तरुण भारत

तौक्तेचा जिल्हय़ाला तडाखा

वादळी वाऱयासह पश्चिम भागासह जिल्हय़ात पावसाची रिपरिप

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

तोक्ते चक्रीवादळाचे संकट संपूर्ण राज्यावर घोंगावते आहे. रविवारी सकाळपासून सातारा तालुक्याच्या पश्चिम भागासह पाटण, जावली, कोरेगाव उत्तर, वाई, महाबळेश्वर या तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु होती. सातारा शहरावर सुद्धा पावसापेक्षा वाऱयाचा वेग जास्त जाणवत होता. वाहणाऱया वाऱयामुळे सातारा शहरात कोठेही नुकसान झाले नसल्याचे समजते. दरम्यान, सातारा तालुक्यासह जिह्यात अनेक ठिकाणी झाडे पडून वाहतुकीस अडथळा झाला होता. त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकारही ठिकठिकाणी झाले. पाटण तालुक्यातील शिबेवाडी येथे घराची भिंत कोसळली, तर कोयनानगर येथील बाजार तळावरील व्यापाऱयांसाठी उभारलेले दुकानगाळय़ांचे शेड जमीनदोस्त झाले. त्याचबरोबर चक्रीवादळामुळे घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.

तौक्ते हे वादळ येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सातारा शहरासह जिह्यामध्ये हवामान खात्याने वादळी वारे व पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार जिह्यात सकाळपासूनच सातारा, वाई, पाटण, जावली, कोरेगाव आदी तालुक्यातील काही ठिकाणी पावसाची सुरुवात झाली. वाऱयाचा वेगही जोरात होता. सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात विशेष करुन परळी भागात पावसाच्या सरी कोसळल्या. तर कास परिसरात वाऱयाचा वेग जास्त होता. कण्हेर वेळेकामथी परिसरातही दुपारी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. सातारा शहरात केवळ वेगाने वाहणाऱया वाऱयाची प्रचिती सातारकरांना आली. कोरोनाच्या ब्रेक डाऊनमुळे सातारकर घरातच होते. या वाऱयामुळे कोठेही नुकसान झाले नाही अशी माहिती सातारा पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली.

जिह्यात वाई तालुक्यातील नागेवाडी, दरेवाडी, बावधन, या भागासह वयगाव,  दह्याट या भागात तर जावली तालुक्यात भणंग, ओझरे, निझरे, मेढा, कुडाळ, सायगाव या परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. त्याचबरोबर चक्रीवादळाचा वेग जास्त असल्याने घरावरील पत्रे उडून जाण्याच्याही घटना घडल्या आहेत. पाटण तालुक्यातील तारळे, सडावाघापूर, मुरुड, आवर्डे, निवकणे या परिसरात वाऱयासोबत पाऊस झाला. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पिंपोडे, सोळशी, सोनके, चवणेश्वर या भागात पावसाचा शिडकाव झाला. झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र काही ठिकाणी त्रेधा झाली.

वाठारकिरोली परिसरात पावसांची बॅटिंग

तोक्ते या वादळामुळे कोरेगाव तालुक्यातील सकाळपासून रिपरिप सुरु होती. वाठारकिलोरी परिसरात तारगाव, टकले बोरगाव, अपशिंगे या गावातही पावसाने शेतात कामाला गेलेल्या शेतकऱयांची चांगली पळापळ करुन दिली. सकाळपासून काही शेतकऱयांनी पावसाची चिन्हे दिसत असल्याने शेतात जाणे टाळले होते. वाठार किरोली परिसरात दुपारी बॅटींग केली.

कराडमध्ये लसीकरण केंद्रावर झाड कोसळले

कराड शहरासह तालुक्यालाही तौक्ते वादळाचा फटका बसला. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारीही अधूनमधून सुरू होता. शनिवारी रात्री वादळी वाऱयासह झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर झाड कोसळले. रविवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रविवारी सकाळी पडलेले झाड बाजूला काढून, पत्र्याची किरकोळ दुरुस्ती करून लसीकरण सुरू करण्यात आले.

 शिबेवाडी येथील घराची भिंत कोसळली

तळमावले ः गेले दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. काल संध्याकाळी 6 नंतर जोरदार वायासह पावसाने लोकांची चांगलीच धांदल उडवली. या पाऊस व वायामुळे गुढे येथील शिबेवाडी (वरची) गावचे रहिवाशी श्रीमती शांताबाई निवृत्ती शिबे घराची भिंत शनिवार दि. 15 मे, 2021 रोजी सायंकाळी 6 च्या आसपास खाली कोसळली आहे. या घरामध्ये शांताबाई शिबे आणि त्यांचा नातू हे दोघे राहतात. सुदैवाने या भिंतीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सदर भिंत पडल्यामुळे या कुटूंबाचे बरेच नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई मिळावी अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोयनेला तडाखा ,बाजार गाळे जमिनदोस्त

कोयनानगरः तौत्के चक्री वादळाचा परिणाम कोकण किनार पट्टीसह सातारा जिह्यातील कोयना परिसरातही दिसून आला असून कोयनानगर येथील बाजार तळ येथील व्यापाऱयांसाठी उभारण्यात आलेले दुकान गाळे/शेड  या वादळी वाऱयाने उडाले असून त्यावर असणारा सिमेंट पत्रा फुटला असून लोखंडी पाईपही उन्मळून पडल्या आहेत. या वादळी वाऱयामुळे परिसरातील लोकांची झोपच उडाली असून घराचे छत उडून जातेय का? घरावर झाड कोसळतय का? अशा भितीने जनता भयभीत झाली आहे. या वादळी वाऱयामुळे कोयनानगर येथील बाजार तळ येथे कोयना प्रकल्पाच्या वतीने बाजार गाळे (शेड) उभे केले होते त्यापैकी काही शेड या वादळी वाऱयाने उडून गेली. शेडवर असणारा सिमेंट पत्रा फुटून चक्काचूर झाला तर त्याला असणाऱया लोखंडी पाईपही उन्मळून पडल्या आहेत. या व्यतीरिक्त या वादळी वाऱयामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रवीवारी दिवसभर वादळी वाऱयासह पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळाला.

Related Stories

ट्रॅक्टर व रोख रक्कम घेऊन ऊसतोड मुकादमाचा पोबारा

Shankar_P

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात : उदय सामंत

pradnya p

जिल्ह्यात नव्याने ४२ कोरोना बाधित, रामवाडी येथील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यु

triratna

महाबळेश्वरमधील हवामानाच्या अचूक निरीक्षणास धोका

Patil_p

सातारा : अखेर चाकरमानी धरू लागले शहराची वाट

Shankar_P

शिरोळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा

Shankar_P
error: Content is protected !!