तरुण भारत

गजबजणाऱया मडगाव नगरीत सामसूम

प्रसाद नागवेकर/ मडगाव

मडगाव नगरी ही राज्याची आर्थिक व सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे साहजिकच ती नेहमीच गजबजलेली असते. आर्थिक राजधानी असल्याने व्यवसाय आणि कामांनिमित्त या नगरीत हजारो लोकांचा वावर असतो. मात्र संचारबंदीमुळे सध्या या नगरीत सामसूम दिसून येत आहे. मडगाव नगरीतील रस्ते सध्या निर्मनुष्य झाले आहेत. आस्थापने, बाजारपेठा, सभागृहे, उद्यान असे सर्वच ठिकाणचे व्यवहार ठप्प झाल्याने सगळीकडे शांतता पसरल्याचे दिसून येत आहे.

Advertisements

मठग्राम नगरीचे केंद्रस्थान म्हणजे शहराचा मध्यवर्ती भाग असून मडगाव पालिकेत नेहमीच कामांसाठी मडगाववासियांची गर्दी उसळत असते. तेथील व्यवहार सध्या ठप्प झालेले आहेत. मडगावातील कदंब बसस्थानक हे नेहमी गजबजले असते. येथे विविध ठिकाणांहून अनेक बसेस येत असतात व सुटत असतात. हे स्थानक सध्या सुनेसुने झालेले आहे.

बाजारपेठांना टाळे

मडगावातील न्यू मार्केट व गांधी मार्केट या बाजारपेठांमधील किराणामालाची तसेच फळ-भाज्यांची विक्री करणारी दुकाने रविवारी कर्फ्यू सुरू झाल्यानंतर अत्यावश्यक म्हणून खुली होती. मात्र मंगळवारी मडगाव पालिकेने या मार्केटांचे टाळे न खोलल्याने येथे सामसूम पसरली होती. मुख्यमंत्र्यांनी बाजारपेठा बंद असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केल्याने पालिकेने सदर पावले उचलल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकाऱयांनी बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

फळ-भाज्यांच्या बाबतीत हाल होण्याची शक्यता

किराणामाल व फळ-भाजी दुकाने खुली राहतील. लोकांनी भीतीने खरेदी करू नये, असे मुख्यमंत्री तसेच मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी निवेदन केले होते. लोकांच्या घरात किराणामाल असू शकतो. मात्र संपूर्ण गांधी मार्केट बंद ठेवल्याने फळ-भाजी उपलब्ध न होऊन लोकांचे हाल होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. किमान काही मोजकी फळ-भाजी दुकाने खुली ठेवण्याबाबत फेरविचार करण्याची मागणी होत आहे. पालिकेने बाजारपेठेत पोलीस संरक्षण घेऊन पाच ते दहा लोकांना खरेदीसाठी आळीपाळीने आत सोडून सोय करावी, अशी मागणी होत आहे. कोविडला प्रतिकारासाठी चांगला आहार घ्या, त्यात भाजीपाला व फळे समाविष्ट करा असे सांगण्यात येत असते. मात्र फळ-भाजी उपलब्ध नसल्यास लोकांनी काय खायचे, असा सवाल करण्यात येत आहे.

मासळी मार्केट बंद

मडगाव व फातोर्डा परिसरातील घाऊक व किरकोळ मासळी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. एसजीपीडीए मार्केट बंद आहे. त्यामुळे सुपर मार्केट वा ऐसपैस असलेली किराणामालाची दुकाने वा एखाद्या फळ-भाजी विपेत्याकडे लोक सकाळच्या सत्रात खरेदीसाठी आल्याचे दिसून आले. शहरातील फार्मसी खुल्या असल्याने अशा ठिकाणी लोक दिसून येतात. सकाळच्या तुलनेत सायंकाळी सर्वत्र सामसूम दिसून येते. फातोर्डात नियम मोडणाऱयांवर तसेच गर्दी करणाऱयांवर पोलीस कारवाई करताना दिसत असले, तरी मडगावात याबाबत पोलिसांची उदासिनता दिसून येते.

विनाकारण फिरणाऱयांवर कारवाई हवी

कोविडच्या बाबतीत मडगाव राज्यात हॉटस्पॉट बनला आहे. येथील सक्रिय रुग्णांची संख्या मंगळवारी 2837 झाली आहे मागील काही दिवसांत कर्फ्यूमुळे लोकांच्या वावरावर नियंत्रण असले, तरी दररोज 150 ते 200 नवीन रुग्ण आढळून येत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱयांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. यासाठी पोलीस यंत्रणेने रस्त्यांवर उतरून नाकाबंदी व अन्य मार्ग अवलंबून प्रत्येकाची कसून चौकशी करावी व विनाकारण फिरणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

पेडणे तालुका उपजिल्हाधिकाऱयांशी विर्नोडा पंचायत मंडळाची चर्चा

Omkar B

आंबेडकर उद्यानाकडील झाड उमळून पडले

Patil_p

घरावर झाड कोसळल्याने रेवोडा येथे एक जखमी

Omkar B

सरकारी जावई स्वयंदिप्तची हकालपट्टी

Patil_p

पाच पालिकांसाठी आज मतदान

Amit Kulkarni

कांपाल इनडोअर स्टेडियम बॅडमिंटन, टेबलटेनिसपटूंसाठी झाले खुले

Omkar B
error: Content is protected !!