तरुण भारत

विश्वजितकडून आरोग्य खाते त्वरित काढा

बाबूश यांच्याकडून विश्वजितवर प्रश्नांची सरबत्ती

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

कोविडप्रश्नी अपयशी ठरलेल्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आरोग्य खाते त्वरित काढून घ्या आणि त्यांनी आरोग्य खात्यात व गोमेकोत केलेल्या सर्व व्यवहारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करून सत्ताधारी भाजपचे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. दरम्यान आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मडगावातील ऑक्सिजन गळती प्रकरणाची उच्च न्यायालयाने चौकशी करावी तसेच पहाटे 1 ते 6 या दरम्यान 26 जण का मृत्यूमुखी पडले, याची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑक्सिजन साठा पुरेपुर आहे, परंतु त्याच्या वितरणात गोंधळ असल्याची टीका केली आहे. या प्रकाराने राजकीय घडामोडी वाढू लागलेल्या आहेत.

 गोव्याच्या इतिहासात प्रथमच एखादा आरोग्यमंत्री आपल्याच खात्याच्या कारभारावर संशय व्यक्त करुन उच्च न्यायालयामार्फत चौकशीची मागणी करीत आहे. गोमेकॉ वा आरोग्य खात्याचा कारभार नेमका कोण चालवितोय? असा प्रश्न जनतेत आता निर्माण झाला आहे.  

कोविड मृतांना जबाबदार राणेंचा कारभार

राज्यात कोविड मृतांची संख्या आणि बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी गेले कित्येक दिवस राज्यात कोविड बाधित मरत चाललेयत त्यास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा कारभार जबाबदार असल्याची जोरदार टीका केली.

दरदिवशी 300 बळी जाणार, हे कसे सांगितले?

मोन्सेरात यांच्या या मागणीने राज्यात एकच खळबळ माजलेली आहे. एका वृत्तवाहिनीशी व दैनिक तरुण भारतशी बोलताना बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले की, कोविडमुळे गोव्यात दरदिवशी 300 माणसे मरणार हे खुद्द आरोग्यमंत्री असलेल्या राणेंनी अगोदरच कसे काय सांगितले? ते जाहीर केल्यानंतर त्यांनी कोविड पसरू नये यासाठी नेमके काय केले? आज जनतेचे प्राण महत्वाचे आहेत. मुख्यमंत्री स्वतः गोमेकॉला भेट देऊन कोविड वॉर्डाची पाहणी करतात. मात्र आरोग्यमंत्री आरामात आपल्या केबिनमध्ये बसून आहेत, अशीही टीका मोन्सेरात यांनी केली.

आरोग्यमंत्री संपूर्ण गोव्याचे की केवळ सत्तरीचे?

आपल्या वाळपई मतदारसंघातील रूग्णांसाठी विशेष काळजी घेणारे आरोग्यमंत्री सर्वसामान्य गोव्यातील इतर भागातून आलेल्या रूग्णांकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याची प्रखर टीका त्यांनी केली. ते गोव्याचे नव्हे तर केवळ सत्तरीचे आरोग्यमंत्री आहेत काय, असा सवालही बाबूश यांनी केला आहे.

वास्कोच्या रुग्णाला खाटीवरुन जमिनीवर झोपविले

वास्कोहून आलेल्या व गोमेकॉत खाटीवर झोपून असलेल्या एका रूग्णाला तेथून हटवून जमिनीवर झोपण्यास भाग पाडले. संतापाची बाब म्हणजे त्या खाटीवर सत्तरीतून आलेल्या एका रूग्णाला त्यांनी झोपविले. हा असा भेदभाव कशासाठी करावा? आणि तोही खुद्द मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने व्हावा? अशा शब्दांत मोन्सेरात यांनी खरपूस समाचाल घेतला.

यापुर्वीच्या आरोग्यमंत्र्यांनी एवढा हस्तक्षेप केला नव्हता

माजी मंत्री असलेल्या बाबुश मोन्सेरात यांनी सांगितले की आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे वारंवार गोमेकॉत जाऊन डिन व त्यांच्या उर्वरीत डॉक्टरांना वेगवेगळे आदेश देतात. यापूर्वी डॉ. विली डिसोझा, दयानंद नार्वेकर, डॉ. सुरेश आमोणकर, फ्रांसिस्क डिसोझा, लक्ष्मीकांत पार्सेकर असे कितीतरी नेते आरोग्यमंत्री होऊन गेले. त्यांनी कधी गोमेकॉच्या कारभारात एवढा हस्तक्षेप केला नव्हता.

ना डिन, ना आरोग्यमंत्री फोन का घेत नाहीत

आरोग्यमंत्री हे गोमेकॉ व सरकार यांच्या दरम्यान सेतु उभारण्याचे काम करीत असतो. परंतु विश्वजित राणे हे आपल्याला विचारल्याशिवाय काही करायचे नाही, असे आदेशच देतात. परिणामी आम्ही फोन केला तर ना डिन उचलतात ना आरोग्यमंत्री उचलतात. आपण राजधानी पणजीचा आमदार आहे. ताळगावातील काल 3 जण मरण पावले. पणजीतील 4 जण मरण पावले. आरोग्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळेच व या राजकीय हस्तक्षेपामुळे राज्यातील कोविड बाधित मरण पावत असल्याचा सनसनाटी आरोप बाबुश मोन्सेरात यांनी केला.

दरम्यान गोमेकॉमध्ये तसेच राज्यात आवश्यक तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध आहे. मात्र व्यवस्थापन बरोबर नसल्यानेच विविध समस्यांना तोंड द्यावे लागतेय आणि रूग्ण अडचणीत येतात असे मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ऑक्सिजन पुरवठा कमी असल्याने रूग्ण दगावतात असल्याचे मान्य केले. मुख्यमंत्र्यांना कोणीतरी चुकिची माहिती देत असावा असे ते म्हणाले. मध्यरात्रीनंतर 1 ते 6 या दरम्यान काल एकाच दिवशी 28 रूग्ण का मरण पावले? त्याना प्राणवायू देखील मिळालेला नाही व त्यातून रूग्ण मरण पावले अशी मल्लिनाथी आरोग्यमंत्र्यांनी केली. तसेच या प्रकरणाची उच्च न्यायालयामार्फत चौकशी व्हावी अशी मागणीही आरोग्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी त्वरित आमदारांची बैठक बोलवावी, बाबुशचे डॉ. सावंतना स्मरणपत्र

आपण केवळ बोललो आहे, सत्ताधारी भाजपमधील सर्व आमदार या गचाळ कारभाराने संतप्त झालेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित सत्ताधारी पक्षातील आमदारांची बैठक बोलवावी अशी लेखी मागणी मोन्सेरात यांनी केली आहे. आपण या अगोदर मुख्यमंत्र्यांकडे भाजप विधिमंडळाची बैठक बोलविण्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा करतोय. आरोग्य खात्याच्या व गोमेकॉच्या संपूर्ण कारभाराची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी जोरदार मागणी मोन्सेरात यांनी केली. भाजपमधील सर्व आमदार हे आरोग्य खात्याच्या कारभारावर संतप्त झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अकार्यक्षम विश्वजित राणे यांच्याकडील आरोग्य खात्याचा कारभार काढून घ्यावा आणि आरोग्य खात्यासाठी एकच कोणीतरी प्रमुख असावा. मुख्यमंत्री या नात्याने स्वतः डॉ. प्रमोद सावंत हे सारी परिस्थिती हाताळू शकतात व ती हाताळण्यास ते समर्थ आहेत. आरोग्यमंत्र्यांनी जनतेच्या जीवाशी खेळू नये, असे मोन्सेरात यांनी ठणकावून सांगितले.

Related Stories

कोरोना व्हायरस प्रतिपिंड चाचणीसाठी मागणी करणार

tarunbharat

अपघातात जखमी झालेल्या कदंब कंडक्टरला मृत्यू

Omkar B

जावडेकर यांनी मेळावलीकरांना मार्गदर्शन करावे

Patil_p

बेकायदा बांधकामप्रकरणी कारणे दाखवा नोटीस

Omkar B

केपेतील कोरोनाबाधितांच्या संख्येत भर

Patil_p

वाघांचा अधिवास धोक्यात

Patil_p
error: Content is protected !!