तरुण भारत

हिंडलगा, मण्णूर, बेनकनहळ्ळी, आंबेवाडीत कडक लॉकडाऊन

वार्ताहर/ हिंडलगा

कोरोना महामारीचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी शहराच्या बाजूला असलेल्या हिंडलगा, आंबेवाडी, मण्णूर, बेनकनहळ्ळी, सावगाव, गणेशपूर आदी गावांतील नागरिकांनी व ग्राम पंचायतीने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत ठराविक दिवस परिसरात कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला असून कोरोना महामारीचे गांभीर्य दिसून येत आहे.

Advertisements

कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी प्रथमतः मण्णूर गावातील पंचकमिटी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार दि. 14 पासून रविवार दि. 16 पर्यंत तीन दिवस कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गावातून शहराला व आजूबाजूच्या गावांना जोडणारे सर्व संपर्क रस्ते झाडाच्या फांद्या टाकून बंद करण्यात आले आहेत. केवळ अतिमहत्त्वाच्या सुविधा वगळता इतर वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हिंडलग्यात आठ दिवस कडक लॉकडाऊन

हिंडलगा ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. परिसरात झपाटय़ाने कोरोनाचा प्रसार झाल्याने काही लोकांचा हकनाक बळी गेला आहे. शिवाय दैनंदिन रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्राम पंचायत व नागरिकांच्या सल्ल्यानुसार रविवार दि. 16 पासून दि. 23 मेपर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दवाखाने, मेडिकल, दूध विक्री केंद्रे वगळता सर्व किराणा दुकाने, हॉटेल, बार, कापड दुकाने व इतर साहित्याची दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार हिंडलगासह पंचायत कार्यक्षेत्रातील विजयनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर, गोकुळनगर, श्रीनाथनगर, कलमेश्वरनगर आदी भागातील व्यापाऱयांना सूचना करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊन काळात नियमभंग करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळून सहकार्य करावे, असे आवाहन ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी शनिवारच्या बैठकीत केले आहे.

बेनकनहळ्ळी पंचायत कार्यक्षेत्रात सोमवारपासून कडक लॉकडाऊन

बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात पसरणाऱया कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने शनिवार दि. 15 रोजी ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत सोमवार दि. 17 पासून सोमवार दि. 24 पर्यंत कार्यक्षेत्रातील बेनकनहळ्ळी, सावगाव, गणेशपूर, सरस्वतीनगर, ज्योतीनगर, क्रांतीनगर व परिसरात कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात फक्त दवाखाने, मेडिकल सुरू राहतील. दूधविक्री घरोघरी सेवा द्यावी लागणार तर भाजीपाला देखील दुपारी 12 वाजेपर्यंत फिरून विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन आपली दुकाने बंद ठेवून लागल्यास घरपोच सेवा देण्याचे आवाहन ग्राम पंचायत व अध्यक्षा प्रेमा हिरोजी, उपाध्यक्षा अंजना नाईक व पीडीओ सुजाता बटकुर्की यांनी केले आहे.

आंबेवाडीत पंचांकडून देवाला साकडे

आंबेवाडीतील देवस्की पंच कमिटीने जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. तसेच देशासह संपूर्ण जगाला या संकटातून कायमचे मुक्त करण्यासाठी ग्रामदैवत श्री घळगेश्वर मंदिरात प्रार्थना करून साकडे घालण्यात आले. याशिवाय शनिवार दि. 15 पासून मंगळवार दि. 18 पर्यंत गावामध्ये कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

मनपा आरोग्य केंद्रांना टाळे, लसीकरण मोहिमेत अडथळा

Patil_p

खासबाग येथे मटका अड्डय़ावर छापा

Patil_p

कोल्हापूर-बेळगाव पेट्रोल दरात 6 रुपयांची तफावत

Patil_p

धमकी देवून अल्पवयीन मुलीचे अपहरण

tarunbharat

भाजप कार्यकर्त्यांनी केली मलप्रभेच्या घाटाची स्वच्छता

Amit Kulkarni

भविष्यात हिंदूराष्ट्राची स्थापना होणारच

Patil_p
error: Content is protected !!