तरुण भारत

ऑस्ट्रेलियन खेळाडूही मालदीवकडे रवाना

मालदीवमध्ये काही दिवस वास्तव्यानंतर मायदेशी परतणार, न्यूझीलंडचे काही खेळाडू शुक्रवारी मायदेशी परतण्याची शक्यता, जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टचा प्राधान्याने समावेश

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर या स्पर्धेत सहभागी विदेशी खेळाडू आता मायदेशी परतत आहेत. गुरुवारी ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवकडे रवाना झाले, दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनी मायदेशाकडे आगेकूच केली तर न्यूझीलंडचे काही खेळाडू शुक्रवारी आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. भारतातील कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस विध्वंसक होत चालला असताना निलंबित आयपीएल स्पर्धेतील विदेशी खेळाडूंनी आता आपल्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले आहे.

40 सदस्यीय ऑस्ट्रेलियन पथकातील सदस्य गुरुवारी मालदीवच्या दिशेने रवाना झाले. यात फक्त चेन्नई सुपरकिंग्स संघाचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी हे कोरोनाबाधित असल्याने भारतात थांबले आहेत. सध्या ऑस्ट्रेलियन प्रशासनाने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा भारतातून येणाऱया प्रवाशांसाठी बंद केले असल्याने त्यांना 15 मे पर्यंत प्रतीक्षा करणे भाग आहे. सध्या जे खेळाडू मालदीवमध्ये पोहोचले आहेत, ते तेथे काही दिवस वास्तव्य करतील व परवानगी मिळाल्यानंतर मायदेशी रवाना होतील. सध्या मालदीवला रवाना झालेल्या पथकात 14 खेळाडू असून त्यात डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स व स्टीव्ह स्मिथ या मेगा स्टार्सचा प्रामुख्याने समावेश आहे.

आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेले 11 दक्षिण आफ्रिकन खेळाडू तेथून काहीही बंधने नसल्याने जोहान्सबर्गला फ्लाईटने रवाना होऊ शकले. चेन्नई सुपरकिंग्स संघातील स्टार खेळाडू फॅफ डय़ू प्लेसिसने भारतातील खेळाडूंप्रती आम्हाला चिंता आहे. सर्वांनी शक्य ती काळजी घ्यावी, असे भावनिक आवाहन टेलिग्रामवरुन केले.

गुरुवारी न्यूझीलंडच्या पथकातील बरेच सदस्य देखील मायदेशी रवाना झाले आहेत. यंदा आयपीएल स्पर्धेत न्यूझीलंडच्या 17 सदस्यांचा समावेश राहिला. त्यापैकी 10 खेळाडू होते. त्यांचे काही सदस्य आज (शुक्रवार दि. 7) देखील रवाना होणार आहेत. यात स्टीफन फ्लेमिंग, ब्रेन्डॉन मेकॉलम, काईल मिल्स, शेन बाँड, माईक हेस्सन, टीम सेफर्ट, ऍडम मिल्ने, स्कॉट कुगलेईन व जेम्स पॅमेंट यांचा समावेश आहे.

न्यूझीलंडचे आयपीएलमधील खेळाडू इंग्लंडकडे कूच करणार

ख्राईस्टचर्च : आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेले न्यूझीलंडच्या कसोटी पथकातील 4 सदस्य दि. 11 मे रोजी इंग्लंडला रवाना होणार असून यात कर्णधार केन विल्यम्सनचा समावेश आहे. त्यांचे उर्वरित खेळाडू शुक्रवारी मायदेशी परतत आहेत. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने गुरुवारी ही घोषणा केली. इंग्लंडविरुद्ध होणाऱया मालिकेत सहभागी जे खेळाडू न्यूझीलंडमध्येच आहेत, ते दि. 16 व 17 मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत. 

न्यूझीलंडचा संघ 2 जूनपासून इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची छोटेखानी मालिका खेळणार असून त्यानंतर ते जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध मुकाबला करणार आहेत. ही बहुचर्चित अंतिम लढत दि. 18 जूनपासून खेळवली जाणार आहे.

‘आपले खेळाडू सुरक्षित मायदेशी पोचावेत, यासाठी आम्ही बीसीसीआय व विविध आयपीएल प्रँचायजींच्या सातत्याने संपर्कात राहिलो असून या आव्हानात्मक वेळेत त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत’, असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी डेव्हिड व्हॉईट म्हणाले.

कर्णधार विल्यम्सन, जलद गोलंदाज काईल जेमिसन, फिरकीपटू मिशेल सॅन्टनर, फिजिओ टॉमी सिमसेक हे नवी दिल्लीत बायो-बबलमध्येच राहणार असून नंतर ते इंग्लंडला रवाना होणार आहेत. या संघातील जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टला मात्र आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मायदेशी परतण्याची परवानगी दिली गेली आहे. बोल्ट दोनपैकी एका चार्टर फ्लाईटने रवाना होणार आहे. तो शनिवारी ऑकलंडमध्ये पोहोचल्यानंतर मॅनेज्ड आयसोलेशन व क्वारन्टाईनमध्ये असेल. त्यानंतर दि. 22 रोजी तो आपल्या कुटुंबियांना भेटू शकणार आहे. साधारणपणे एका आठवडय़ाची विश्रांती घेतल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवडय़ात तो इंग्लंडकडे कूच करेल.

आयपीएल स्पर्धेत केकेआरशी करारबद्ध असणारे न्यूझीलंडचे टीम ट्रेनर ख्रिस डोनाल्डसन देखील मायदेशी कुटुंबियांना भेटतील व त्यानंतर इंग्लंड दौऱयावरील किवीज कसोटी संघात दाखल होतील, अशी रुपरेषा आहे.

आरसीबीचे खेळाडू, पथकातील सदस्यही रवाना

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघातील देशांतर्गत खेळाडू व साहायक पथकातील सदस्य देखील चार्टर फ्लाईटने आपापल्या ठिकाणी रवाना झाले आहेत. आयपीएल स्पर्धा स्थगित झाली, त्याच दिवशी आरसीबीचा कर्णधार विराट कोहली मुंबईत पोहोचला असून गुरुवारी सकाळपर्यंत या संघातील खेळाडू व पथकातील अन्य सदस्य देखील आपल्या घरी पोहोचले.‘संघातील सर्व खेळाडू, पथकातील प्रत्येक सदस्य आपल्या घरी सुरक्षित पोहोचेल, याची पूर्ण जबाबदारी आमची होती आणि ती आम्ही पार पाडली आहे. आमच्या पथकातील सर्व सदस्य आपापल्या ठिकाणी पोहोचले आहेत’, असे आरसीबीने पत्रकाद्वारे जाहीर केले. आरसीबीने यासाठी बीसीसीआयशी संपर्कात राहत आपल्या खेळाडूंसाठी चार्टर फ्लाईट उपलब्ध करुन दिले.

कोरोनाबाधित हसी, बालाजी एअर ऍम्बुलन्सने चेन्नईकडे

चेन्नई ः चेन्नई सुपरकिंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी व गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी या कोरोनाग्रस्त पदाधिकाऱयांना दिल्लीमधून खास एअर ऍम्ब्युलन्सने चेन्नईत हलवले गेले. ‘दिल्लीपेक्षा चेन्नईत आमची संपर्क यंत्रणा अधिक भक्कम आहे आणि आम्ही त्यांना येथे उत्तम वैद्यकीय उपचार पुरवू शकतो’, असे या प्रँचायझीतील एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने नमूद केले. हसीला भारतातून मायदेशी रवाना होण्यासाठी कोरोनावर मात करावी लागेल. त्याचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच प्रवास करता येईल, असेही या अधिकाऱयाने स्पष्ट केले.

मुंबई इंडियन्स चार्टर फ्लाईटने खेळाडूंना परत पाठवणार

मुंबई : आपल्या संघातील सर्व विदेशी खेळाडूंना आम्ही चार्टर फ्लाईटने मायदेशी पाठवत असून अन्य प्रँचायझीतील खेळाडूंना आवश्यकता असेल तर ते सुद्धा सहभागी होऊ शकतात, असे जाहीर करत मुंबई इंडियन्सने स्पर्धेत सहभागी अन्य घटकांसाठी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबईच्या पथकात शेन बाँड, ऍडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, जेम्स नीशम हे न्यूझीलंडचे, क्विन्टॉन डी कॉक, मार्को जान्सन हे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू समाविष्ट आहेत. याशिवाय, विंडीजचा केरॉन पोलार्ड देखील या पथकात आहे.

ऍडम मिल्ने, बोल्ट, शेन बाँड, नीशम यांच्यासह अन्य आयपीएल संघातील न्यूझीलंडचे उर्वरित खेळाडू मुंबई इंडियन्सने अरेंज केलेल्या या फ्लाईटमध्ये दाखल होतील. याशिवाय, कॅरेबियन फ्लाईट व्हाया जोहान्सबर्ग जाईल व जोहान्सबर्गमध्ये डी कॉक, मार्को जान्सन उतरतील, अशी संघव्यवस्थापनाची योजना आहे. पोलार्डला ही फ्लाईट त्रिनिदादला पोहोचवणार आहे. या सर्व फ्लाईटस् येत्या 24 ते 48 तासात प्रस्थान करतील, असे मुंबई इंडियन्सतर्फे सांगितले गेले आहे.

धोनीचा नारा, शेवटचा खेळाडू घरी पोहोचल्यानंतरच हॉटेल सोडणार!

नवी दिल्ली : आयपीएल स्पर्धा ही भारतातील असल्याने सर्व विदेशी खेळाडू व सहायक पथकातील सदस्यांना प्रवासासाठी प्रथम प्राधान्य द्यायला हवे. सर्व विदेशी खेळाडू, सदस्य रवाना झाल्यानंतर संघातील देशांतर्गत सदस्य आपल्या निवासस्थानी कूच करतील आणि त्यानंतरच मी माझ्या घरी परतेन, तोवर मी हॉटेल सोडणार नाही, असे चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी संघसहकाऱयांसमवेत आयोजित व्हर्च्युअल मिटिंगमध्ये स्पष्ट केले आहे.

चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या खेळाडूंसाठी दिल्लीतून चार्टर फ्लाईटची सोय केली. दहा सीटची एक फ्लाईट चेन्नईच्या काही खेळाडूंना घेऊन राजकोट व मुंबईला पोहोचली तर सायंकाळी चार्टर विमानाने काही खेळाडूंना बेंगळूर व चेन्नईला उतरवले. हे सर्व खेळाडू व सदस्य रवाना झाल्यानंतर सर्वात शेवटी धोनी गुरुवारी सायंकाळी उशिराने रांचीकडे रवाना होणे अपेक्षित होते.

मुंबई व पंजाबसारख्या काही प्रँचायझींनी आपल्या खेळाडूंसाठी चार्टर फ्लाईटची सोय केली तर राजस्थान रॉयल्स, केकेआर व सनरायजर्स हैदराबादच्या देशांतर्गत खेळाडूंना कमर्शियल फ्लाईटने त्यांच्या शहरात पाठवले गेले. काही खेळाडूंनी कॅबमधून अहमदाबाद ते मुंबई व दिल्ली ते पंजाब असा प्रवास केला.

Related Stories

रियल माद्रीदचे दोन फुटबॉलपटू कोरोना बाधित

Patil_p

माद्रिद टेनिस स्पर्धेतील बोपण्णाचे आव्हान समाप्त

Patil_p

पुजारा, जडेजासह 5 क्रिकेटपटूंना नाडाची नोटीस

Patil_p

जडेजा म्हणतो, धोनीच्या भेटीची नेहमीच उत्सुकता

Patil_p

तेंडुलकर, संगकारा, जयवर्धने सर्वोत्तम फलंदाज : पनेसर

Patil_p

विंडीज मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा

Patil_p
error: Content is protected !!