तरुण भारत

कोडार कृषी फार्ममध्ये कलमांच्या खरेदीला अल्प प्रतिसाद

एप्रिलपासून विक्रीला सुरुवात 16 हजारकाजू,आंबा कलमांची निर्मिती

प्रतिनिधी / फोंडा

Advertisements

कृषी खात्याच्या कोडार कृषी फार्ममध्ये यंदा आंबा, काजू व नारळाच्या कवाथ्यांची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून कलमे वितरणाला सुरुवात झाली आहे. कोराना महामारी व अन्य कारणांमुळे यंदा शेतकऱयांकडून कलमे खरेदीला अल्प प्रतिसाद लाभत आहे.

 पावसाळा सुरु होण्यापूर्वी एप्रिल व मे हे दोन महिने काजू, आंबा व अन्य कलमांच्या लागवडीसाठी योग्य काळ मानला जातो. या काळात दरवर्षी मोठय़ा संख्येने शेतकरी व बागायदार कलमे विकत घेण्यासाठी कोडार फार्ममध्ये येतात. केवळ फोंडा तालुकाच नव्हे तर गोव्याच्या विविध भागातून शेतकरी कलमांच्या खरेदीसाठी कोडार फार्मला भेट देत. यंदा मे महिना अर्ध्यावर आला तरी कलमांना खूपच कमी मागणी आल्याचे, कृषी अधिकाऱयांनी सांगितले.

 16 हजार काजू कलमांचे उत्पादन

 आंबा, काजू, कवाथे व अन्य बागायती झाडांच्या उत्पादनासाठी कोडार कृषी फार्म हे राज्यातील महत्त्वाचे केंद्र मानले जाते. यंदा या फार्ममध्ये 16 हजार काजू, 16 हजार आंबा कलमे तसेच कवाथे व अन्य कलमे तयार करण्यात आली आहेत. काजूमध्ये वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 8, वेंगुर्ला 7 यासह बाळळी व तिसवाडी अशा पाच जातीच्या कलमांचा समावेश आहे. सध्या वेंगुर्ला 7 या जातीच्या काजू कलमांना अधिक मागणी आहे. आंब्यामध्ये तब्बल 16 विविध प्रकार असून त्यात गोमंतकीय मानकुरादबरोबरच इतर राज्यात प्रसिद्ध असलेल्या आंब्याची कलमे तयार करण्यात आली आहेत. नारळाच्या कवाथ्यामध्ये बाणावली हा प्रकार आहे. शिवाय सुपारीमध्ये सध्या जास्त मागणी असलेली मोहितनगर व मंगला या जातीची कलमे उपलब्ध करण्यात आली आहेत.

भाजी बियांण्याची विक्री

 गोव्यातील या मुख्य बागायती पिकांबरोबरच कोडार फार्ममध्ये भाजीच्या लागवडीवरही काही प्रयोग करुन त्यांची बियाणे वितरीत करण्यात आली आहेत. हळसांडय़ाचे वाल, काकडी, सात शिरांची गोमंतकीय भेंडी व शेवग्याच्या शेंगाचे उत्पादन करुन त्यांची बियाणे शेतकऱयांना वितरीत करण्यात आली आहेत. सरकारच्या पश्चिम घटी योजनेतंर्गत शेवग्यांच्या शेंगाचे उत्पादन करुन त्यांचे बियाणे वितरीत करण्यात आले आहे. येणाऱया काळात फणस, पेरु व अजून सुधारीत जातीच्या काजू कलमांवर भर देण्याचा फार्मचा प्रयत्न आहे. शिवाय ड्रेगन प्रूट व सोरसुप म्हणजेच कॅन्सर प्रूट या औषधी फळांच्या लागवडीचा प्रस्ताव आहे.

रानटी जनावरांचा वाढता उपद्रव

कोडार कृषी फार्मचे एकूण क्षेत्रफळ 110 हेक्टर असून त्यापैकी साधारण 59 हेक्टर मध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. फार्मसमोर सर्वांत मोठी समस्या म्हणजे रानटी जनावरांचा वाढता उपद्रव. रानडुक्कर, गवेरेडे व मोरांकडून रुजत टाकलेल्या विविध कलमांचे अंकुर फस्त केले जात आहेत. शिवाय फार्मच्या सभोवताली पक्के कुंपण नसल्याने लोकांची घुसखोरीही फार्मचे अधिकारी व कर्मचाऱयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सन 2019 या आर्थिक वर्षांत कोडार फार्मने साधारण 40 हजाराहून अधिक कलमांची विक्री केली होती. त्यातून साधारण रु. 26 लाख 32 हजार एवढा महसूल प्राप्त झाला होता. सन 2020 मध्ये एप्रिल व मे या दोन महिन्यातच विविध कलमे व रोपांच्या विक्रीतून रु. 10 लाख 9 हजारांचा महसूल उपलब्ध झाला होता. यंदा एप्रिलपासून कलमे विक्रीला सुरुवात झाली तरी, त्याला खूपच कमी प्रतिसाद लाभला आहे. गेल्या दीड महिन्यात 3203 काजू, 1650 आंबा तर 534 नारळाच्या कवथ्यांची विक्री झालेली आहे.

Related Stories

मडगावचे उद्योजक राजेश तिंबलो यांचे मुंबईत निधन

Amit Kulkarni

शिक्षण खाते संचालकपदी दिलीप भगत यांची नेमणूक

Amit Kulkarni

नोकऱया द्याच..थकलेले पगारही चुकते करा !

Patil_p

भागिदार, ठेवीदारांचा विश्वास कायम ठेवल्यास पतसंस्थेची उन्नती

Amit Kulkarni

मेळावली वनसंपदेच्या रक्षणासाठी उद्या महिलांचे रक्षाबंधन

Omkar B

मोफत पाणी 50 टक्क्यांहून अधिक घरांना

Amit Kulkarni
error: Content is protected !!