तरुण भारत

ऑक्सिजनअभावी सरकारचाही गुदमरतोय श्वास

ऑक्सिजनचा काळाबाजार होत असल्याचे सिद्ध : तरीही दिलासादायक चित्र निर्माण करण्याचे प्रयत्न

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

ऑक्सिजन तुटवडय़ामुळे एका बाजूने रुग्णांचे प्राण जात असताना आता त्याच प्राणवायुच्या प्रश्नावरून सरकारचाही श्वास गुदमरु लागला असून वरकरणी कितीही दिलासादायक चित्र निर्माण करण्याचे प्रयत्न होत असले तरी ऑक्सिजनचा केवळ तुटवडाच नव्हे तर काळाबाजारही मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचे सप्रमाण सिद्ध झाले आहे.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे स्वतः डॉक्टरांच्या संघटनेने सुद्धा मान्य केलेले असताना मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री मात्र ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचे सांगून दिलासादायक चित्र निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत.

एका वृत्तवाहिनीने केलेल्या ’स्टिंग ऑपरेशनद्वारे’ सरकारचे पितळ उघडे पाडले आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी सदर वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार ’स्कूप’ नामक एका कंपनीकडून थेट गोमेकॉतच रुग्णांना परस्पर सिलिंडरची खुलेआम विक्री करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. पाच ते आठ हजार रुपये अनामत रक्कम भरून सिलिंडर देण्यात येतो. रिक्त सिलिंडर पुन्हा भरून देण्यासाठी 400 रुपये आकारण्यात येतात, असेही सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न

सदर सिलिंडर विक्रेत्या कंपनीविरुद्ध अनेक तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र ’सध्यस्थितीत आपणास रुग्णांचे प्राण वाचविणे महत्वाचे आहे, त्या कंपनीची चौकशी आपण नंतर करणार आहे’, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती वेळ मारून नेण्याचे प्रयत्न केले आहेत.

मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यात समन्वय नाही हे आता उघड सत्य बनले आहे. तरीही दोघेही ते अमान्य करतात. त्याचबरोबर संधी मिळेल तेथे एकमेकांवर आरोप, टीका करण्यासही चुकत नाहीत हेही गोमंतकीयांना कळून चुकले आहे. मंगळवारी आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना, ’ऑक्सिजनचे व्यवस्थापन गेल्या सात दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतल्याचे’ सांगून मुख्यमंत्र्यांना तोंडघशी पाडण्याचे प्रयत्न केले, त्यावरून  हे सिद्धच झाले. नंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना, स्वतःवरील आळ आरोग्यमंत्र्यांसह डीनवरही ढकलण्याचे प्रयत्न केले.

रुग्णांची मात्र होतेय प्रचंड आबाळ

अशा एकूण प्रकारातून रुग्णांची मात्र प्रचंड आबाळ होऊ लागली आहे. गत काही दिवसांपासून राज्यात रोज पन्नास पेक्षा जास्त रुग्णांचे बळी गेले आहेत. यातील अनेकजण हे प्राणवायुअभावी तडफडून दगावले आहेत, अशी माहितीही सदर वाहिनीशी बोलताना काही रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यावरून गोमेकॉत किती भयानक प्रकार चालू आहेत, त्याची प्रचिती येते.

बाबूश मोन्सेरातकडून आरोग्यमंत्री टार्गेट

राज्य सध्या कोविड महासंकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री आणि एक-दोन मंत्रीच अखंड काम करत आहेत. अन्य सर्व एकदमच सुस्त आहेत. काहीजण अस्वस्थतेतून आपल्याच सरकारवर टीकास्त्रे सोडून घायाळ करत आहेत. असे एकूण चित्र असतानाच एवढे दिवस शांत असलेले पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी अचानक सक्रिय बनत कोविड व्यवस्थापनातील गोंधळाबाबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनाच टार्गेट केले आहे. बाबूश यांनी एवढय़ावरच न थांबता अनेक मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेबद्दल थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली आहे. 50 टक्के आमदार बिनकामाचे आहेत, असेही ते बिनदिक्कत बोलले आहेत.

दुसऱया बाजूने गोमेकॉत ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे स्वतः डॉक्टरांच्या संघटनेनेही जाहीर मान्य केले आहे. तरीही मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री मात्र ’ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, लवकरच सर्वकाही सुरळीत होणार आहे’, यासारखी वक्तव्ये करून दिलासादायक चित्र निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत.

हे सर्व कमी होते म्हणून की काय सर्व विरोधी आमदार एकत्र येऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कोरोनास्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले आहे, प्रशासनही ठप्प झाले आहे, असा ठपका ठेवला. सरकार चालविणे झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्वरित पायउतार व्हावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

सरकारने चार दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले, त्यावरही चौफेर टीका झाली. अशाप्रकारे लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्यापेक्षा 15 दिवसांचा लॉकडाऊन करा, अशी मागणीही सर्व स्तरातून झाली. परंतु मुख्यमंत्री ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे शेवटी राज्यातील अनेक पंचायती व नगरपालिकांनी स्वेच्छा लॉकडाऊन पुकारला आहे. गावे, शहरांनी दारे बंद केली आहेत.

अशा कित्येक प्रकारांमुळे सध्या सरकारची प्रचंड नाचक्की झाली आहे. त्यातून कोरोना रुग्णांपेक्षा ऑक्सिजनअभावी सरकारचाच श्वास जास्त प्रमाणात कोंडू लागला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने येत्या काही दिवसात सरकारात मोठय़ा उलथापालथी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने अशी कोणताही  शक्यता फेटाळली असली तरीही त्याची परिणती एखाद्या मंत्र्याच्या गच्छंतीत किंवा पंख छाटण्यात होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ऑक्सिजनप्रकरणी हायकोर्टात  याचिका

कोविड रुग्णांना प्राणवायुचा पुरवठा करण्यासंबंधी राज्य सरकारला आदेश द्यावा, अशी विनंती करणारी याचिका दक्षिण गोवा वकिल संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे केली आहे. संघटनेचे अध्यक्ष आंतोनियो क्लोव्हीस यांनी संघटनेच्यावतीने ही याचिका सादर केली आहे.

गोव्यातील विविध इस्पितळात कोविड रुग्ण आहेत. या रुग्णांना नियमितपणे प्राणवायुचा पुरवठा करण्यासंबंधीचे तसेच जीव वाचविणाऱया औषधांचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात यावेत. प्राणवायु नसल्यामुळे रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत असे ऍड. क्लोशव्हीस याचिकेत नमूद केले आहे.

गोवा निवासी डॉक्टर संघटनेने (गार्ड) हल्लींच एक खंत व्यक्त केली होती. प्राणवायुचा अभाव असल्याकारणाने रुग्णांचा मृत्यू होत आहे आणि याचे खापर या संघटनेने प्रशासनावर फोडले होते. प्रशासन अपयशी ठरलेले असले तरी न्यायसंस्थेवर आमचा विश्वास असल्याचे या संघटनेने म्हटलेले होते. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा वकील संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेऊन वरील आशयाची याचिका सादर केलेली आहे.

Related Stories

कोविड इस्पितळाचे व्यवस्थापन लष्कराकडे सोपवा

Patil_p

सीझेडएमपीसाठी मुदतवाढीची याचना

Amit Kulkarni

आंतरराज्य अकादमी क्रिकेट स्पर्धेत एम्स सावंतवाडी, आनंद क्रिकेट अकादमीचे विजय

Amit Kulkarni

देवस्थान मालकीची शेतजमिनही कूळ

Amit Kulkarni

कोरोना इस्पितळ उभारताना वैद्यकीय नियमांची पायमल्ली

Omkar B

सुकुर येथे 12 रोजी कृषी मेळावा

Patil_p
error: Content is protected !!