तरुण भारत

कोल्हापूर : कोरोनाने घरीच मृत पावलेल्या दोन आजोबांवर अंत्यसंस्कार

बैतूलमाल कमिटीच्या कार्यकर्त्यांकडून संकटकाळात कौतुकास्पद कार्य : पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचेही योगदान

संजीव खाडे / कोल्हापूर

Advertisements

कोरोनाच्या पहिल्या संकटकाळात बैतूलमाल कमिटीच्या कार्यकर्त्यांनी कोरोनामुळे जीव गमवावा लागलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य केले होते. आता दुसऱया संकटातही बैतूलमालचे कार्यकर्ते धाडसाने पुढे येत हे कार्य पुढे नेत आहेत. गेल्या चार दिवसांत या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संसर्गामुळे घरीच मृत झालेल्या दोन वृद्धांवर अंत्यसंस्कार करण्याचे पुण्यकार्य पार पाडले. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य कर्मचारी आणि पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचीही लाखमोलाची साथ लाभली.

रमजान ईदच्या दोन दिवस आधी बुधवारी महाडिक माळ येथील एका वृद्ध व्यक्तीचा कोरोनाने घरीच मृत्यु झाला. घरातील सर्व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मृत आजोबांवर अंत्यसंस्कार कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला. आजोबाचा मृत्यु होऊन सहा तास लोटले होते. बैतुलमालच्या जाफरबाबांना ही घटना समजली. ते तातडीने माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, राजू नदाफ, वासिम चाबुकस्वार, सैफुल्ला मलबारी, जाबीर मोहन मलबारी, मुआज मणेर कार्यकर्त्यांसह मृत आजोबांच्या घरी दाखल झाले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते सागर तहसिलदार उपस्थित होते. या सर्वांनी घरच्या सदस्यांना धीर देत अंत्यसंस्काराची तयारी केली. आजोबांचा मृतदेह कोरोनाच्या नियमानुसार पॅक करण्यात आला. तेथून शववाहिकेतून मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीतील नेण्यात आला. तेथे हिंदू धर्माच्या रितीरिवाजानुसार आजोबांच्या पार्थिवावर रात्री दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाडिक माळ येथील आजोबांपाठोपाठ शिवाजी पेठेतील एका आजोबांचे शनिवारी कोरोनाने घरीच निधन झाले. त्यांच्याही घरचे सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह  होते. त्यामुळे अंत्यसंस्कार कुणी आणि कसे करायचे? असा बाका प्रसंग निर्माण झाला. स्थानिक माजी नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बैतुलमालचे जाफरबाबा यांचेशी चर्चा केली. त्यानंतर मुल्लाणी यांच्यासह राजू नदाफ, मौलाना आकीब मालदार, नईम पठाण आदी बैतुलमालचे कार्यकर्ते शिवाजी पेठेत पोहचले. तेथे माजी नगरसेविका जयश्री चव्हाण यांच्यासह महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे, आरोग्य निरीक्षक शिंदे सर्व साहित्यासह उपस्थित होते. घरी असलेल्या आजोबांच्या मृतदेहावर बैतुलमालच्या कार्यकर्त्यांनी हिंदू धर्म परंपरेनुसार सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर आवरण घालून मृतदेह पॅक केला. त्यानंतर तो अंत्यसंस्कारसाठी शववाहिकेतून पंचगंगा स्मशानभूमीत पाठविण्यात आला. तेथे स्मशानभूमीतील कर्मचाऱयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. 

करवीर नगरीत माणुसकी आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन

बैतुलमाल कमिटीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनाही धीर दिला. यातून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीतील हिंदू-मुस्लिम यांच्यातील सामाजिक ऐक्याची वीण आणखीन घट्ट झाली. माणुसकीचेही दर्शनही घडले.

जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी

बैतुलमाल कमिटीच्या वतीने समाजातील गोरगरीब, गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. कोरोनाच्या संकट काळातही हे कार्य सुरू आहेत. जीवंत माणसाला घास भरविणारे बैतुलमालचे कार्यकर्ते कोरोनामुळे मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करत आहेत. जीवंत असताना आणि मृत्युनंतरही बैतुलमालची साथ कायम आहे.

Related Stories

इचलकरंजीतील बालक कोरोना निगेटिव्ह

triratna

कोल्हापूर : विजेच्या धक्क्याने सांगरुळातील तरुणाचा मृत्यू

Shankar_P

रूग्णवाहिका लावायची असेल तर पावती फाडा

triratna

कोल्हापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना पुरस्कार

triratna

कोल्हापूर : अज्ञातांकडून ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकास बेदम मारहाण

triratna

कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह संख्या 507 वर

triratna
error: Content is protected !!