तरुण भारत

सलग पाचव्या विजयासह चेन्नई ठरले ‘सुपरकिंग्स’!

आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादला 7 गडी राखून नमवले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

ऋतुराज गायकवाड (44 चेंडूत 75) व फॅफ डय़ू प्लेसिस (38 चेंडूत 56) यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्ससाठी हैदराबादचे 172 धावांचे आव्हान देखील बरेच तोकडे पडले आणि धोनीच्या नेतृत्वाखालील या संघाने आयपीएल साखळी सामन्यात 7 गडी राखून सहज विजय संपादन केला. प्रारंभी, हैदराबादने 20 षटकात 3 बाद 171 धावा केल्या तर प्रत्युत्तरात चेन्नईने 18.3 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यात 173 धावा जमवल्या. या सलग पाचव्या विजयासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी झेपावला आहे.

फॅफ डय़ू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड या चेन्नईच्या सलामीवीरांनी 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 13 षटकात 129 धावांची दमदार भागीदारी साकारली आणि इथेच चेन्नईच्या विजयाची भक्कम पायाभरणी झाली. या दोघांनीही खलील अहमद व संदीप शर्माच्या गोलंदाजीवर आक्रमक सुरुवात केली. मध्यमगती गोलंदाजांना यश लाभत नसल्याने वॉर्नरने सुचित व सिद्धार्थ कौलकडे चेंडू सोपवला. मात्र, यातील कोणतीही चाल फळली नाही.

हैदराबादला पहिले यश मिळवण्यासाठी अगदी 13 व्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. ऋतुराज गायकवाड येथे रशीदच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. फॅफ डय़ू प्लेसिसने या सामन्यातही उत्तम फटकेबाजी केली. मागील सामन्यात विश्रांती दिल्या गेलेल्या मोईन अलीने येथे 8 चेंडूत जलद 15 धावा केल्या. नंतर रविंद्र जडेजा (6 चेंडूत नाबाद 7) व सुरेश रैना (15 चेंडूत नाबाद 17) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. हैदराबादतर्पे केवळ रशीद खानने किफायतशीर गोलंदाजी करत 36 धावात 3 बळी घेतले.

मनीष, वॉर्नरची अर्धशतके

तत्पूर्वी, मनीष पांडे (46 चेंडूत 61) व डेव्हिड वॉर्नर (55 चेंडूत 57) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने 20 षटकात 3 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली. मनीष पांडेच्या खेळीत 5 चौकार, 1 षटकार तर वॉर्नरच्या खेळीत 3 चौकार, 2 षटकारांचा समावेश राहिला. चेन्नईतर्फे लुंगी एन्गिडीने 35 धावात 2 तर सॅम करणने 31 धावात 1 बळी घेतला.

सनरायजर्स हैदराबादने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, जॉनी बेअरस्टो (7) स्वस्तात गारद झाल्याने त्यांची खराब सुरुवात झाली होती. अष्टपैलू सॅम करणने डावातील चौथ्या षटकात बेअरस्टोला दीपक चहरकडे झेल देणे भाग पाडले. चहरने स्क्वेअरिश लाँगलेगवरुन आपल्या डावीकडे धावत हा झेल पूर्ण केला. डावखुऱया वॉर्नर व मनीष पांडे यांनी मात्र नंतर खराब चेंडूंचा समाचार घेण्याचा सिलसिला सुरु करत काही लक्षवेधी चौकार फटकावले.

या उभयतांनी एकेरी-दुहेरी धावा घेण्यातही कसर सोडली नव्हती. मनीष पांडेने नंतर मोईन अलीला उत्तुंग षटकार फटकावत आपले आक्रमक इरादे दाखवून दिले.  वॉर्नरच्या खेळीत एरवीची स्फोटकता नव्हती. पण, तरीही धावफलक हलता ठेवण्यावर त्याने भर दिला. एकदा स्थिर झाल्यानंतर त्याने जडेजाला देखील षटकारासाठी पिटाळून लावले. जडेजा व मोईन अली या दोन्ही फिरकी गोलंदाजांना वॉर्नर-पांडेला रोखण्यात यश येत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर धोनीने पुन्हा एकदा जलद गोलंदाजांना पाचारण केले. अखेर 18 व्या षटकात लुंगी एन्गिडीने डावखुऱया वॉर्नरला बाद करत ही जोडी फोडली.

वॉर्नरला मोठे फटके मारण्यात अपयश येत होते. ती कोंडी फोडण्यासाठी त्याने एन्गिडीचा वाईड यॉर्कर फटकावण्याचा प्रयत्न केला. पण, जडेजाने स्वीपर कव्हरवर सोपा झेल टिपत वॉर्नरची अर्धशतकी खेळी संपुष्टात आणली. वॉर्नर बाद झाल्यानंतर मनीष पांडे देखील फार काळ टिकून राहू शकला नाही. वाईड लाँगऑनवरील प्लेसिसने डाईव्ह मारत त्याचा अप्रतिम झेल टिपला. अंतिम टप्प्यात विल्यम्सनची फटकेबाजी हे हैदराबादच्या डावाचे आणखी एक वैशिष्टय़ ठरले. विल्यम्सनने 10 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारांसह नाबाद 26 धावा फटकावल्या. केदार जाधवने 4 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 12 धावांचे योगदान दिले.

या लढतीसाठी हैदराबादने अभिषेक शर्मा, विराट सिंग यांच्याऐवजी मनीष पांडे व संदीप शर्मा यांना संधी दिली तर चेन्नईने देखील दोन बदल करत ब्रेव्हो व ताहीर यांच्याऐवजी लुंगी व मोईन अली यांना संघात स्थान दिले.

धावफलक

सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर झे. जडेजा, गो. एन्गिडी 57 (55 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), जॉनी बेअरस्टो झे. चहर, गो. सॅम करण 7 (5 चेंडूत 1 चौकार), मनीष पांडे झे. प्लेसिस, गो. एन्गिडी 61 (46 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), केन विल्यम्सन नाबाद 26 (10 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), केदार जाधव नाबाद 12 (4 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 8. एकूण 20 षटकात 3 बाद 171.

गडी बाद होण्याचा क्रम

1-22 (जॉनी बेअरस्टो, 3.2), 2-128 (वॉर्नर, 17.1), 3-134 (मनीष पांडे, 17.5).

गोलंदाजी

दीपक चहर 3-0-21-0, सॅम करण 4-0-30-1, शार्दुल ठाकुर 4-0-44-0, मोईन अली 2-0-16-0, लुंगी एन्गिडी 4-0-35-2, रविंद्र जडेजा 3-0-23-0.

चेन्नई सुपरकिंग्स ः ऋतुराज गायकवाड त्रि. गो. रशीद खान 75 (44 चेंडूत 12 चौकार), फॅफ डय़ू प्लेसिस पायचीत गो. रशीद खान 56 (38 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), मोईन अली झे. जाधव, गो. रशीद 15 (8 चेंडूत 3 चौकार), रविंद्र जडेजा नाबाद 7 (6 चेंडूत 1 चौकार), सुरेश रैना नाबाद 17 (15 चेंडूत 3 चौकार). अवांतर 3. एकूण 18.3 षटकात 3 बाद 173.

गडी बाद होण्याचा क्रम

1-129 (ऋतुराज, 12.6), 2-148 (मोईन, 14.5), 3-148 (प्लेसिस, 14.6)

गोलंदाजी

संदीप शर्मा 3.3-0-24-0, खलील अहमद 4-0-36-0, सिद्धार्थ कौल 4-0-32-0, जगदीश सुचित 3-0-45-0, रशीद खान 4-0-36-3.

चेन्नईचे 3 फलंदाज बाद, तिघेही रशीदचे बळी, तरीही…

चेन्नई सुपरकिंग्सच्या या डावात 3 फलंदाज बाद झाले आणि हे तिन्ही बळी सनरायजर्स हैदराबादचा अफगाणी अव्वल फिरकी गोलंदाज रशीद खाननेच टिपले. त्याने या सामन्यात 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 36 धावात 3 बळी असे पृथक्करण नोंदवले. यापैकी, आपल्या शेवटच्या षटकात तर त्याने मोईन अली व प्लेसिस यांना लागोपाठ चेंडूंवर बाद केले होते. पण, मुळातच, चेन्नईच्या सलामीवीरांनी विजयाची भक्कम पायाभरणी केली असल्याने प्रतिस्पर्ध्यांचा विजय ही येथे निव्वळ औपचारिकता होती.

Related Stories

अमेरिकन गोलंदाज अली खान अबु धाबीत दाखल

Patil_p

भव्यदिव्य मोटेरा स्टेडियमची 10 वैशिष्टय़े

Patil_p

फातोडर्य़ात आज एफसी गोवा, ब्लास्टर्स यांना विजयाची प्रतीक्षा

Patil_p

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताची साफ निराशा

Patil_p

एकमेव कसोटीवर बांगलादेशचे वर्चस्व

tarunbharat

शिखर धवनचे मुंबईत आगमन

Amit Kulkarni
error: Content is protected !!