तरुण भारत

निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली

ममता बॅनर्जी उद्या घेणार शपथ – तामिळनाडूत आज द्रमुक आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक

नवी दिल्ली, कोलकाता / वृत्तसंस्था

Advertisements

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता नवीन सरकार स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. पाचही ठिकाणी सत्ताधारी पक्षाने बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जागांपेक्षा अधिक जागा मिळविल्यामुळे कोणत्याही ठिकाणी घोडेबाजार होण्याची शक्यता दिसत नाही. तसेच सत्ताधारी पक्षाचा नेता ठरवितानाही कोणत्याही राज्यात अडचणी निर्माण होताना दिसत नाहीत. साहजिकच स्पष्ट बहुमतामुळे आता या आठवडय़ात सर्व राज्यात सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहेत.

नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांनुसार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, आसाममध्ये भाजप, तामिळनाडूमध्ये द्रमुक, केरळमध्ये डावी आघाडी आणि पुदुच्चेरीमध्ये रालोआप्रणीत सरकार स्थानापन्न होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळविल्यानंतर ममता बॅनर्जी 5 मे रोजी तिसऱयांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. राज्यमंत्री व टीएमसीचे ज्ये÷ नेते पार्थ चटर्जी यांनी सोमवारी ही माहिती दिली. तृणमूलला 214 जागा मिळाल्या आहेत. मात्र, खुद्द ममता बॅनर्जी नंदीग्राममधून पराभूत झाल्या आहेत. सोमवारी संध्याकाळी ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेबाबत चर्चाही केली.

तामिळनाडू ः एमके स्टॅलिन घेणार 7 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ

विधानसभेच्या निवडणुकीत एमके स्टॅलिन यांच्या द्रविड मुनेत्र कळगम (द्रमुक) यांनी 234 पैकी 130 जागा जिंकल्या आहेत. तसेच पक्ष आघाडीने आतापर्यंत 166 जागा जिंकल्या आहेत. बहुमताचा जादुई आकडा पार केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता द्रमुकच्या आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस दुराई मुरुगन यांनी दिली. या बैठकीत द्रमुकचे आमदार एमके स्टॅलिन यांची अधिकृतपणे मुख्यमंत्री म्हणून निवड अपेक्षित आहे. यानंतर आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना दिल्यानंतर एमके स्टॅलिन 7 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

आसाम ः सोनोवाल की अन्य ?

आसाम विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱया वेळी भाजपने बाजी मारली. 126 विधानसभा जागा असलेल्या भाजपा आघाडीला 75 जागा मिळाल्या आहेत. या विजयात मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी परिश्रम घेतल्यामुळे त्यांच्याच गळय़ात मुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते. परंतु काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले हेमंत बिस्वा सरमा यांचे नावही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. तथापि, सोनोवाल हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहिल्यास त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते.

केरळमध्ये आमदारांची लवकरच भेट

केरळमध्ये जोरदार विजयानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची भेट घेतली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकारी समितीत सरकार स्थापनेबाबत निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांच्या चौकटीत या आठवडय़ातच सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. एलडीएफने येथे 92 जागा मिळवत सत्तास्थान कायम ठेवले आहे.

पुदुच्चेरी ः रंगास्वामी दुसऱयांदा मुख्यमंत्री

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरी येथे पहिल्यांदाच रालोआचे सरकार स्थापन होणार आहे. येथे भाजपप्रणीत ‘एआयएनआरसी’ने 16 जागा जिंकत पूर्ण बहुमत मिळवले. स्पष्ट बहुमतामुळे एआयएनआरसीचे अध्यक्ष एन. रंगास्वामी यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद सोपवले जाणार आहे. ते आता दुसऱयांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीमध्येच शपथविधी सोहळय़ाची रुपरेषाही ठरविली जाणार आहे.

Related Stories

कर्नाटक आरोग्यमंत्र्यांचा खासगी रुग्णालयांना इशारा

Shankar_P

5 व्या टप्प्यात 79 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

Patil_p

येडियुराप्पांनी त्या निर्णयावरून फक्त काही तासांमध्येच मारली कलटी!

Rohan_P

70 मुलांचे लैंगिक शोषण, कनिष्ठ अभियंत्याला एचआयव्ही?

Patil_p

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेपासून विभक्त

datta jadhav

लोकांना आर्थिक मदत द्या, कर्जही माफ करा : अभिजीत बॅनर्जी

pradnya p
error: Content is protected !!