तरुण भारत

देशात सक्रिय रुग्णांमध्ये झपाटय़ाने घट

दिवसभरात 3.11 लाख बाधित- 3.62 लाख रुग्णांना डिस्चार्ज

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लागला असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. डिस्चार्जच्या वाढत्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाच्या दुसऱया लाटेची स्थिती स्थिरावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आकडेवारीवरून काही राज्यांमध्ये चिंतेची स्थिती दिसत असली तरी काही राज्यांमध्ये स्थिती बऱयापैकी सुधारत असल्याचे संमिश्र चित्र देशात पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 11 हजार 170 रुग्ण आढळले असून 3 लाख 62 हजार 437 इतक्या रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या खाली आली आहे. परंतु गेल्या 24 तासात 4 हजाराहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट असताना आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात तीन लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर साडेतीन लाखाहून अधिक रुग्ण बरेही झाले आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे निर्माण झालेली भयावह परिस्थिती स्थिरावत चालल्याचा दावा केंद्र सरकारने केला. तसेच परिस्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सरकारने म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात एकूण रुग्णांची संख्या 2 कोटी 46 लाख 84 हजार 77 वर पोहोचली आहे. शनिवारी दिवसभरात देशात 4 हजार 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांची संख्या 2 लाख 70 हजार 284 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 3 लाख 62 हजार 437 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 कोटी 7 लाख 95 हजार 335 रुग्ण बरे झाले असून सध्या 36 लाख 18 हजार 458 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत 18 कोटी 22 लाख 20 हजार 16 कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

कोरोना संकटात देशातील स्थिती स्थिरावत असून परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारकडून आणखी प्रयत्न केले जात असल्याचे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 85 टक्के रुग्ण हे 10 राज्यांतील असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सद्यःस्थितीत देशातील 11 राज्यांमध्ये एक लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. 17 राज्यांमध्ये अशा रुग्णांची संख्या 50 हजारांहून कमी असून 8 राज्यांत ही संख्या 50 हजार ते एक लाखदरम्यान आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि छत्तिसगडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. पण त्याचवेळी या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दरदेखील वाढत चालला आहे. कोरोनामुक्त होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 83.83 इतका झाला आहे.

Related Stories

28 एप्रिलपासून होणार लसीकरणासाठी नोंदणी

Patil_p

केजरीवालांनी फाडल्या कृषी कायद्यांच्या प्रति

Patil_p

चिंताजनक : कोरोनाने होणाऱ्या मृत्यू दरात देशातील ‘हे’ राज्य अग्रस्थानी

Rohan_P

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा जागीच मृत्यू

Rohan_P

यूपी : 38 जिल्हे झाले कोरोनामुक्त; मागील 24 तासात 93 नवे बाधित

Rohan_P

अयोध्या : राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न

datta jadhav
error: Content is protected !!