तरुण भारत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाचा मुक्काम दहा तासांचा

सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान जाणवणार सर्वाधिक प्रभाव, जिल्ह्याला थेट तडाखा नसला, तरी उपद्रव मात्र निश्चित
जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता, सतर्कतेचे आदेश, पहाटे जिल्ह्यात प्रवेश, तर दुपारी दोननंतर सरकणार पुढे

प्रतिनिधी / ओरोस:

Advertisements

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून सायंकाळी उशिरा प्राप्त झालेल्या नव्या माहितीनुसार ‘तौक्ते’ वादळ रविवारी पहाटे चार वाजता गोव्याची सीमा ओलांडून सिंधुदुर्गच्या समुद्रात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सकाळी 9.10 च्या सुमारास या वादळाचा सर्वाधिक प्रभाव किनारपट्टीला जाणवणार असून दुपारी दोननंतर सिंधुदुर्गची किनारपट्टी ओलांडून ते गुजरातच्या दिशेने पुढे सरकरणार असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान या काळात किनारपट्टी परिसरात जोरदार पावसासह ताशी 60 ते 80 किमी वेगाने वारे वाहाण्याची शक्यताही हवामान तज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे पहाटे चार ते दुपारी दोन या काळात जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीवरील नागरिकांनी सर्वाधिक दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी धोक्याची शक्यता असलेल्या किनारपट्टी भागाची शनिवारी पाहणी केली व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे रुपांतर अतिकमी दाबाच्या पट्टय़ात होऊन अखेर त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. ‘तौक्ते’ नावाच्या या चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील वेंगुर्ले, मालवण, देवगड व विजयदुर्ग तालुक्यातील भागाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या किनारपट्टीवरील 38 गावांमध्ये अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग किनारपट्टीपासून दूर असलेल्या या वादळाचे परिणाम दिसू लागले असून शुक्रवारी मध्यरात्री जिल्हय़ाच्या विविध भागात गडगडाटासह पाऊस झाला. मालवण – 27 मि. मी., वैभववाडी चार मि. मी., कुडाळ पाच मि. मी., दोडामार्ग 20 मि. मी., सावंतवाडी 12 मि. मी., तर वेंगुर्ले 18 मि. मी. असा पाऊस झाल्याची नोंद आहे. शनिवारी दिवसभरात वातावरण ढगाळ राहिले, तर काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला.

गुजरातवर आघात होण्याची शक्यता

हे वादळ दक्षिण गोव्यापासून 350 किमी अंतरावरून मध्यपूर्वेच्या दिशेने सरकत असतानाच हळूहळू त्या वादळाचा प्रभाव वाढत जाणार असल्याची भीती हवामान तज्ञांनी वर्तविली आहे. म्हणजेच जसजसं हे वादळ पुढेपुढे सरकत जाईल तसतसे त्याचे रुपांतर ‘हेवी सिव्हिअर स्ट्रँम’मध्ये होणार आहे. म्हणजेच शनिवारी जरी हे वादळ काहीसे सौम्य वाटत असले, तरी रविवारी ते अधिक उग्र रुप धारण करणार असल्याची दाट शक्यता आहे. 15 रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून 16 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या वादळाचा प्रभाव सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर दिसून येणार आहे. खोल समुद्रात हे वादळ अतिउग्र स्वरुप धारण करणार असले, तरी ते दूर अंतरावरून जाणार असल्याने त्याचा मोठा प्रभाव सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर जाणवणार नाही. थोडक्यात मागील वर्षी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर उत्पात माजवणाऱया ‘निसर्ग’ या वादळापेक्षा या वादळाचा कमी प्रभाव जाणवणार असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले.

आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांक

मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्र कक्ष – 02362 – 228847 किंवा टोल फ्री-1077 ला संपर्क करावा, तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्मयासाठी 02363 – 256518, सावंतवाडी तालुक्मयासाठी 02363 – 272028, वेंगुर्ले तालुक्मयासाठी 02366 – 262053, कुडाळ तालुक्मयासाठी – 02362 – 222525, मालवण तालुक्मयासाठी – 02365 – 252045, कणकवली तालुक्मयासाठी 02367 – 232025, देवगड तालुक्मयासाठी 02364 – 262204, वैभवाडी तालुक्मयासाठी 02367 – 237239 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष 02362 – 228847 किंवा टोल फ्री 1077 या क्रमांकावर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गला मोठय़ा तडाख्याची शक्यता कमी

अरबी समुद्रात घेंगावणारे ‘तौक्ते’ वादळ कोकणच्या दिशेने सरकत असले तरी कोकण किनारपट्टीपासून ते साधारणपणे 350 किमी अंतरावरून ते गुजरातच्या दिशेने सरकणार असल्याने या वादळाचा थेट तडाखा कोकण किनारपट्टीला म्हणजेच सिंधुदुर्गला बसणार नसल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे. हे वादळ गुजरात किनारपट्टीवर ‘लँडफॉल’ करण्याची शक्यता असल्याने या वादळाचा तडाखा गुजरातला बसू शकतो. हवामान खात्याने ताशी 60 ते 80 कि. मी. वेगाचे वारे वाहणार असल्याची शक्यता वर्तविली असली, तरी प्रत्यक्षात कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस व ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या वाऱयांचा प्रभाव किनारपट्टीपासून दोन ते तीन किमी क्षेत्रात जाणवू शकतो, असा अंदाज काही हवामान तज्ञांनी वर्तवीला आहे. 

Related Stories

निकालाच्या आनंदाला विद्यार्थी मुकणार

NIKHIL_N

पालघरमध्ये लागणारी 3 लाख काजू कलमे सिंधुदुर्गातून घ्यावीत!

NIKHIL_N

मणेरी नदीचे पाणी नेणाऱ्या पाईप लाईनचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत

Ganeshprasad Gogate

सरपंच, ग्रामसेवकांना बुधवारपासून कोरोना लस

NIKHIL_N

येत्या 1 महिन्यानंतर मच्छीमारांना क्यार वादळाची नुकसानी मिळणार

NIKHIL_N

चोरटय़ाने घरातील 3 लाखाचा मुद्देमाल लांबवला

Patil_p
error: Content is protected !!