तरुण भारत

भारताच्या साहाय्यासाठी अमेरिकेची धडक मोहीम

लसींच्या उत्पादनासाठी कच्चा माल, व्हेंटिलेटर्स व इतर आवश्यक साधने पुरविणार

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

प्रारंभी मागेपुढे पाहणाऱया अमेरिकेने आता भारताला कोरोनाकाळात साहाय्यासाठी धडक मोहीम हाती घेतल्याचे दिसत आहे. सामग्री पुरवठय़ातील सर्व प्रशासकीय अडथळे त्वरेने दूर केले जात असून काही दिवसांमध्येच भारतापर्यंत साहाय्य पोहचू लागेल, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अमेरिकेचा संरक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि मानवसंसाधन विभाग वेगाने आणि एकत्रितरित्या भारताला साहाय्य करण्यासाठी कार्य करीत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताच्या आवश्यकता पडताळण्यास प्रारंभ केला असून हे उत्तरदायित्व अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय संबंध संस्थेवर टाकण्यात आले आहे. भारताच्या आवश्यकता लक्षात घेऊन योग्य ती सामग्री लवकरच पाठविण्यात येत आहे. यासाठी सर्व प्रशासकीय विभागांना नियम शिथील करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती अमेरिकेच्या प्रशासनाच्या अधिकाऱयांनी दिली आहे.

कोणते साहाय्य करणार…

अमेरिकेची आंतरराष्ट्रीय संबंध संस्था भारताच्या विविध प्रशासकीय अधिकाऱयांच्या संपर्कात असून त्यांच्याकडून सामग्रीची आवश्यकता समजून घेतली जात आहे. यात लसींसाठी लागणारा कच्चा माल प्रमुख आहे. प्रारंभी अमेरिकेने ‘प्रथम अमेरिका’ या धोरणानुसार हा कच्चा माल पुरविण्यास असमर्थता दर्शविली होती. तथापि, भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेच्या अधिकाऱयांशी यशस्वी चर्चा केली आणि अमेरिकेने आता निर्णय बदलला आहे.

कच्चा माल पुरविणार

लसींच्या मोठय़ा प्रमाणावर उत्पादनासाठी काही प्रकारची पायाभूत सामग्री अमेरिकेकडून भारत आयात करतो. ही सामग्री आता भारताला पुरविली जाणार आहे. त्यामुळे भारतात लसींचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होऊन देशाची आवश्यकता भागणार आहे. भारताला किमान 250 कोटी लस डोसांची आवश्यकता लागणार आहे. आतापर्यंत 15 कोटी लोकांच्या लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा डोस चार कोटी लोकांनी घेतला आहे. अमेरिकेने कच्चा माल पुरविण्यावरची बंधने दूर केल्याने भारताची मोठी सोय होणार आहे.

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स

भारतात कोरोनाचा नवा विषाणू थैमान घालत आहे. या नव्या रुपातील विषाणूमुळे रुग्णांच्या शरीरातील प्राणवायू झपाटय़ाने संपतो, असे दिसून आले आहे. त्यामुळे देशात प्राणवायूच्या मागणीत अचानक चौपट वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये प्राणवायूची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी अमेरिका पुढे सरसावली असून अमेरिकेच्या उत्पादक कंपन्यांना त्वरित प्राणवायूचे टँकर्स जहाजावर चढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताला मोठय़ा प्रमाणात वाहतूकयोग्य (पोर्टेबल) व्हेंटिलेटर्स पाठविले जात आहेत.

जगातच कच्च्या मालाची टंचाई

लसींसाठी लागणाऱया कच्च्या मालाची जगातच टंचाई आहे. भारताला मोठय़ा प्रमाणात लसीकरण करावे लागणार आहे. तरीही अमेरिका आपल्या ऑर्डर्स भारताकडे वळवित आहे. भारताला शक्य तितक्या प्रमाणात कच्चा माल पुरविण्यास अमेरिका नेहमीच प्रयत्नशील राहील, असे एका वरीष्ठ अधिकाऱयाने स्पष्ट केले.

खऱया मित्राला नेहमीच पाठिंबा

भारत अमेरिकेचा खरा मित्र असून आपल्या जवळचा स्नेही संकटात असताना अमेरिका त्याला साहाय्य करण्यात मागे राहणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष  बायडन यांच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनीही हीच भूमिका घेतली असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले. 

Related Stories

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी पक्ष न सोडण्यावर ठाम; म्हणाल्या…

Abhijeet Shinde

मणिपूरमध्ये उग्रवाद्यांच्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू

Patil_p

पत्नीने धोका देताच अन्य महिलांचा काढला काटा

Patil_p

लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के !

Rohan_P

पबजी मोबाईल गेमचे लवकरच पुनरागमन

Patil_p

सीएए लागू होऊ देणार नाही!

Patil_p
error: Content is protected !!