तरुण भारत

विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा मुंबईचा निर्धार

आयपीएल साखळी सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मुकाबला

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

सलग दोन विजयांमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या मुंबई इंडियन्स संघाची आज (मंगळवार दि. 3) सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल साखळी सामना होत असून येथेही विजयी घोडदौड कायम राखण्याचा रोहितसेनेचा निर्धार असणार आहे. मुंबई इंडियन्सने मागील सलग दोन सामने जिंकले असून दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबाद संघाला मात्र मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 55 धावांनी पराभव पत्करावा लागला. या हंगामात त्यांचा 7 सामन्यातील हा 6 वा पराभव ठरला.

यापूर्वी मुंबईच्या मागील विजयात केरॉन पोलार्डची धडाकेबाज फलंदाजी निर्णायक ठरली होती. मुंबईने त्यावेळी 4 गडी राखून बाजी मारली. सनराजयर्सचा संघ सध्या बराच झगडत असून डेव्हिड वॉर्नरला नेतृत्वावरुन डच्चू देत केन विल्यम्सनकडे हा पदभार सोपवला आहे. साहजिकच, वॉर्नरची देखील निराशा झाली आहे.

मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा (250 धावा) व क्विन्टॉन डी कॉक (155 धावा) हे आज आणखी एकदा तडाखेबंद सलामी देण्यासाठी प्रयत्नशील असतील. छोटय़ा खेळीचे मोठय़ा खेळीत रुपांतर करणे, यावरही त्यांचा फोकस असणार आहे.  मुंबई इंडियन्सची मध्यफळी मागील दोन सामन्यात उत्तमरित्या ‘क्लिक’ झाली असून मुंबईसाठी ही दिलासादायक बाब आहे. या मोसमात 168 धावा जमवणाऱया पोलार्डने मागील सामन्यात 34 चेंडूत 87 धावांची आतषबाजी केली असून तोच फॉर्म येथेही कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.

मुंबईला पंडय़ा बंधूंकडून अपेक्षा

कृणाल पंडय़ा (100 धावा), हार्दिक पंडय़ा (52) व सुर्यकुमार यादव (173 धावा) यांना सूर सापडला तर ते प्रतिस्पर्ध्यांना आणखी खाईत लोटू शकतात. मुंबईचा संघ अष्टपैलू जेम्स नीशमऐवजी इशान किशन किंवा जयंत यादवचा विचार करणार का, हे देखील आज स्पष्ट होईल. जेम्स नीशम एकीकडे धावा जमवू शकलेला नाही, दुसरीकडे बळी घेण्यातही फारसा यशस्वी होऊ शकलेला नाही.

गोलंदाजीच्या आघाडीवर जसप्रित बुमराह (6 बळी) व ट्रेंट बोल्ट (8 बळी) यांनी विशेषतः शेवटच्या काही षटकात लक्षवेधी मारा केला असून सातत्याचा अभाव असणाऱया सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांसमोर या उभयतांना सामोरे जाणे प्रचंड आव्हानात्मक असणार आहे. लेगस्पिनर राहुल चहर (11 बळी) मुंबईचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला असला तरी अद्याप त्याला कृणाल पंडय़ाकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही. कृणालला आतापर्यंत 3 बळी मिळवता आले आहेत. मागील सामन्यात पोलार्डने 2 महत्त्वाचे बळी घेतले असून तो पाचव्या किंवा सहाव्या गोलंदाजाची जागा भरुन काढू शकतो.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), ऍडम मिल्ने, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, जेम्स नीशम, जसप्रित बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मार्को जान्सन, मोहसिन खान, नॅथन काऊल्टर-नाईल, पियुष चावला, क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), राहुल चहर, सौरभ तिवारी, सुर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंग.

सनरायजर्स हैदराबाद ः केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धिमान साहा, प्रियम गर्ग, विजय शंकर, रशीद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बसिल थम्पी, जगदीश सुचित, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.

नव्या कर्णधारासमोरही जुनीच आव्हाने

केन रिचर्डसनकडे नेतृत्व सोपवले गेलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघासमोर नेतृत्वबदलानंतरही जुनीच आव्हाने असणार आहेत. हैदराबादचा संघ आपल्या आघाडीच्या फलंदाजांवरच विशेषतः जॉनी बेअरस्टोवर सर्वस्वी अवलंबून रहात आला असून याचा त्यांना सातत्याने फटका बसला आहे. बेयरस्टोने आतापर्यंत 248 धावांचे योगदान दिले आहे.

हैदराबादने राजस्थान रॉयल्सविरुद्ध मागील लढतीत वॉर्नरला डच्चू दिला व मनीष पांडे-बेयरस्टो यांना सलामीला उतरवले. विल्यम्सन तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरला. हीच लाईनअप यापुढेही कायम राखायची असेल तर या तिघांनीही आक्रमक फलंदाजी करणे क्रमप्राप्तच असणार आहे. विजय शंकर (58 धावा), केदार जाधव (40 धावा), अब्दुल समद (36 धावा), मोहम्मद नबी (31 धावा) यांना  अद्याप अपेक्षित योगदान देता आलेले नाही, ही देखील हैदराबाद संघासमोरील चिंतेचे आणखी एक कारण आहे.

गोलंदाजीच्या आघाडीवर, स्टार लेगस्पिनर रशीद खानने किफायतशीर मारा करताना सर्वाधिक 10 बळी घेतले. मात्र, मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार (3 बळी), खलील अहमद (4 बळी) यांना अद्याप सूर सापडलेला नाही. संदीप शर्माला पुन्हा संधी दिली जाणार की, त्याच्याऐवजी सिद्धार्थ कौलचा संघात समावेश होणार, हे आज संघनिवडीत स्पष्ट होईल.

Related Stories

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 7 लाखांवर

datta jadhav

भारताचा चीनला दणका : भारतीय रेल्वेने केले आणखी एक कंत्राट रद्द

triratna

कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानसाठी पुढाकार घ्यावा

datta jadhav

महाराष्ट्र सरकारच्या मिशन ‘ब्रेक द चेंज’ आदेशात सुधारणा

pradnya p

पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे वर्चस्व

Patil_p

श्रीनगरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav
error: Content is protected !!