तरुण भारत

तिसरा गुरु आकाश

अध्याय सातवा

अवधूत आनंदाने विभोर होत आपल्याच मस्तीत निघाले असता त्यांची आणि यदुराजाची गाठ पडली. हे एवढे स्वस्थ कसे राहू शकतात याबद्दल त्याला आश्चर्य वाटले. त्यांची पाद्यपूजा करून राजाने त्यांचा यथोचित सत्कार केला आणि आदराने त्यांच्या स्वस्थचित्ताचे कारण विचारले. त्यावर अवधूत म्हणाले, राजा, तुझी सत्शील वर्तणूक व आदरभाव याने मी प्रभावित झालो आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. राजाच्या विनंतीला अनुसरून अवधूत त्यांच्या परमशांतीचे रहस्य राजापुढे उलगडत आहेत. ते रहस्य उलगडताना अवधूत त्यांच्या प्रमुख चोवीस गुरुंबद्दल यदुराजाला माहिती देत आहेत. प्रत्येकाकडून त्यांनी एक एक गुण घेत ते परिपूर्ण योगी बनल्याचे त्यांनी सांगितले. पृथ्वीकडून सहनशीलता, पर्वताकडून सर्वस्व द्यायची वृत्ती, वृक्षाकडून संपूर्ण पराधीन असल्याचे कटू सत्य स्वीकारण्याची तयारी, वायूकडून समानता तसेच अलिप्तता आदि गुण त्यांनी घेतले.

Advertisements

आकाशाला त्यांनी तिसरा गुरु मानले आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले,  ‘आकाश सर्व वस्तुविषयी समभाव ठेवणारे आहे ते असंग, अभेद्य, निर्मळ आहे म्हणून मी त्याला गुरु केले. त्याचे कोणाशीही वैर नसते. योग्यानेही असेच वागले पाहिजे. आकाश जसे सर्वव्यापी असते तसे योग्याने सर्वत्र असावे. आकाशाला कोणीही अपाय करू शकत नाही तसेच योग्याला शीत उष्ण याचा काहीही फरक पडत नाही. त्याला शस्त्राचा घावही काही करू शकत नाही. आकाश डोहात बुडालेले दिसते पण पाण्याने कधीही ओले होत नाही. त्याप्रमाणे योगीही अलिप्त असतो. आकाशाला चिखल माखण्याचा प्रयत्न केला तर तो माखणाऱयालाच लागतो तसे योग्याला दोष देणाऱयाचा प्रयत्न करणाऱयाला स्वतःलाच दोष लागतो. आकाश सर्वात असूनही संसर्गाने मलीन होत नाही. त्याप्रमाणे योगी कधी कर्मठपणे मलीन होत नाही. आकाशाची कधीही मोट बांधता येत नाही, त्याप्रमाणे योग्याला कधीही कर्माने बांधता येत नाही. आकाश पृथ्वीवरील धुळीने मलीन होत नाही, जलाने भिजत नाही, अग्नीने जळत नाही किंवा ढगांनी झाकोळून जाते पण लिप्त होत नाही. आपल्या जागेवर जसेच्या तसे असते.’

 पुढे नाथ महाराज म्हणतात, ‘काळाचे सामर्थ्य फार महान असते. काळ देहाला जरा मरण देतो. पण आकाश जसे सर्वदृष्टय़ा अलिप्त असते, त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही तशीच योग्याची मनःस्थिती असल्याने योगी काळावर मात करतो. काळावर मात म्हणजे त्याच्या शरीराला जराही मरणाचा स्पर्श होत नाही. म्हणून योगी काळाचाही काळ म्हणजे महाकाळ आहे. यामुळेच योगी कालातीत होऊन अनेक वर्षे तपश्चर्या करू शकतात.’

 नाथांनी सांगितलेले आकाशाचे महत्त्व म्हणजे पर्यायाने योग्याचे महत्त्व विशेष चिंतनीय आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपली मनःशांती बिघडवण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. असा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा आपण आकाश आणि योगी यांची आठवण ठेवली पाहिजे.

Related Stories

हरवलेली पिढी

Patil_p

प्रभारींचे पांघरुण, तरीही अवस्था दारुण!

Amit Kulkarni

अरे, प्रायव्हसी, प्रायव्हसी

Patil_p

नक्षलींना तडाखा

Patil_p

नारायण अवतार 2

Patil_p

उद्योगपतींची कोरोनावर अशीही मात

Patil_p
error: Content is protected !!