तरुण भारत

पर्यटन हंगाम गेल्याने कोकणातही बेरोजगारीचे संकट

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या क्षेत्रांना फटका बसला. जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर संकट आले. कंपन्या बंद पडल्या. प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अनेकांचे रोजगार गेले. मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेचाही मोठा आर्थिक फटका बसला असून मध्यमवर्गीय कुटुंबे मोडून पडली आहेत. उपचारासाठी कर्ज काढावे लागत आहे. काहींना जमिनीही विकाव्या लागल्या. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ात गेल्या दहा पंधरा वर्षात पर्यटन हंगाम चांगला बहरतो आहे. त्यामुळे रोजगारासाठी मुंबईपुढे शहरात स्थलांतर करणारे तरुण जिल्हय़ातच थांबले. परंतु कोरोनामुळे पर्यटन हंगामच गेल्याने बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ातील लोकांचे उत्पन्नाचे साधन बघितले तर भात पिक हे प्रमुख मानले जाते. त्यानंतर मत्स्य उत्पादक, आंबा, काजू आणि सुपारी या पिकातूनही उत्पन्न घेतले जाते. परंतु वातावरणातील बदल आणि नैसर्गिक आपत्त्यांमधून भात पिक किंवा फळ पिकाला नेहमीच फटका बसतो. त्यामुळे रोजगारासाठी कोकणातील लोक मुंबई, पुणेसारख्या मोठय़ा शहरामध्ये नोकरीसाठी स्थलांतरीत झालेले आहेत. ऐन पर्यटन हंगाम बहरण्याच्या वेळीच कोरोनाची दुसरी लाट उसळली. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला बेक लागलेला आहे.

Advertisements

कोकणने गेल्या 10-15 वर्षात पर्यटन विकासात प्रगतीच्या दिशेने महत्त्वाची पावले टाकली आहेत. कोकणातील स्वच्छ समुद्र किनारे, खाडय़ा, नद्या, ओढे, धबधबे, बंदरे, धरणे, कातळशिल्पे, किल्ले मंदिरे, जैवविविधता लोककला पर्यटकांना भुरळ घालतात. एवढेच काय तर पर्यटनाबरोबरच कोकणात सध्या प्री वेडिंग फोटोशूट, वेडिंग डेस्टीनेशनचे प्रमाण वाढत आहे. देश विदेशातून फक्त गळाने मासे पकडण्यासाठी हौशी मासेमार कोकणातील खाडय़ा, समुद्रात येऊ लागले आहेत. कोकणातल्या नैसर्गिक शुद्ध हवेत आजारी माणूस ठणठणीत बरा होतो असे म्हणतात. या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापर करून येथील युवक, तरुण तरुणींनी पर्यटन व्यवसायात पाय रोवायला सुरुवात केली. नोकरीसाठी मुंबई-पुणे शहरात जाणाऱया तरुणांचे प्रमाणही कमी झाले. पर्यटन व्यवसायातून स्वयंरोजगार निर्माण केले. परंतु कोरोनाच्या वैश्विक महामारीतून अर्थचक्रच थांबले आहे आणि कोकणातील तरुणांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.

कोरोनाच्या संकटाचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. गतवर्षी मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली, कंपन्या बंद पडल्या, अनेकांच्या नोकऱया गेल्या, कोकणातील लोक मोठय़ा प्रमाणात पुणे-मुंबई मध्ये नोकरी निमित्त राहतात. परंतु कंपन्यांच बंद झाल्याने अनेक लोकांनी आपल्या गावची वाट धरली. कोरोनाचा थोडा प्रभाव कमी होताच काही लोक पुन्हा मुंबई शहराकडे वळले. परंतु काही लोकांनी गावाकडची शेती आणि गावातच राहून शेतीपूरक व्यवसाय, पर्यटन व्यवसायात वळले. परंतु कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढला आणि पुन्हा अर्थचक्र थांबल्याने बेरोजगारीची वेळ आली आहे.

गेल्या वर्षभरात तर कोकणला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. कोरोनातून सावरण्यासाठी बेरोजगार तरुण शेतीकडे वळले असताना गतवर्षी ऐन भात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाचा तडाखा बसून भात शेतीचे नुकसान झाले. फळपिके घ्यायची तर वादळाच्या तडाख्यात बागायतीचे नुकसान झाले. त्यातच वातावरणातील वारंवार होत असलेल्या बदलामुळे फळपिकांचे उत्पन्नही घटले. मत्स्य उत्पादनही घटले. त्यातच राज्याबाहेरील एलईडी ट्रॉलर्स कोकणच्या समुद्री हद्दीत घुसून मासेमारी करत असल्याने मत्स्य उत्पादनातही मोठी घट होऊन आर्थिक फटका बसला.

नोव्हेंबर 2020 नंतर कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने पर्यटन हंगाम चांगला जाईल व पर्यटन व्यवसाय पुन्हा उभारी येईल असे वाटले होते. परंतु डिसेंबर, जानेवारी या महिन्यात थोडय़ाफार प्रमाणात पर्यटनाला संधी मिळाली. परंतु त्यानंतर हळूहळू राज्यात कोरोनाचा पुन्हा प्रभाव दिसू लागला आणि मार्चमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवणाऱया या कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ात कोरोनाची दुसरी लाट उसळली. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंधाशिवाय पर्यायच नाही. त्याचा परिणाम मात्र पर्यटन व्यवसायावर झाला आणि गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यटन हंगाम गेला व कोकणातही कोरोना काळातील बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.

कोरोना विरुद्धची लढाई प्रत्येकजण लढत आहे. परंतु कोरोनाचे हे संकट कधी दूर होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कोरोनाची तिसरी लाटही येणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे बेरोजगारीचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. त्यामुळे राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी विविध उपाय योजना करताना बेरोजगारीचे संकट ओढवलेल्या प्रत्येक घटकाचा विचार करणे आवश्यक आहे. दुर्बल घटकांसाठी शासनाने अनुदान, धान्य देण्याचे जाहीर केले आहे.

भविष्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असाच सुरू राहिला तर कोकणातील पर्यटन व्यवसाय बुडाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या प्रत्येक घटकाचा विचार केला पाहिजे आणि कोकणातील तरुणांना बेरोजगारीच्या संकटातून बाहेर काढले पाहिजे.

Related Stories

आता ‘ई-गव्हर्नन्स’ अनिवार्य व्हावे!

Patil_p

रत्नागिरी : वाटद-खंडाळा येथे अति मद्यसेवनाने तरूणाचा मृत्यू

Shankar_P

शांततेला सुरूंग लावण्याचे प्रयत्न

Patil_p

धामापूर तलावात बेकायदा चिरे, माती

NIKHIL_N

कुडाळमध्ये हायवेचे काम घिसाडघाईने

NIKHIL_N

भीतीचा काळाबाजार

tarunbharat
error: Content is protected !!