तरुण भारत

कोविड समितीच्या मंजुरीनंतर ऑक्सिजन प्लांटची उभारणी

महापालिकेच्या नेतृत्वाखाली बिम्स इस्पितळाच्या आवारात ऑक्सिजन निर्मिती प्लांट निर्माण करण्याचा प्रस्ताव

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन्सअभावी कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या नेतृत्वाखाली बिम्स इस्पितळाच्या आवारात ऑक्सिजन निर्मिती प्लांट निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रशासन आणि कोविड कमिटीच्या मंजुरीनंतर अवघ्या पंधरा दिवसांत ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सध्या कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन गरजेचे आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने कोरोनाबाधित मृत्युमुखी पडत आहेत. शहरात ऑक्सिजनअभावी असंख्य रुग्णांचा बळी गेला आहे. खासगी आणि सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळणे अवघड बनले आहे. त्यामुळे ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पावले उचललेली आहेत. पण देशभरात कोरोनाचा उदेक झाल्याने सर्वत्र ऑक्सिजन उपलब्ध करणे अडचणीचे ठरत आहे. त्या अडचणीवर मात करण्यासाठी ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून महापालिकेच्या आरोग्य विभागाने सदर प्रस्ताव कोविड कमिटीकडे मंजुरीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून बिम्स इस्पितळ आवारात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड कमिटीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव मार्गी लागेल.सध्या सरकारी व खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी दररोज 13 केएलडी ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे भविष्यातील गरज ओळखून 20 केएलडी ऑक्सिजन उत्पादितचा विचार मनपाने चालविला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली. सध्या पहिल्या टप्प्यात 5 ते 7 केएलडी क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट निर्माणचा प्रस्ताव आहे. त्यामुळे दररोज 400 ते 500 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करता येईल. ऑक्सिजनच्या तुटवडय़ावर मात करण्यासाठी हा प्रस्ताव लवकर मार्गी लावण्याचा विचार आहे.

मंजुरीनंतर अवघ्या पंधरा दिवसांत प्रकल्प उभारण्यात येणार

प्रस्ताव लवकरच कोविड कमिटीसमोर सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. याकरिता गुंतवणूक करणाऱया कंत्राटदाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. पाणी, जागा आणि विद्युत पुरवठा प्रशासन उपलब्ध करून देणार असून सध्या कोरोना कालावधीत सरकारी रुग्णालयात मोफत ऑक्सिजन पुरवठा करावा लागणार आहे. सरकारी रुग्णालयाला पुरवठा केल्यानंतर उर्वरित ऑक्सिजन पुरवठा खासगी रुग्णालयांना देता येणार आहे. सध्याची गरज ओळखून हा प्रस्ताव राबविण्याचा विचार आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. हा प्रकल्प निर्माण झाल्यास ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, अशी अपेक्षा आहे.

Related Stories

एनपीएस विरुध्द ता.पं.समोर कर्मचाऱयांचे आंदोलन

Patil_p

वरेरकर नाटय़संघातील चित्र प्रदर्शनाची सांगता

Amit Kulkarni

बिम्सला आणखी 11 लाखांची देणगी

Amit Kulkarni

सुवर्ण सिंहासनासाठी शिंदोळी ग्रामस्थांतर्फे 1,01,101 रुपयांचा निधी सुपूर्द

Amit Kulkarni

आयपीएल स्थगित झाल्यानंतर शहरात गल्ली क्रिकेटचा अवलंब

Amit Kulkarni

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी बेळगावच्या 4 मल्लांची निवड

Amit Kulkarni
error: Content is protected !!