तरुण भारत

पुरातत्व खात्याचे माजी संचालक डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकर यांचे निधन

प्रतिनिधी / मडगाव

गोवा राज्याच्या पुरातत्व, पुराभिलेख तसेच पुराणवस्तू संग्रहालयाचे माजी संचालक डॉ. प्रकाशचंद्र पांडुरंग शिरोडकर (81 वर्षे) यांचे गुरुवारी सकाळी बंगळूरात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी सुलभा, मुलगा प्रियदर्शन व मुलगी प्रज्ञा तसेच भाऊ प्रवीण, प्रसन्ना व एक विवाहीत बहिण असा परिवार आहे.

Advertisements

स्वातंत्र्यसैनिक तथा गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग शिरोडकर उर्फ पां. पु. शिरोडकर यांचे ते पुत्र होते. गोव्यात जन्मलेले डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकर यांनी पुरातत्व खात्याचे संचालक म्हणून जवळ जवळ 20 वर्षे काम केले. 2011 साली रॉक आर्ट सोसायटीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला होता. कोकण इतिहास परिषदेने त्यांना प्रतिष्ठेचा आजीवन सन्मान पुरस्कार बहाल केला होता. निवृत्तीनंतर ते त्यांच्या मुलाकडे बंगळूर येथेच होते.

डॉ. प्रकाशचंद्र यांनी गोवा तसेच गोव्यातील सर्व शहरांना, गावांना त्यांची मूळ प्राचीन नावे पुन्हा प्राप्त व्हावी, यासाठी त्यांनी कार्य केले होते. गांवांच्या नावाचा अर्थ शोधून तो सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी अनेक वर्षांपूर्वी हाती घेतले होते. ते एक इतिहास तज्ञ होते. त्यांना गोवा आणि भारत नव्हे तर विदेशातही मानाचे स्थान होते. त्यांनी त्यांच्या कठीण परिश्रमाने आणि संशोधनासाठी असलेल्या आवडीमुळे त्यांना हे यश प्राप्त करता आले होते.

डॉ. प्रकाशचंद्र पांडुरंग शिरोडकर यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

शिरोडकरांचे साहित्य प्रकाशित करणे , हीच खरी श्रद्धांजली ठरेल : शिरोडकर

डॉ. शिरोडकर यांचे गोव्यासाठी खूप योगदान आहे. त्यांचे संशोधनात्मक लेखन गोव्याचा वैभवशाली वारसा सांगणारे आहे. त्यांचे हे सर्व साहित्य प्रकाशित केल्यास आजच्या आणि आगामी पिढय़ांना मार्गदर्शक ठरेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत हा विषय यापूर्वीच पोहोचविण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे. आता शिरोडकर यांच्या निधनानंतर हे ग्रंथ प्रकाशनाचे कार्य पूर्ण झाल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे शिरोडकर यांचे चुलतबंधू कुंभारजुवे मतदारसंघातील समाजसेवक, माजी जिल्हा पंचायत सदस्य तसेच करमळी, माशेल येथील कालिक ज्वेलर्सचे मालक नीलेश शिरोडकर यांनी सांगितले.

शिरोडकरांच्या प्रयत्नांमुळे पुरातत्व

खात्याला जागतिक स्थान ः सांगोडकर

शिरोडकर यांच्या अथक परिश्रमांमुळेच गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याने  जागतिक पातळीवरचे स्थान प्राप्त केले होते. 25 एपिल 2021 रोजी आपले आणि त्यांचे संभाषण झाले होते. मात्र हे संभाषण अखेरचे असेल असे कधी वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया गोवा विद्याापीठाचे माजी रजिस्ट्रार मोहन सांगोडकर यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावून गेली. आमच्या कठीण प्रसंगी डॉ. शिरोडकर यांनी देऊ केलेला मदतीचा हात आम्ही कधीही विसरलेलो नाही. अशा प्रकारचे व्यक्तीमत्व दैवज्ञ समाजात निर्माण व्हायला अनेक दशके लागतील. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो, अशी प्रार्थना डॉ. सांगोडकर यांनी केली.

श्री महामाया कालिका देवस्थानतर्फे श्रद्धांजली

 दैवज्ञ समाजातील सरकारी पातळीवर उंच पदावर पोहोचलेल्या अनेकांपैकी डॉ. शिरोडकर एक होते. पणजीतील नव्या संग्रहालयाचे काम चालू असताना कामाचा आढावा घेण्यासाठी ते अनेकदा आपल्याकडे येत व चर्चा करी. या त्याच्या चर्चेतून इतक्या मोठय़ा पदावर असूनही त्यांच्यातील मृदू स्वभावाचे दर्शन घडत. समाज बांधवाबद्धल त्यांच्या मनात एक प्रेमाची भावना होती. त्यांच्या निधनाने या समाजात एक पोकळी निर्माण झाली असल्याचे श्री महामाया कालिका देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र वेर्लेकर यांनी सांगितले.

उदयकुमार सांगोडकर

मुळगाव येथे श्री देवी शांतादुर्गा सांगोडकरीण या पुराणकालीन मंदिराचे बांधकाम शोधून काढण्यासाठी 1998 साली डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकर यांनी पुरातत्व खात्याच्या तज्ञ पथकाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या निधनाने सांगोडकर परिवार एका मोठय़ा व्यक्तीमत्वाला मुकलेला आहे. त्यांच्या निधनाने अखिल भारतीय दैवज्ञ ब्राह्मण समाज एका सच्चा मित्राला मुकलेला आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर गोव्यातील उदयकुमार सांगोडकर यांनी व्यक्त केली आहे.

अखिल भारतीय दैवज्ञ परिषद

मुंबईस्थित अखिल भारतीय दैवज्ञ परिषदेचे अध्यक्ष दिनकर बायकेरीकर, दैवज्ञ समाज-मडगावचे अध्यक्ष अतुल वेर्लेकर, दैवज्ञ समाज मडगावचे माजी अध्यक्ष तथा सल्लागार समितीचे अध्यक्ष मनोहर रायकर, ब्रह्म दैवज्ञ वाजेकर रायकर फॅमिली ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रभान रायकर, माजी अध्यक्ष रमाकांत रायकर, स्व. राधाबाई काशिनाथ रायकर ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ रायकर, पणजी येथील उत्कृष्ट सुवर्ण कारागीर मिलींद शिरोडकर यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

Related Stories

लोकमान्य सोसायटीने प्लाझ्मा शिबिराचे आयोजन करावे

Amit Kulkarni

पणजीत 17 रोजीपासून विज्ञान चित्रपट महोत्सव

Amit Kulkarni

कर्नाटकातील ट्रॉलर्सची गोव्याच्या समुद्रात बेकायदा मासेमारी

Patil_p

सिम्युलेटर बांधण्यासाठी गोवा शिपयार्ड व नौदलामध्ये करार

Omkar B

भाजपसाठी बंडखोरी ठरतेय डोकेदुखी

tarunbharat

आल्तिनो भाग मनपातर्फे सिल करण्यात आला

Omkar B
error: Content is protected !!