तरुण भारत

ब्लॉकबस्टर फिनिश! पोलार्ड जिंकला!

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध रोमांचक विजय

दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

तगडय़ा बांध्याच्या केरॉन पोलार्डने अवघ्या 34 चेंडूतच नाबाद 87 धावांची सनसनाटी खेळी साकारल्यानंतर मुंबई इंडियन्सने येथील ब्लॉकबस्टर आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सच्या भरभक्कम आव्हानाचा अक्षरशः पालापाचोळा केला. प्रारंभी अम्बाती रायुडूच्या 28 चेंडूतील 72 धावांच्या तडाख्यामुळे चेन्नईने 20 षटकात 4 बाद 218 धावांचा डोंगर रचला. पण, प्रत्युत्तरात पोलार्डचा झंझावात अवतरला आणि मुंबईने 20 षटकात 6 बाद 219 धावांसह रोमांचक विजय प्राप्त केला. आयपीएल इतिहासातील हा दुसऱया क्रमांकाचा सर्वात यशस्वी पाठलाग आहे.

219 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना क्विन्टॉन डी कॉक (38) व रोहित शर्मा (35) यांनी 7.4 षटकातच 71 धावांची जोरदार सलामी दिली. त्यानंतर सुर्यकुमार यादव (3), कृणाल पंडय़ा (32), हार्दिक पंडय़ा (16), जेम्स नीशम (0) बाद होत राहिल्याने मुंबईचा संघ बिकट स्थितीत होता. पण, याचवेळी पोलार्ड नावाचे वादळ चेन्नई संघावर घोंघावत राहिले आणि या वादळानेच त्यांच्या हातातेंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून देखील नेला. पोलार्डच्या 34 चेंडूतील 87 धावांच्या खेळीत 6 चौकार व 8 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवले गेले. मुंबई इंडियन्ससाठी या मोसमातील हा चौथा विजय ठरला आहे.

रायुडूचा झंझावात

अम्बाती रायुडूची अवघ्या 27 चेंडूतील नाबाद 72 धावांची धडाकेबाज खेळी आणि फॅफ डय़ू प्लेसिस (28 चेंडूत 50), मोईन अली (36 चेंडूत 58) यांच्याही तडफदार अर्धशतकांच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्सने 20 षटकात 4 बाद 218 धावांचा डोंगर रचला. रायुडूच्या खेळीत 4 चौकार व त्यापेक्षाही अधिक 7 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. मुंबईतर्फे पोलार्डने 12 धावात 2 बळी घेतले.

मुंबईने या लढतीत नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि स्पीडस्टार ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात चौथ्या चेंडूवर ऋतुराजला (4) बाद करत हा निर्णय सार्थ ठरवला. डावखुऱया बोल्टच्या (1-42) गुडलेंग्थ चेंडूवर लेगकडे फटका मारण्याचा ऋतुराजचा प्रयत्न सपशेल फसला आणि पॉईंटवरील पंडय़ाने सोपा झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. 

त्यानंतर फॅफ डय़ू प्लेसिस व मोईन अली या अर्धशतकवीरांनी मात्र जोरदार फटकेबाजीचा सिलसिला सुरु केला आणि दुसऱया गडय़ासाठी 10.1 षटकात 108 धावांची धडाकेबाज शतकी भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणले. प्लेसिसच्या 50 धावांच्या खेळीत 2 चौकार, 4 षटकार तर मोईन अलीच्या 58 धावांच्या खेळीत 5 चौकार व तितक्याच उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. मुंबईच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडण्यावर या जोडीने भर दिला.

बुमराहने डावातील 11 व्या षटकात मोईन अलीला यष्टीमागे डी कॉककरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. डावखुऱया मोईन अलीचा आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात अंदाज चुकला आणि यष्टीरक्षक डी कॉकने त्याचा सोपा झेल टिपला. मोईन अली बाद झाला, त्यावेळी चेन्नईच्या खात्यावर 2 बाद 112 धावा होत्या.

पुढील अर्थात, 12 व्या षटकात मात्र पोलार्डने शेवटच्या दोन चेंडूंवर प्लेसिस व रैना यांना ओळीने बाद करत चेन्नईच्या वाटचालीला खरा ब्रेक लावला. सेट झालेल्या प्लेसिसने फाईनलेग इनसाईड द सर्कल असल्याचे लक्षात घेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलार्डच्या ऑफकटरवर प्लेसिसचा अंदाज चुकला आणि बुमराहने कसाबसा झेल पूर्ण केल्यानंतर प्लेसिसची खेळी संपुष्टात आली. त्यानंतर पुढील चेंडूवरच रैनाचे बाद होणे चेन्नईसाठी आणखी धक्कादायक ठरले. डीप मिडविकेटवरील कृणालने रैनाचा सोपा झेल टिपला.

पुढे, डावखुऱया जडेजा व अम्बाती रायुडू या जोडीने एकेरी-दुहेरी धावा घेत खराब चेंडूंवर फटकेबाजीचे सूत्र स्वीकारले आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 8 षटकात 102 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. रायुडू 27 चेंडूत 72 तर रविंद्र जडेजा 22 चेंडूत 22 धावांवर नाबाद राहिले. बुमराहने एका बळीसाठी 56 धावा मोजल्या आणि ही त्याची आयपीएलमधील सर्वात महागडी गोलंदाजी ठरली.

धावफलक

चेन्नई सुपरकिंग्स ः ऋतुराज गायकवाड झे. पंडय़ा, गो. बोल्ट 4 (4 चेंडूत 1 चौकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. बुमराह, गो. पोलार्ड 50 (28 चेंडूत 2 चौकार, 4 षटकार), मोईन अली झे. डी कॉक, गो. बुमराह 58 (36 चेंडूत 5 चौकार, 5 षटकार), सुरेश रैना झे. कृणाल, गो. पोलार्ड 2 (4 चेंडू), अम्बाती रायुडू नाबाद 72 (27 चेंडूत 4 चौकार, 7 षटकार), रविंद्र जडेजा नाबाद 22 (22 चेंडूत 2 चौकार). अवांतर 10. एकूण 20 षटकात 4 बाद 218.

गडी बाद होण्याचा क्रम

1-4 (ऋतुराज, 0.4), 2-112 (मोईन अली, 10.5), 3-116 (प्लेसिस, 11.5), 4-116 (रैना, 11.6),

गोलंदाजी

ट्रेंट बोल्ट 4-0-42-1, धवल कुलकर्णी 4-0-48-0, जसप्रित बुमराह 4-0-56-1, राहुल चहर 4-0-32-0, जेम्स नीशम 2-0-26-0, केरॉन पोलार्ड 2-0-12-2.

मुंबई इंडियन्स ः क्विन्टॉन डी कॉक झे. व गो. अली 38 (28 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), रोहित शर्मा झे. गायकवाड, गो. शार्दुल 35 (24 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), सुर्यकुमार यादव झे. धोनी, गो. जडेजा 3 (3 चेंडू), कृणाल पंडय़ा पायचीत गो. करण 32 (23 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), केरॉन पोलार्ड नाबाद 87 (34 चेंडूत 6 चौकार, 8 षटकार), हार्दिक पंडय़ा झे. प्लेसिस, गो. करण 16 (7 चेंडूत 2 षटकार), जेम्स नीशम झे. ठाकुर, गो. करण 0 (1 चेंडू), धवल कुलकर्णी नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 8. एकूण 20 षटकात 6 बाद 219.

गडी बाद होण्याचा क्रम

1-71 (रोहित, 7.4), 2-77 (सुर्यकुमार, 8.4), 3-81 (क्विन्टॉन डी कॉक, 9.4), 4-170 (कृणाल, 16.3), 5-202 (हार्दिक, 18.4), 6-203 (जेम्स नीशम, 18.6).

गोलंदाजी

दीपक चहर 4-0-37-0, सॅम करण 4-0-34-3, लुंगी एन्गिडी 4-0-62-0, शार्दुल ठाकुर 4-0-56-1, रविंद्र जडेजा 3-0-29-1, मोईन अली 1-0-1-1.

मुंबई इंडियन्सला बसला ‘त्या’ नियमाचा फटका!

या लढतीत अष्टपैलू पोलार्डच्या गोलंदाजीवर चेन्नईचा फिरकी अष्टपैलू रविंद्र जडेजा पायचीत झाला होता. मैदानी पंचांनी तो बाद असल्याचा निर्णय दिला होता. पण, जडेजाने चाणाक्षपणे या निर्णयावर डीआरएस घेतला आणि त्याला आऊटसाईड बॉल पिचिंगचा फायदा झाला. पोलार्डचा हा चेंडू यष्टीच्या रोखाने जरुर होता. पण, त्याचा टप्पा आऊटसाईड असल्याचे रिप्लेत स्पष्ट झाले आणि मैदानी पंचांचा निर्णय फिरवला गेला. याच षटकात जडेजा पोलार्डकडे परतीचा झेल देत बाद होता होता बचावला. पोलार्डला डाईव्ह मारुनही झेल पूर्ण करता आला नव्हता.

68 धावांवरील जीवदान पोलार्डच्या पथ्यावर

अवघ्या 34 चेंडूत 87 धावांची आतषबाजी करणाऱया पोलार्डला अतिशय महत्त्वाचे जीवदान लाभले आणि हाच जणू या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. सामना निर्णायक वळणावर असताना जागतिक स्तरावरील सर्वोत्तम आऊटफिल्डर्सपैकी एक असलेल्या प्लेसिसने लाँगऑनवर पोलार्डचा सोडलेला सोपा झेल चेन्नईच्या जिव्हारी लागला. यावेळी 68 धावांवर असलेल्या पोलार्डने या जीवदानाचा पुरेपूर लाभ घेत संघाला दणकेबाज विजय संपादन करुन दिला.

एन्गिडीच्या ‘त्या’ शेवटच्या षटकात काय घडले?

लुंगी एन्गिडीच्या डावातील शेवटच्या षटकात 16 धावांची गरज असताना पोलार्ड स्ट्राईकवर तर धवल कुलकर्णी नॉन स्ट्रायकर एण्डवर होते. आश्चर्य म्हणजे षटकातील शेवटच्या चेंडूवर सामना निकाली होईतोवर पोलार्ड स्ट्राईकवर तर धवल नॉन स्ट्रायकर एण्डवरच राहिले. पोलार्डने एकेरी धाव घेणे शिताफीने टाळत स्ट्राईक आपल्याकडेच ठेवण्यावर भर दिला आणि शेवटच्या चेंडूवर दुहेरी धावा घेत सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केले.

एन्गिडीच्या शेवटच्या षटकातील लेखाजोखा

19.1 ः पोलार्डचा डीप स्क्वेअर लेगकडे फटका. एकेरी धाव नाकारली.

19.2 ः मिडल स्टम्पवरल यॉर्करवर पोलार्डचा डीप स्क्वेअर लेगकडे चौकार

19.3 ः अटेम्प्टेड यॉर्करवर पोलार्डचा लाँगलेगकडे चौकार

19.4 ः यॉर्करवर बचावात्मक फटका. एकही धाव नाही

19.5 ः डीप स्क्वेअरलेगकडे षटकार

(शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज)

19.6 ः लाँगऑनकडे दुहेरी धावा व मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब

दोन्ही संघांकडून 30 चौकार, 30 षटकारांसह 437 धावांची आतषबाजी!

या ब्लॉकबस्टर लढतीत चेन्नई सुपरकिंग्स व मुंबई इंडियन्स एकत्रित चक्क 437 धावांची आतषबाजी केली. चेन्नईने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 14 चौकार व 16 षटकारांसह 218 धावांची आतषबाजी केली तर प्रत्युत्तरात मुंबईने देखील 16 चौकार व 14 षटकारांची वसुली करत 219 धावांसह दे दणादण विजय संपादन केला.

Related Stories

भारत-द. आफ्रिका महिलांच्या टी-20 मालिकेला आज प्रारंभ

Patil_p

इटालियन टेनिस स्पर्धा रोममध्ये 14 सप्टेंबरपासून

Patil_p

बीसीसीआय 2 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करणार

Patil_p

झेकची क्रेसिकोव्हा अंतिम फेरीत

Patil_p

बीसीसीआयकडून विविध पदांसाठी अर्जांची मागणी

Patil_p

पदार्पणवीर रॉबिन्सन अवघ्या 5 दिवसात निलंबित!

Patil_p
error: Content is protected !!