तरुण भारत

ईपीएल स्पर्धेत मँचेस्टर सिटीचे साम्राज्य कायम

मागील 4 हंगामात तिसऱया जेतेपदावर शिक्कामोर्तब, 3 सामने बाकी असताना गुणतालिकेत 10 गुणांची भक्कम आघाडी

मँचेस्टर / वृत्तसंस्था

Advertisements

कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे अवघे विश्व तावून सुलाखून निघालेले असताना मँचेस्टर सिटीचे फुटबॉल चाहते देखील याला अपवाद अजिबात नाहीत. हेच चाहते बुधवारी एका अनोख्या कारणासाठी इतिहाद स्टेडियमच्या बाहेर मोठय़ा संख्येने एकत्र आले. पण, यावेळी सामना आतील इतिहाद स्टेडियमवर नव्हता तर येथून काही मैलावर असलेल्या मँचेस्टर युनायटेड क्लबवर होता. तेथे मँचेस्टर युनायटेडला लिसेस्टरविरुद्ध 2-1 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला आणि यामुळे इंग्लिश प्रीमियर लीग जेतेपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इतिहाद स्टेडियमसमोर मँचेस्टर सिटी चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले नसते तरच नवल होते. मँचेस्टर सिटीसाठी मागील 4 हंगामातील हे तिसरे जेतेपद ठरले आहे.

मँचेस्टर सिटीने नव्या शतकात इंग्लिश फुटबॉलवर आपलेच वर्चस्व असेल, याचा अनेकदा दाखला दिला आहे. ती परंपरा त्यांनी यंदा प्रतिकूल परिस्थितीतही कायम राखली. मँचेस्टर सिटीच्या खात्यावर मागील 10 हंगामातील हे 5 वे जेतेपद असून तेच खेळाडूंचे ट्रान्स्फर्स व सॅलरीवर सर्वाधिक खर्च करणाऱया क्लबच्या यादीतही अग्रभागी आहेत.

ओल्ड ट्रफोर्डवर सामन्याची वेळ संपल्याची खूण म्हणून फायनल व्हिसलचा आवाज घुमण्याआधीच मँचेस्टर सिटी क्लबबाहेर चाहत्यांनी विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली होती. 66 व्या मिनिटाला कॅग्लर सोयून्कूने लगावलेल्या हेडरवर लिसेस्टरने विजयाच्या दिशेने आगेकूच केली, त्याचवेळी इतिहाद स्टेडियमच्या बाहेर चॅम्पियन्सचा बॅनर दिमाखात झळकला. या हंगामातील शेवटचा सामना दि. 23 मे रोजी इव्हर्टनविरुद्ध झाल्यानंतर मँचेस्टर सिटीचा संघ जेतेपदाचा झळाळता चषक स्वीकारेल, त्यावेळी तो क्षण डोळय़ात साठवून ठेवण्यासाठी सिटीचे किमान 10 हजार चाहते प्रत्यक्ष हजर राहतील, असा अंदाज आहे. या सामन्याकरिता तूर्तास 10 हजार प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा केली गेली आहे.

11 व्या स्थानावरुन अव्वलस्थानी झेप

यंदाच्या प्रीमियर लीग हंगामात नोव्हेंबरमध्ये सिटीचा संघ अव्वलस्थानावरील संघापेक्षा 8 गुणांनी मागे व गुणतालिकेत 11 व्या स्थानी होता. कोरोनाचा फटका बसलेला असल्याने रिसोर्सेस कमी होते. पण, या संघाचे प्रशिक्षक पेप यांनी अनुभव पणाला लावत संघाकडून सरस कामगिरी करवून घेतली आणि या सांघिक प्रयत्नांमुळे सिटीच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. टॉटेनहमविरुद्ध नोव्हेंबरमध्ये पराभूत झालेला हा संघ त्यानंतर 28 सामन्यात अपराजित राहिला आहे.

बॉक्स

29 मे रोजी सिटीला जेतेपदाच्या हॅट्ट्रिकची संधी

सिटीने बुधवारी ईपीएल जेतेपदावर शिक्कामोर्तब केले असले तरी या हंगामात जेतेपद उंचावण्याची त्यांची ही पहिली वेळ अजिबात नाही. मागील महिन्यातच या क्लब संघाने वेम्बलेवर सलग चौथ्यांदा लीग कप जिंकला होता. यावेळी 2 हजार चाहत्यांना प्रवेश देण्यात आला होता. दि. 29 मे रोजी सिटीचा संघ चेल्सीविरुद्ध चॅम्पियन्स लीग फायनलमध्येही खेळणार आहे. त्यामुळे, या संघाला लीग कप व ईपीएलनंतर आता चॅम्पियन्स लीगसह जेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवण्याची संधी असेल.

मॅनेजर पेप म्हणतात, प्रीमियर लीग जिंकणे सर्वात कठीण होते!

या हंगामात प्रीमियर लीग स्पर्धा जिंकणे सर्वात कठीण होते आणि जेतेपद संपादन केल्यानंतर यासारखी दुसरी समाधानाची बाब नाही, हे उद्गार आहेत मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गॉर्डिओला यांचे.

‘प्रत्येक सामन्यात खेळताना स्वतंत्र आव्हाने असायची, त्यात विविध बंधने, नियम असायचे. हे सर्व सांभाळून खेळात सातत्य राखणे आव्हानात्मक होते. प्रत्येक दिवशी, प्रत्येक सामन्यात आम्ही यश खेचून आणण्यासाठी खेळलो आणि अंतिमतः त्यात आम्ही यशस्वी झालो’, असे पेप यांनी पुढे नमूद केले.

लिव्हरपूलमधील प्रशिक्षकपदाची कारकीर्द चॅम्पियन्स म्हणून पूर्ण केल्यानंतर पेप गॉर्डिओला यांनी मँचेस्टर सिटी संघाला देखील आता 4 हंगामात तिसऱयांदा जेतेपद मिळवून दिले आहे. यापूर्वी, क्लब स्तरावर बार्सिलोना व बायर्न म्युनिचचे प्रशिक्षकपद हाताळताना देखील पेपनी डोमेस्टिक टायटल्स जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. आता सिटीला चॅम्पियन्स लीग चषक मिळवून देत 10 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

Related Stories

चेल्सी सुपर चषक फुटबॉल स्पर्धेतील विजेता

Amit Kulkarni

आज बांबोळी स्टेडियमवर होणार ओडिशा – हैदराबाद यांच्यात लढत

Omkar B

परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम ; जयंत पाटलांच्या हॉकी संघाला हटके शुभेच्छा!

Abhijeet Shinde

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत गोलंदाजच निर्णायक ठरतील

Patil_p

सनरायजर्सचा मिशेल मार्श स्पर्धेतून बाहेर

tarunbharat

फुटबॉल फेडरेशनतर्फे अन्वर अलीला पर्यायी ऑफर

Patil_p
error: Content is protected !!