तरुण भारत

गाझावरील हल्ल्यात एपीची इमारत उध्वस्त

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष चिघळला, अमेरिकेचे मध्यस्थीचे प्रयत्न

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

इस्रायलने पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीतील अनेक स्थानांवर केलेल्या वायुहल्ल्यात एपी (असोशिएटेट प्रेस) या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेची इमारत उध्वस्त झाली आहे. याच इमारतीत इतर वृत्तसंस्थांची कार्यालयेही होती. इस्रायलच्या या शनिवारच्या हल्ल्यात अन्य अनेक इमारती कोसळल्या असून 5 बालकांसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेने मध्यस्थीचे प्रयत्न चालविले आहेत.

हल्ला होण्यापूर्वी या एपीच्या इमारतीतील लोकांना इमारत सोडण्याची सूचना करण्यात आली होती. या सूचनेनंतर एक तासाने हल्ला झाला. इमारतीत यावेळी कोणीही नव्हते. त्यामुळे जीवीतहानी झाली नाही. तथापि, यंत्रसामग्री आणि इतर साधनांची हानी झाली. इमारत पूर्ण नष्ट झाल्याने काही काळ या वृत्तसंस्थांच्या कामकाजावर परिणाम झाला होता, अशी माहिती देण्यात आली. याच इमारतीत अल् जझीरा या इस्लामी वृत्तसंस्थेचेही कार्यालय सुरू होते.

शनिवारी इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेला पुन्हा लक्ष्य केले. या संघटनेच्या अनेक आस्थापनांवर अचूक हल्ले करण्यात आले. यामुळे हमासची मोठी हानी झाली असून संघटनेच्या गुप्त कारवायांना खीळ बसली आहे, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. इस्रायलने गेल्या पाच दिवसांमध्ये किमान 80 वायुहल्ले चढविले आहेत. यात त्याच्या 160 युद्धविमानांनी भाग घेतला आहे.

अमेरिकेचे प्रयत्न सुरू

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष शिगेला पोहचल्याने अमेरिकेने मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेचे  दूत हॅडी अम्र इस्रायलला भेट देण्यासाठी निघाले असून ते या देशाच्या प्रशासनाशी चर्चा करणार आहेत. पॅलेस्टाईन नेतृत्वाशीही बोलणी करण्याची अमेरिकेने तयारी केली आहे. संघर्षाचे रुपांतर पूर्ण युद्धात झाल्यास मध्यपूर्वेवर पुन्हा अशांततेचे ढग निर्माण होतील, अशी शक्यता आहे.

हमासकडून अग्निबाणांचा वर्षाव

गेल्या सोमवारपासून हमासने इस्रायलची राजधानी तेल अवीववर अग्निबाणांचा वर्षाव चालविला आहे. तथापि, इस्रायलने लोह कवच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वतःचा प्रभावी बचाव केला. केवळ काहीच अग्निबाण नागरी वस्त्यांमध्ये कोसळले. त्यात आतापर्यंत पाच इस्रायली नागरीकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

प्रत्युत्तरासाठी वायुहल्ले

हमासने नागरी वस्त्यांवर केलेल्या अग्निबाण हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने वायु हल्ले केले असे सांगण्यात आले. अशाच एका हल्ल्यात शनिवारी एका इमारतीतील पाच बालके आणि दोन व्यक्ती ठार झाल्या. हमास लहान मुलांना पुढे करून त्यांच्या आड आपल्या हिंसक कारवाया चालवित आहे. त्यामुळे आमच्यासमोर कठोर प्रत्युत्तर दिल्याशिवाय गत्यंतर नाही, असे इस्रायलने स्पष्ट केले.

आसरास्थळी पलायन

पॅलेस्टाईनमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अनेक आश्रयस्थळे निर्माण केली आहेत. इस्रायलच्या वायुहल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पॅलेस्टाईनी नागरीकांचे या आश्रयस्थळी पलायन सुरू झाले आहे. आतापर्यंत 6 हजारांहून अधिक नागरीक या स्थानांमध्ये आले असून त्यांच्या आहाराची व औषधांची व्यवस्था येथे करण्यात आली असल्याची माहिती संयुक्त राष्ट्र संघाकडून देण्यात आली.

Related Stories

हिंदी महासागरात प्रचंड इंधनगळतीचा धोका

Patil_p

चार्ली हेब्दोच्या जुन्या कार्यालयाजवळ चाकूहल्ला; चार जखमी

datta jadhav

अफगाणिस्तानच्या बंडखोर बीबी आयशा यांची शरणागती

Patil_p

विदेशींना यंदा हज यात्रा मुकणार!

Patil_p

फ्रान्स : पोलीस ठाण्यातच चिरला महिला अधिकाऱ्याचा गळा

datta jadhav

चीनमध्ये हजारो लोकांना बॅक्टेरियल इन्फेक्शन

Patil_p
error: Content is protected !!