तरुण भारत

भारतीय तिरंदाजांचा स्वित्झर्लंड दौरा रद्द,

व्हिसा नाकारल्याने संघटनेला घ्यावा लागला निर्णय

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारताचा रिकर्व्ह तिरंदाजी संघ स्वित्झर्लंडमधील लॉसेन येथे होणाऱया विश्व चषक स्टेज 2 स्पर्धेसाठी जाणार होते. पण स्वित्झर्लंडच्या दूतावासाने अल्प काळाचे व्हिसा देण्यास नकार दिल्याने हा दौरा रद्द करावा लागला आहे. भारतात कोरोना महामारीचा प्रचंड प्रकोप सुरू असल्याने अनेक देशांनी भारतातून येणाऱया प्रवाशांवर बंदी घातली आहे, त्यात स्वित्झर्लंडचाही समावेश आहे. 17 ते 23 मे या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.

पॅरिसमध्ये 21 ते 27 जून या कालावधीत विश्व चषक तिरंदाजी स्टेज 3 स्पर्धा होणार आहे. त्याच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय महिला तिरंदाजांसाठी स्वित्झर्लंडची स्पर्धा महत्त्वाची ठरणार होती. पॅरिसमधील स्पर्धा ही ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्याची शेवटची स्पर्धा असणार आहे. भारताला सांघिक महिलांचा ऑलिम्पिक कोटा अद्याप मिळविता आलेला नाही. मात्र दीपिका कुमारीने वैयक्तिक कोटा मिळविला असल्याने ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी करताना दिसणार आहे. भारताचा पुरुष रिकर्व्ह संघ अतानू दास, तरुणदीप राय, प्रवीण जाधव यांनी याआधीच ऑलिम्पिक पात्रता मिळविली आहे. याशिवाय वैयक्तिक गटात खेळण्यासही ते पात्र ठरले आहेत. लॉसेनमधील विश्व चषक स्पर्धेसाठी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया प्रमुख महिला खेळाडूंना सामील करण्यात आले होते. त्यात दीपिका, अंकिता भगत, कोमलिका बारी, मधू वेदवान तसेच पुरुषात अतानू दास, तरुणदीप, प्रवीण जाधव, धीरज बोम्मदेवरा यांना संधी देण्यात आली होती. पण एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात भारतातील कोव्हिड म्युटंटचा एक रुग्ण स्वित्झर्लंडमध्ये आढळल्यानंतर स्वित्झर्लंडने भारतातून येणाऱया हवाई प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. फक्त स्विस नागरिक व रहिवाशांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

‘जे स्थानिक रहिवाशी आहेत आणि दीर्घकाळासाठी (शिक्षण व नोकरीसाठी) राहणार आहेत, केवळ अशा लोकांचाच व्हिसा पास केला जात आहे. शेन्जेन टाईप सी व्हिसा देण्याचे त्यांनी थांबवले आहे. याशिवाय छोटय़ा कालावधीसाठी (पर्यटन, भेट, व्यवसाय) व्हिसा देणेही त्यांनी थांबवले आहे. दिल्लीतील त्यांच्या कार्यालयाकडे सहा ते 8 दिवसांचा व्हिसा देण्याची आम्ही विनंती केली होती. पण त्यांनी त्याला नकार दिला,’ असे भारतीय तिरंदाजी संघटनेचे (एएए) सचिव प्रमोद चांदुरकर यांनी सांगितले. याशिवाय 10 दिवस क्वारंटाईनमध्ये असताना सराव करायलाही मिळणार नव्हता. त्यामुळे नुसते हॉटेलमध्ये बसून राहण्यात काहीच अर्थ नव्हता. अनेक निर्बंध आणि व्हिसा मिळत नसल्याने आपले तिरंदाज तिथे जाऊच शकणार नाहीत. त्यामुळे पॅरिसमधील शेवटच्या पात्रता स्पर्धेवर आम्ही लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. महिला संघासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असल्याने आम्ही व्हिसाच्या तयारीलाही सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

नव्या राष्ट्रीय विक्रमासह अचिंताने मिळविले रौप्य

Amit Kulkarni

न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर मालिका विजय

Patil_p

पिछाडीवरून एफसी गोवाची नॉर्थईस्ट युनायटेडशी बरोबरी

Patil_p

हंगेरीच्या कापाससह 9जलतरणपटूंना कोरोनाची बाधा

Patil_p

एकमेव कसोटीवर बांगलादेशचे वर्चस्व

tarunbharat

स्टोक्सने पटकावले अष्टपैलूचे अग्रस्थान

Patil_p
error: Content is protected !!