तरुण भारत

वास्को शहर व परीसरात लॉकडाऊनला पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद, शहरात तुरळक वर्दळ

प्रतिनिधी / वास्को

वास्को शहर व परीसरात लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी व्यापारी व नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार जीवनावश्यक वगळता सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे शहरात फार कमी वर्दळ होती.

Advertisements

लॉकडाऊनला पहिल्या दिवशी लोकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. वास्को शहर व परीसरातील बहुतेक व्यवहार बंद राहिले. खासगी कार्यालयेही बंद राहिली.  सार्वजनिक खासगी बस सेवा व इतर प्रवासी सेवाही बंद होत्या. शहरातील भाजी मार्केट पूर्णपणे खुले होते. मासळी मार्केटही खुले होते. परंतु या दोन्ही मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ फारच कमी होती. शहर परीसरातील हॉटेल्स पार्सल देण्या पुरतीच खुली होती. फार्मसी व इतर वैद्यकीय सेवा खुली होती. किराणा दुकानेही खुली होती. मात्र, या दुकांनांवर फारशी गर्दी नव्हती. इतर सर्व व्यवहार बंद राहिल्याने वास्को शहरात काही प्रमाणात मोकळे वातावरण होते. वाहतुकीची वर्दळही फार कमी होती. सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसारच हा लॉकडाऊन पाळण्यात आला. प्रवासी वाहतुक वगळता अत्यावश्यक सेवा खुल्या ठेवण्यात आल्याने लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागरिकांची फारशी गैरसोय झाली नाही. मात्र, वाढत्या कोरोना प्रसाराचा धसका लोकांनी घेतलेला असून लोकांकडून कडक लॉकडाऊनची आवश्यकता व्यक्त होत आहे.

मुरगाव तालुक्यात 3178 कोरोना बाधीत

दरम्यान, वास्को शहरासह सबंध मुरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रसार गंभीर स्थितीत आलेला आहे. मुरगाव तालुक्यात शुक्रवार संध्याकाळपर्यंत 3178 कोरोना बाधीतांची नोंद झाली होती. त्यात वास्को शहर आरोग्य केंद्रात 800, कुठ्ठाळी प्राथमीक आरोग्य केंद्रात 1492 तर कासांवलीच्या आरोग्य केंद्रात 886 कोरोना बाधीतांची नोंद झालेली आहे. मुरगाव तालुक्यात कोरोना रूग्णांनी 3 हजारांचा आकडा पार केलेला असला तरी या तालुक्यात अद्याप कोविड उपचार हॉस्पिटल किंवा कोविड सेवा केंद्र उपलब्ध करण्यात आलेले नाही. गेल्या वर्षी हेडलॅण्ड सडय़ावरील एमपीटीच्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेवा केंद्र उघडण्यात आले होते. सध्या मुरगाव तालुक्यातील कोरोना बाधीतांना घरीच कॉरन्टाईन व्हावे लागत आहे. साधी किंवा गंभीर लक्षणे दिसून येत असलेल्या रूग्णालाच दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येते.

चिखलीतील गर्दीची दखल, लसीकरण रवींद्र भवनात होणार

वास्को चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये सध्या कोविड चाचणी आणि कोविड प्रतिबंधक लसीकरणासाटी दिवसा शेकडो लोकांची गर्दी पडत आहे. शिवाय बाहय़ रूग्ण विभाग आणि कॅझ्युअलटीमध्येही दिवसा शेकडो रूग्ण येत असतात. त्यामुळे या हॉस्पिटलमध्य गोंधळ उडत आहे. तालुक्यातील वाढते कोरोना रूग्ण आणि चिखलीच्या हॉस्पिटलमध्ये उडू लागलेली गर्दी या परिस्थितीची दखल प्रशासनानेही घेतली आहे. शुक्रवारी स्थानिक आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या उपस्थितीत वास्को शहर व मुरगाव तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीविषयी शासकीय अधिकाऱयांची बैठक झाली. वाढत्या कोरोनाच्या सद्यस्थितीविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई तसेच चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलचे प्रमुख आरोग्याधिकारी डॉ. अनिल हुम्रसकर व इतर वैद्यकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत चिखली उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये होणारे लसीकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इथे होणारे लसीकरण आता वास्को बायणा येथील रवींद्र भवनात होणार आहे. रवींद्र भवनात गेल्या महिनाभरापासून लसीकरण सुरू असून आता लसीकरणाची सर्व व्यवस्था याच ठिकाणी करण्यात येणार आहे. सोमवारपासून रवींद्र भवनातच लसीकरण होईल. स्थानिक आमदार कार्लुस आल्मेदा यांनी लसीकरणाचे रवींद्र भवनात स्थलांतर करून चिखलीत रूग्णावर उपचारांसाठी कोविड हॉस्पिटल बनवण्यावर या बैठकीत भर दिला.

चिखलीचे उपजिल्हा हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल होणार

वास्कोसह संबंध मुरगाव तालुक्यात कोविड रूग्णांवर उपचारांसाठी सुविधा नसल्याने ही व्यवस्था आता चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलचा अद्याप पूर्ण वापर झालेला नाही. या हॉस्पिटलमध्ये कोविड उपचारांसाठी साठ खाटां उपलब्ध होऊ शकतात. मात्र, प्रारंभी 30 खाटा कोविड रूग्णांवर उपचारांसाठी उपलब्ध करण्याचे ठरले आहे. त्यामुळे रूग्णांचा मडगावपर्यंतचा प्रवास व त्यासाठी लागणाऱया रूग्णवाहिकेचीही गरज पडणार नाही. येत्या सोमवारपासून चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचे प्रयत्न जारी ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत आमदार कार्लुस आल्मेदा यांनी रूग्णांच्या सेवेसाठी खासगी रूग्णवाहिकांची मदत घेण्याची सुचना केली आहे. हेडलॅण्ड सडय़ावरील एमपीटीच्या हॉस्पिटलची कोरोना बाधीतांच्या सेवेसाठी पुन्हा पाहणी करण्यात आलेली आहे. मात्र, त्याच्या वापराबाबत आरोग्य खात्याने अद्याप निश्चित निर्णय घेतलेला नाही.

Related Stories

गोव्यात ऑक्सिजनअभावी 21 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav

युतीसाठी काँग्रेसची तीन पक्षांकडे बोलणी

Amit Kulkarni

समुद्रातील तापमान वाढीस ग्रीनहाऊस वायू कारणीभूत

Amit Kulkarni

मडगाव परिसरातील दीड दिवसांच्या गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन

Omkar B

स्व. मनोहर पर्रीकरांच्या कल्पनेतील राज्यात बंधारे बांधण्याचे नियोजन झाले तर म्हादई आमच्यापुढे मोठी समस्या नाही- माजी मंत्री दयानंद मांद्रेकर

Omkar B

वेर्णात धावत्या कारवर वृक्ष कोसळून वेर्णातील कंपनीचे अधिकारी ठार

Omkar B
error: Content is protected !!