तरुण भारत

विदेशी खेळाडूंच्या ‘रिटर्न जर्नी’साठी बीसीसीआय पुढाकार घेणार

नवी दिल्ली-मेलबर्न / वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलमध्ये खेळत असलेल्या विदेशी खेळाडूंसाठी, विशेषतः ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी खास संदेश जारी करत खेळाडूंना मायदेशी सुरक्षित पोहोचवण्याकरिता आपण पुढाकार घेणार असल्याचे अभिवचन दिले आहे. सध्या कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला असल्याने अनेक देशांनी भारतातील फ्लाईट्सवर बंदी लादली आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने स्पर्धेतील विदेशी खेळाडूंना संबोधले.

Advertisements

ऑस्ट्रेलियाने भारतातून होणारी विमानसेवा 15 मे पर्यंत बंद केली असून आपल्याच देशातून सक्तीने बाहेर रहावे लागू नये, यासाठी ऍन्डय़्रू टायने लवकर रवाना होणे पसंत केले तर केन रिचर्डसन, ऍडम झाम्पा यांनी आरसीबीचे बायो-बबल सोडले असून ते मंगळवारी रात्री उशिराच्या फ्लाईटने मायदेशी रवाना होणार होते.

‘सर्व विदेशी खेळाडू अगदी सुरक्षितपणे आपापल्या मायदेशी पोहोचतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी आमची असेल. बीसीसीआयचे परिस्थितीवर बारीक लक्ष असून स्पर्धा संपल्यानंतर विदेशी खेळाडूंना मायदेशी पोहोचवण्यासाठी आम्ही केंद्रस्तरीय अधिकाऱयांच्या संपर्कात आहोत. अर्थात, अगदी स्पर्धा पूर्ण होईतोवर देखील सर्व खेळाडू बायो-बबलमध्ये सुरक्षितच असणार आहेत’, असे बीसीसीआयचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हेमांग अमिन यांनी नमूद केले.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा मदतीस स्पष्ट नकार

मुंबई इंडियन्स संघातील ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लिनने ही स्पर्धा संपल्यानंतर आयपीएलमध्ये खेळत असलेल्या सर्व संघसहकाऱयांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चार्टर्ड फ्लाईटची सोय करावी, अशी विनंती केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आयपीएल कराराच्या माध्यमातून 10 टक्के उत्पन्न मिळते. त्याचा काही भाग या फ्लाईटवर खर्च करावा, असे त्याचे मत होते. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सर्व खेळाडूंनी आपल्या परतीच्या प्रवासाची सोय स्वतःच करावी असे स्पष्ट केले तर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी प्रशासकीय स्तरावरुन कोणतीही मदत केली जाणार नाही, असा कडक पवित्रा जाहीर केला.

‘सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू स्वतःच्या जबाबदारीवर रवाना झाले आहेत. हा त्यांचा खासगी दौरा आहे. हा ऑस्ट्रेलियन संघाचा दौरा अजिबात नाही. आतापर्यंत त्यांची सोय त्यांच्या प्रँचायजीतर्फे झाली आहे. याच पद्धतीने त्यांनी मायदेशी परतणे रास्त ठरेल’, असे मॉरिसन यांनी ‘द गार्डियन’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

झाम्पा, रिचर्डसन रात्री उशिरा रवाना होणार

मुंबई ः ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऍडम झाम्पा व केन रिचर्डसन हे मंगळवारी रात्री उशिरा दोहामार्गे मायदेशी रवाना होणार होते. हे दोन्ही क्रिकेटपटू मुंबईत थांबले तर त्यांच्या आरसीबी प्रँचायझीतील सहकारी अहमदाबादला रवाना झाले होते. झाम्पा व रिचर्डसन या दोघांनीही वैयक्तिक कारणास्तव आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे.

सध्या आयपीएलमध्ये 14 ऑस्ट्रेलियन खेळाडू समाविष्ट असून त्यात स्टीव्ह स्मिथ (दिल्ली कॅपिटल्स), डेव्हिड वॉर्नर (सनरायजर्स हैदराबाद), पॅट कमिन्स (केकेआर) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. रिकी पाँटिंग (दिल्ली कॅपिटल्स) व सायमन कॅटिच (आरसीबी) हे ऑस्ट्रेलियन माजी खेळाडू प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाताळत आहेत तर मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, लिसा स्थळेकर स्पर्धेच्या समालोचक पथकात समाविष्ट आहेत. यंदाची आयपीएल स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना 6 केंद्रांवर खेळवली जात आहे.

कोटस

लॉकडाऊनमध्ये स्पर्धा कशा यशस्वीपणे भरवल्या जाव्यात, याचा उत्तम आदर्श फुटबॉलमध्ये बुंदेस्लिगा व प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून घालून दिला गेला आहे आणि त्याच धर्तीवर आयपीएल स्पर्धेची वाटचाल सुरु आहे. सर्वप्रथम न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात रग्बी झाली. बाहेरील जनजीवन विस्कळीत होत नसेल तर अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात काहीच गैर नाही.

-केकेआरचा इंग्लिशमन कर्णधार इयॉन मॉर्गन

सोशल मीडियाच्या माध्यमातून कमिन्सवर कौतुकाचा वर्षाव

जागतिक कसोटी मानांकन यादीतील अव्वल मानांकित गोलंदाज व केकेआर प्रँचायझीतील स्पीडस्टार पॅट कमिन्सने पंतप्रधान सहायता निधीकडे आपण 50 हजार डॉलर्सची मदत सुपूर्द करणार असल्याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. अनेक आजी-माजी खेळाडूंनी कमिन्सच्या पुढाकाराचे स्वागत केले. भारतातील हॉस्पिटल्सकरिता ऑक्सिजन खरेदीसाठी तो ही रक्कम सुपूर्द करणार आहे. एकीकडे, त्याचे काही ऑस्ट्रेलियन सहकारी ही स्पर्धा सोडून मायदेशी रवाना होण्याच्या प्रयत्नात असताना त्याने मदत जाहीर करत अन्य खेळाडूंनाही पुढाकार घेण्याचे आवाहन केल्याने त्याचा संदेश अनेकांनी रि-ट्वीट केला.

Related Stories

पाकच्या अलीम दार यांचा पंचगिरीत नवा विक्रम

Patil_p

आशिया ऑलिम्पिक मंडळाच्या अध्यक्षपदी रणधीर सिंग

Patil_p

सिडनी कसोटीत धुराचा व्यत्यय शक्य

Patil_p

वर्ल्डकप रद्द झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल होईल

Patil_p

ऑस्ट्रेलियातील क्रिकेट क्लबच्या प्रशिक्षकपदी सनथ जयसूर्या

Patil_p

प्रशिक्षक निवड प्रक्रिया लवकरच

Patil_p
error: Content is protected !!