्ये ट्रम्पच्या पक्षाचे मतदार आहेत तर त्या स्टेटच्या लोकांना वेळेवर लस, ते कुठले इंजेक्शन, प्राणवायू वगैरे वेळेवर मिळत असेल का?

त्यांच्याकडे अमुक पक्षाचे मतदार असलेल्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर विरोधी पक्षाचे लोक आरडाओरडा करत असतील काय?

आपल्यावर राज्य करून गेलेल्या इंग्लंडसारख्या देशात काय चालले असेल? त्यांचे नेते परस्परांवर ढकलाढकलीचा खेळ खेळत आहेत का? एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडली तर विरोधक सरकारचा राजीनामा वगैरे मागत आहेत का?

त्यांच्याकडचे नेते लोकांना कोरोनावर मात करण्यासाठी बोगस औषधांची शिफारस करीत असतील काय?

तिथली जनता आम्ही आमच्याच जातीच्या डॉक्टरकडून कोरोनावर उपचार करून घेऊ, आमच्याच धर्मातील व्यक्तीने तयार केलेली औषधे घेऊ, आमच्याच पोटजातीतील व्यक्तीने दिलेला प्लाझ्मा स्वीकारू असा आग्रह धरते का? घरात बसल्याबसल्या व्हॉट्स अपवर ऐकीव बातम्या, ऐकीव उपचाराच्या पोस्ट्स फॉरवर्ड करते का? तिथली जनता विरोधी मताच्या कार्यकर्त्याचे किंवा नेत्याचे कोरोनामुळे निधन झाल्यावर आनंदोत्सव साजरा करते का?

कोरोना काळातही त्यांच्याकडे मोठमोठे गर्दी करणारे उत्सव, निवडणुकांच्या भव्य सभा होतात का? लोक आणि नेते बेदरकारपणे मास्क किंवा सोशल डिस्टन्सचे नियम धाब्यावर बसवतात का?

त्यांच्याकडचे वर्तमानपत्रवाले, टीव्हीवाले परिस्थितीचे भान ठेवत आहेत का? सरकारच्या रोषाची पर्वा न करता खऱया बातम्या देत आहेत का? की लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सवंग बातम्या, नाचगाण्यांचे कार्यक्रम दाखवतात?

खूप प्रश्न आहेत. कोण उत्तर देईल?

Related Stories

पुन्हा समूह संसर्गाची चर्चा

Patil_p

मोले वीज प्रकल्पाला न्यायालयाचा ‘शॉक’

Omkar B

डिप्रेशन..

Patil_p

वर्दी

Patil_p

मल्ल्याचे प्रत्यार्पण निश्चित

Patil_p

अनुरूप जाणोनि पूर्वींच वरिलां

Omkar B
error: Content is protected !!