तरुण भारत

आसाममध्ये ‘दादा’, प. बंगालमध्ये दीदी ?

तामिळनाडू, पुदुच्चेरीत सत्तांतर, केरळमध्ये डावेच : एक्झिट पोलचे अंदाज जाहीर : अधिकृत निकाल रविवारी जाहीर होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्ये, तर पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश, तसेच बेळगावसह लोकसभेच्या पोटनिवडणुका आणि काही राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुका यासंदर्भातील मतदानोत्तर चाचण्यांचा निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आला आहे. आसाम, तामिळनाडू आणि केरळ ही राज्ये आणि पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश यांच्या संभाव्य परिणामांसंबंधी विविध संस्थांच्या निष्कर्षांमध्ये समानता दिसून येते. मात्र, सर्वात महत्वाचे राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये दोलायमान स्थिती असल्याचे स्पष्ट होत आहे.

आसाममध्ये भाजप आणि रालोआ पुन्हा सत्ता मिळविणार यावर बव्हंशी एकमत या निष्कर्षांमधून व्यक्त करण्यात आहे. तसेच केरळ आपली 40 वर्षांची परंपरा मोडून डाव्यांच्या हाती सलग दुसऱयांदा सत्ता सोपविणार यावर देखील विविध संस्थांच्या निष्कर्षांमध्ये समानता आहे. मात्र पश्चिम बंगालच्या संदर्भात या निष्कर्षांमध्ये मोठे अंतर पहावयास मिळत आहे. सीव्होटरच्या अनुमानानुसार या राज्यात तृणमूल काँगेस पुन्हा सत्तेवर येणार पण भाजपच्या जागा मोठय़ा प्रमाणात वाढून तो प्रबळ विरोधी पक्ष बनणार आहे. तथापि, जन की बात या संस्थेने या राज्यात भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असे अनुमान व्यक्त केले असून सीएनएक्स या संस्थेने भाजपला 143 जागा मिळतील व तो सर्वात मोठा पक्ष होईल, असा निष्कर्ष काढला आहे. यामुळे या राज्यातील निवडणुकीचे संभाव्य परिणाम अधिकच उत्कंठावर्धक होणार आहेत, असे मत विविध अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांकडून ‘एक्झिट पोल’ अंदाज जाहीर करण्यात आले. पश्चिम बंगालसह तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीमधील अंदाज व्यक्त करण्यात आले. पश्चिम बंगालमधील अंदाजांनुसार तृणमूल काँग्रेस आणि भाजपला ‘फिफ्टी-फिफ्टी’ संधी असल्याचे दिसत आहे. एबीपी-सी वोटरनी तृणमूलच्या 294 पैकी 158 आणि भाजपाला 115 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. दुसरीकडे, रिपब्लिक-सीएनएक्सने मात्र याउलट अंदाज वर्तवले आहेत. तृणमूल काँग्रेसला 128-138 (सरासरी 133) जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला असून भाजप आघाडीच्या खात्यात 138-148 (सरासरी 143) जागा निघताना दिसत आहेत. प. बंगालमध्ये 294 पैकी 292 जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. दोन ठिकाणी उमेदवारांच्या मृत्यूमुळे मतदान घेण्यात आलेले नाही.

तामिळनाडूत द्रमुक-काँग्रेसला संधी

तामिळनाडूमध्ये 234 जागांपैकी बहुमतासाठी 118 जागांवर विजय मिळविण्याची आवश्यकता आहे. ‘न्यूज 24-टुडेज चाणक्य’च्या अंदाजानुसार येथे द्रमुक-काँग्रेस आघाडीला 175 तर अद्रमुक-भाजपला युतीला 57 जागांवर समाधान मानावे लागेल असे दिसते. तर रिपब्लिक-सीएनएक्सने जाहीर केलेला अंदाज जवळपास तसाच असून द्रमुक-काँग्रेसला 165 तर अद्रमुक-भाजपला 63 जागा मिळतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

केरळमध्ये पुन्हा सत्ताधाऱयांकडेच सूत्रे

केरळमध्ये एलडीएफ आघाडीची सत्ता कायम राहण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. रिपब्लिक-सीएनएक्सच्या अंदाजानुसार एलडीएफला 76 तर युडीएफला 61 जागा मिळतील. न्यूज24-चाणक्यनेही तसेच कल दर्शवले असले तरी डाव्या आघाडीला 140 पैकी 102 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला. तर युडीएफला केवळ 35 जागा मिळतील असेही त्यांनी म्हटले आहे. उपरोक्त दोन्ही संस्थांनी भाजपला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज वर्तवला आहे.

आसाममध्ये सोनोवाल यांनाच पुन्हा संधी

आसाममध्ये भाजपची सत्ता अबाधित राहणार असल्याचा दावा केला जात आहे. इंडिया टुडे-ऍक्सिसने भाजपला 78 तर काँग्रेसला 45 जागा मिळतील असे म्हटले आहे. तर सी-व्होटर भाजपला 65 आणि काँग्रेसला 59 जागांचा अंदाज वर्तवला आहे. न्यूज24 आणि चाणक्यने एकत्रितपणे एक्झिट पोल अंदाज वर्तवताना भाजपला 70 तर काँग्रेसला 55 जागा मिळतील असे म्हटले आहे. येथे भाजप-काँग्रेसमध्ये अधिक जागांचे अंतर नसले तरी विद्यमान मुख्यमंत्री सोनोवाल यांना सत्ता राखण्यात यश मिळणार असल्याचा दावा व्यक्त करण्यात आला आहे.

पुदुच्चेरीबाबत मत-मतांतरे

पुदुच्चेरीसंदर्भात दोन संस्थांनी अंदाज वर्तवले असून त्यांचे अंदाज पूर्णपणे भिन्न दिसून येत आहेत. सी-वोटरच्या अंदाजानुसार 21 जागा काँग्रेस-द्रमुक आघाडीला  दाखविण्यात आल्या आहेत. तर, रिपब्लिक-सीएनएक्सने भाजप आघाडीला सर्वाधिक 18 जागा मिळतील असे भाकित वर्तवले आहे. तसेच काँग्रेस-द्रमुकला 12 जागा मिळू शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

दारूवर 70 टक्के ‘स्पेशल कोरोना टॅक्स’

datta jadhav

सद्यस्थितीत बूस्टर डोसची गरज नाही !

Amit Kulkarni

उत्तराखंड : 22 जूनपर्यंत वाढला कोरोना कर्फ्यू; ‘या’ तीन जिल्ह्यांसाठी सुरू केली चारधाम यात्रा

Rohan_P

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार संकटात

tarunbharat

भारत-चीनची लष्करी पातळीवरील चार तासांची चर्चा निष्फळ

datta jadhav

कोरोनाबाधित ‘लाखा’पार!

Patil_p
error: Content is protected !!