तरुण भारत

पोटनिवडणुकीचा बदलता पॅटर्न

भविष्यात पोटनिवडणुका या सहानुभूतीच्या लाटेवर कमी आणि राजकीय अस्तित्वाच्या मुद्यावरच लढवल्या जातील. त्यामुळे राजकीय पक्षांनीही आता त्याचा विचार करायला पाहिजे.

राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे हे विजयी झाले. चुरशीच्या या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असाच सामना बघायला मिळाला, भारत नाना भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. भारत नाना सलग तिसऱयांदा तीन वेगवेगळ्या चिन्हावर या मतदारसंघातून निवडून गेले होते, राष्ट्रवादीने त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिल्याने आणि भाजपने 2019 साली अपक्ष निवडणूक लढविलेल्या समाधान अवताडे यांना संधी देताना भाजपचेच विधान परिषद आमदार असलेले प्रशांत परिचारक यांची मनधरणी केली. परिचारक यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपुरात आहे, परिचारक आणि अवताडे या दोघांच्या जनसंपर्काचा फायदा घेत भाजपने म्हणजेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी योग्य व्यूहरचना करत ही निवडणूक जिंकली.

Advertisements

तसे पाहिले तर महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर गेल्या दीड वर्षात झालेली ही पहिली पोटनिवडणूक. या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या दीड वर्षात सरकारने केलेल्या कारभाराबाबत जनतेने नाराजी व्यक्त केल्याचे सांगत भाजपने आघाडी सरकारच्या कारभारावर जनता नाराज असल्याचे म्हटले, मात्र गेल्या काही वर्षात पोटनिवडणुका बघता सहानुभूतीचा फायदा कमी होताना दिसत आहे, लोक विकास आणि स्थानिक प्रश्न तसेच नेतृत्व बदलाला प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्यांच्याच कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याचा जो ट्रेंड आहे तो आता राजकीय पक्षांना बदलावा लागणार आहे, असेच काल झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून दिसते. पंढरपूरमध्ये जरी परिवर्तन झाले असले तरी बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक ही भाजपने निसटत्या फरकाने जिंकली. गेल्या काही वर्षातील पोटनिवडणुकींचा विचार करता राजकीय पक्षांनी लोकांना गृहीत धरू नये हेच वेळोवेळी पोटनिवडणुकीत बघायला मिळत आहे. पूर्वी कोणत्याही नेत्याचे निधन झाल्यास त्या दिवंगत लोकप्रतिनिधीच्या घरातील व्यक्ती निवडणूक लढवित असल्यास त्यांच्याप्रती इतर पक्ष सहानुभूती म्हणून उमेदवार देत नसत, यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतरची पोटनिवडणूक असो या कोणत्याच पक्षाने प्रतिष्ठेच्या केल्या नाहीत, मात्र नव्या नेतृत्वात तशी राजकीय परिपक्वता कमी दिसत असून केवळ राजकीय ईर्षेपोटीच आता पोटनिवडणुकाही प्रतिष्ठेच्या केल्या जात आहे. जानेवारी 2018 ला पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर झालेली पोटनिवडणूक राज्यात चांगलीच गाजली होती, भाजपने वनगा यांच्या मुलाला डावलत काँग्रेसमधून भाजपात आलेल्या माजी मंत्री राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली तर शिवसेनेने भाजपच्या विरोधात पहिल्यांदाच लोकसभा पोटनिवडणूक लढविताना वनगा यांच्या मुलाला उमेदवारी देत ही निवडणूक शिवसेना आणि भाजपने चांगलीच प्रतिष्ठेची केली. तसे पाहिले तर ही जागा भाजपची होती मात्र युती तुटली असल्याने शिवसेनेनेदेखील या जागेवर उमेदवार देत आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला, विजय भाजपाचाच झाला, त्यामुळे यापुढे पोटनिवडणूक उमेदवारीचा ट्रेंड केवळ सहानुभूती धरत राजकीय घराणेशाहीचा पुरस्कार करणारी राहणार नाही हे आता कालच्या निकालावरून स्पष्ट होत असून राजकीय पक्षांनीदेखील यातील आता धडा घेण्याची गरज आहे.

भाजपने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर आता भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना आणि नेत्यांना पक्षांतराचे आवाहन केले जात आहे, भाजप हा एक पर्याय असून सरकारच्या विरोधात जनतेचा कौल आहे. त्यामुळे पक्षांतराची हाक दिली जात असली तरी यापूर्वी ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी पक्षांतर करून पोटनिवडणुका लढविल्या त्यांनाही मतदारांनी चांगला धडा शिकवला आहे, विकासासाठी जर आपण जात असाल तर जनता त्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहते. मात्र केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी जाणाऱयांना आणि मतदारांना गृहीत धरणाऱयांना जनतेने चांगलाच धडा शिकवल्याचे वेळोवेळी दिसले आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा झालेला पराभव असो किंवा नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या श्रीवर्धनचे आमदार शाम सावंत आणि रामटेकचे खासदार असलेल्या शिवसेनेच्या सुबोध मोहिते यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत या दोघांचाही पराभव झाला त्यानंतर हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या राजकारणातूनच गायब झाले. अशीच राजकीय ओहोटी काँग्रेसचे माजी मंत्री आनंदराव देवकाते यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत लागली, देवकाते यांनी दक्षिण सोलापूरच्या आमदारकीचा राजीनामा दिला,

या मतदार संघातून झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत सुशीलकुमार शिंदे भरघोस मतांनी निवडून आले मात्र शिंदेंच्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत लोकसभेसाठी काँग्रेसने देवकातेंना उमेदवारी दिली मात्र भाजपच्या प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी देवकातेंचा पराभव केला. काँग्रेस-राष्ट्रवादीने देवकातेंऐवजी भाजपच्या उमेदवाराला मदत केल्याने धनगर समाजाचा पहिला खासदार होता होता राहिला. या पोटनिवडणुकीनंतर देवकातेही पुन्हा राजकीय पटलावर कुठे दिसले नाहीत. तर खडकवासला पोटनिवडणुकीत मनसे आमदार गोल्डमॅन वांजळे यांच्या निधनाने 2011 साली झालेल्या पोटनिवडणुकीत वांजळे यांच्या पत्नी हर्षदा यांनी पक्षांतर केले आणि त्याचा लाभ भाजपचे उमेदवार भिमराव तापकीर यांना झाला. तापकीर यांनी 2019 ची निवडणूक जिंकत हॅट्ट्रिक केली. पोटनिवडणुकांमुळे अनेकांचा राजकीय उत्कर्ष झाला तसेच काही लोक कायमचे राजकीय विजनवासात गेले. त्यामुळे भविष्यात पोटनिवडणुका या सहानुभूतीच्या लाटेवर कमी आणि राजकीय अस्तित्वाच्या मुद्यावरच लढवल्या जातील.

प्रवीण काळे

Related Stories

नराचा नारायण

Patil_p

नव्या संसदभवन प्रकल्पाचा मार्ग मोकळा!

Patil_p

सीमाभाग केंद्रशासित करा

Patil_p

पृथेप्रति जनार्दन

Patil_p

पोटनिवडणुकीनंतर येडियुराप्पांचे आसन घट्ट

Patil_p

किं करिष्यति वक्तारः…(संस्कृत सुवचने)

Patil_p
error: Content is protected !!