तरुण भारत

माजी सभापती, मंत्री शेख हसन यांचे निधन

रक्तदाब खालावल्यानंतर ह्य्दयविकाराचा झटका : सांत ईनेज कब्रस्तानमध्ये सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गोव्यातील एकमेव व पहिले मुस्लीम मंत्री आणि पर्वरीतील गोवा विधानसभा प्रकल्पाचे जनक हाजी शेख हसन हरुण यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी 11.30 वा. निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सायंकाळी सांतईनेज येथील कब्रस्तानमध्ये सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोव्याच्या राजकारणातील जंटलमन सभापती म्हणून नेहमीच ओळखून राहिलेल्या हाजी शेख हसन हरुण हे 1977 मध्ये मुरगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर प्रथम निवडून आले होते.

गोव्याचे अमर, अकबर, अँथोनी

गोव्यात 1980 मध्ये पहिल्यादांच राजकीय परिवर्तन झाले व राज्याच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसचे सरकार प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आले. पहिल्या टप्प्यात 3 मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात प्रतापसिंह राणे, फ्रान्सिस सार्दिन आणि हाजी शेख हसन हरुण यांचा समावेश होता. त्यावेळी या तिघांनाही सर्वत्र अमर, अकबर ऍंथोनी’ या नावाने ओळखले जायचे.

1990 मध्ये बनले विधानसभा सभापती

1984 च्या निवडणुकीतही शेख हसन पुन्हा मुरगावातून निवडून आले आणि राणे मंत्रिमंडळात मंत्री बनले. 1990 मध्ये राज्यात रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आणि नंतर शेख हसन हरुण हे सभापती बनले. स्वतः पेशाने वकील असलेले शेख हसन हरुण यांचा विधानसभा कामकाजावर जबरदस्त पगडा होता. राज्य विधानसभेचे कामकाज विधानसभा कामकाज नियम आणि परंपरेने त्यांनी चालविले. विशेष म्हणजे सरकारी पक्षापेक्षा ते विरोधी पक्षात जास्त लोकप्रिय होते. सभापती बनल्यानंतर तर विरोधी पक्षाला जास्त न्याय सभागृहात मिळवून देत असत.

1999 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये

1999 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. 1994 च्या निवडणुकीत प्रथमच त्यांचा वास्कोत अवघ्या काही मतांनी पराभव झाला. 99 मध्ये निवडून आल्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. मनोहर पर्रीकर सरकारच्या काळात ते गोवा आर्थिक विकास महामंडळाचे (ईडिसी) ते चेअरमन होते. शेख हसन यांनी 1980 मध्ये राणे मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून फार चांगली कामगिरी बजावली होती.

पराभवानंतर 2002 पासून घेतला राजकीय संन्यास

पर्वरी येथे 2000 मध्ये बांधून पूर्ण झालेल्या गोवा विधानसभा प्रकल्पाची उभारणीच मुळी 1998 मध्ये सभापतीपदी असताना शेख हसन हरुण यांनी केली होती. त्यांच्या कारकिर्दीत या प्रकल्पाचा आराखडा, नियोजन व पायाभरणीही झाली होती. एक दिलदार व दिलखुलास व्यक्ती म्हणून ते सुपरिचित होते. 2002 च्या मध्यावधी निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर हळहळू ते राजकारणापासून दूर गेले व नंतर त्यांनी राजकीय सन्यासच घेतला.

सध्या ते सांत ईनेज येथे ते मुलाकडे रहात होते. 3 वर्षापूर्वीच त्यांची पत्नी झरिना हसन यांचे निधन झाले. हाजी शेख हसन यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव आरिफ, मसूद तसेच कन्या तन्वीर व अंजुम तसेच सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या 15 दिवसांपूर्वीच त्यांच्या ह्रदयावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. गुरुवारी सकाळी त्यांचा रक्तदाब खाली गेला व त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला. त्यातच सकाळी 11.30 वा. त्यांचे निधन झाले. सायंकाळी 5.30 वा. सांत ईनेज कब्रस्तानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गोवा सरकारतर्फे पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली व हवेत गोळीबार करून त्यांना सलामी दिली. हाजी शेख हसन यांच्या निधनाबद्दल राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली.

Related Stories

दहावी परीक्षेचा निणर्य योग्यच

Omkar B

कारच्या धडकेत स्कुटर चालकाचा मृत्यू

Patil_p

कमालीच्या ताणाखाली अहोरात्र झटतेय आरोग्य यंत्रणा

Amit Kulkarni

बेरोजगारांच्या भावनांशी सरकारचा खेळ

Patil_p

विश्वजित, सुदिन भेटल्याच्या संदेशामुळे राज्यात खळबळ

Omkar B

गोवा शालान्त मंडळाच्या अध्यक्षपदी भगिरथ शेटय़े

Amit Kulkarni
error: Content is protected !!