तरुण भारत

चाचणीनंतर लगेचच मिळणार औषधोपचार

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

कोविड चाचणीसाठी येणाऱया व्यक्तीच्या अहवालाची वाट न पाहता त्याच्यावर औषधोपचार सुरू करण्यात येणार आहेत. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमावलीत बदल करण्यात आला आहे. याचबरोबर प्रवाशांना कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट देणार नाही. प्रवाशांनी शासकीय पायाभूत सुविधांवर जास्त ओझे न घालता, कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्रासाठी खासगी रूग्णालयात जावे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.

सध्या चाचणीसाठी आरोग्यकेंद्रावर मोठय़ा प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून येते. आरोग्य केंद्रावर ताण पडू नये यासाठी वेगळे केंद्र फक्त कोविड चाचणीसाठी तयार करण्यात येणार आहे. घर विलगीकरणासाठीही नवीन एसओपी जारी करण्यात आल्या आहेत. चाचणी केलेल्यांना अहवाल मिळेपर्यंत घरीच स्वतंत्र खोलीत राहणे आवश्यक आहे. घरातील सदस्यांच्या संपर्कात न येण्याच्या तसेच संपूर्ण कुटुंबाने मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. चाचणी क्षमताही येत्या काही दिवसात वाढविण्यात येणार आहेत, अशी माहिती राणे यांनी यावेळी दिली.

कोविड बळींची वाढती संख्या पाहता बरेचजण रूग्णालयात बऱयाच उशीराने दाखल होतात. त्यामुळे लोकांनी उशीरापर्यंत वाट न पाहता लगेच रूग्णालयात दाखल व्हावे. याचबरोबर सरकारने लवकर चाचणी व्हावी यासाठी थायरोकेअरसोबत हातमिळवणी केली आहे. ज्यामुळे चाचणीचे अहवाल लगेच मिळू शकतात. याशिवाय सध्या ट्रीपल म्युटंट स्ट्रेन बंगालमध्ये आढळला असून याविषयी गोमंतकीयांनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोविड चाचणीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रांच्या कमतरतेमुळे राज्यात बऱयाच नमुन्यांच्या चाचण्या होऊ शकल्या नाहीत. मात्र आवश्यक सुविधा वाढविल्यानंतर आता चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. याशिवाय आता गोव्यासाठी कोविडचा कुठला स्ट्रेन आहे तो कळण्यासाठी नवीन यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उपचार लगेच मिळाला तर गंभीर रुग्णसंख्या कमी

केंद्रावर चाचणीसाठी येणारे हे दोन प्रकारचे असतात. लक्षणविरहीत आणि लक्षणे आढळून आलेले. यांच्याकरिता औषधे व एक घर विलगीकरण मार्गदर्शक तत्त्वांचे पत्रक देण्यात येणार आहे. लक्षणे नसलेल्यांनी चाचणी झाल्यानंतर ताप खोकला आला तर देण्यात आलेली औषधे सुरू करावीत आणि ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यांनी ही औषधे लगेच सुरू करावीत. उपचार लवकर मिळाला तर गंभीर स्थितीत रूग्णालयात दाखल होणाऱयांची संख्या कमी होऊ शकते. उद्यापासून सदर कीट देण्यात येणार असल्याचे गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी यावेळी सांगितले.

18 वर्षांवरील लसीकरणाला उशीर होणार

राज्यात 1 मे रोजी 18 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण मोहीम होणार नसून उशिरा होण्याची शक्यता आहे. गोवा सरकारला लसी सिरम कंपनीकडून खरेदी करावी लागणार आहे. सरकारने सीरम कंपनीकडे पाच लाख लसींची ऑर्डर दिली आहे. परंतु सिरम इन्स्टिटय़ूट गोव्याला सध्या लस देऊ शकत नाहीत कारण त्यांना भारत सरकारसोबत करण्यात आलेली कमिटमेंट पूर्ण करायची आहे. जेव्हा स्टॉक उपलब्ध होईल तेव्हा लस गोव्यात उपलब्ध होईल. अशी आशा आहे की 1 मेपूर्वी सदर कंपनी गोव्याला लस देण्यास तयारी दर्शवेल. लस उपलब्ध झाली तर 45 वर्षाखालील व्यक्तींचे लसीकरण सुरू करता येईल. 18 ते 45 वयोगटातील लोकांना लसी देण्याच्या मार्गदर्शक सूचना 30 एप्रिलला केंद्रामार्फत कळविण्यात येतील अशी माहिती आरोग्य सेवा संचालक डॉ. जोस डिसा यांनी यावेळी दिली.

लॉकडाऊनबाबत यु टर्न

सोमवारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाढत्या कोरोनावर राज्यात लॉकडाऊनची गरज असल्याची मागणी केली होती. परंतु मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लॉकडाऊनबाबत यु टर्न घेतला. मी बोललेल्या लॉकडाऊनविषयी चुकीचे अर्थ काढण्यात येत असून लॉकडाऊन करणे म्हणजे पूर्ण राज्य बंद करण्याबाबत मी म्हटले नसून जे चाचणी न करता कोरोनाचे सुपरस्प्रेडर बनत आहेत त्यांच्यावर निर्बंध येणे. तसेच काही हालचालींवर निर्बंध येणे आवश्यक आहे. हे सांगणे त्यामागचा उद्देश होता. जर पंधरा वीस दिवसात ही स्थिती नियंत्रणात आणली नाहीतर परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ शकते असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Related Stories

पेडणे मतदारसंघातुन स्थानीक उमेदवार राजन कोरगावकर यांनाच उमेदवारी द्या ,धारगळमधील जेष्ठ भाजप कार्यकर्त्यांची पत्रकार परिषदेतून मागणी

Omkar B

मान्यताप्राप्त ऑडीटरकडून डेअरीचे ऑडीट व्हावे-सभासदांचा तगादा

Amit Kulkarni

कोकण मराठी परिषदेचे शेकोटी संमेलन 8, 9 रोजी

Amit Kulkarni

पुण्यातून निघालेल्या गोमंतकीय माता-पुत्रास कोल्हापुरात रोखले

Omkar B

डय़ुरँड स्पर्धेत मोहम्मेडन उपान्त्यपूर्व फेरीत

Patil_p

प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!