तरुण भारत

कोरोना महामारीः आता सब कुछ रामभरोसे

येता काळ ‘सब कुछ रामभरोसे’ आहे असेच दिसत आहे. पुढील काळात देशाचीच कसोटी लागणार आहे. रामाच्या नावाने जे सत्तेवर आले त्यांच्यात काहीच राम नाही असे दिसू लागले आहे.

कोरोनाची त्सुनामी देशभर थैमान घालत असताना गुजरातमधील एका प्रमुख वर्तमानपत्राने गेल्या आठवडय़ात एक धक्कादायक बातमी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहराज्यात 1 ते 10 मे या केवळ दहा दिवसांच्या दरम्यान मागील वषीपेक्षा 65,000 लोक जास्त मरण पावले आहेत. गेल्या वषी या काळात केवळ 58,000 मृत्यू दाखले दिले गेले होते ते या वषी 1 लाख 23 हजार दिले गेले. सरकारी आकडय़ानुसार या कालावधीत फक्त 4,280 लोक महामारीने मेले असा दावा केला गेला आहे. खरेखोटे देव जाणे. मोदींच्या गृहराज्यात हे हाल तर उत्तर प्रदेशातदेखील या त्सुनामीने थैमान माजवले आहे. इतके की गंगेत शेकडो प्रेते तशीच सोडून देण्यात आली आहेत आणि त्यातील काही वाहून बिहारमध्ये पोचली आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची नोंद घेतली आहे तर सर्वोच्च न्यायालय याबाबत येत्या आठवडय़ात भूमिका घेऊ शकते. सध्या सर्वोच्च न्यायालयाकडे ही केस पडून आहे कारण ती ऐकणारे न्यायमूर्तीच कोरोनाबाधित झालेले आहेत. सर्वोच्य न्यायालयात देखील या महामारीचा एवढा प्रसार झाला आहे की काही न्यायमूर्तींचा सगळा स्टाफच त्यामुळे आडवा झालेला आहे. शेजारील उत्तराखंडमध्ये कुंभमेळा झाल्याने आणि उत्तर प्रदेशात नुकत्याच पंचायत निवडणुका घेतल्याने ही महामारी खेडय़ापाडय़ापर्यंत पोचली आहे. तिथे आरोग्य व्यवस्था अभावानेच असल्याने लोक पटापट मरत आहेत. गंगा किनाऱयावरील राज्यातील 27 जिल्हय़ातून किमान 2,000 प्रेते नदीत टाकण्यात आली असे आता उघड झाले आहे. त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कारभार हडेलहप्पी असल्याने सारे चित्र बाहेर येत नाही. पण राज्य भाजपमध्येच त्याने रणकंदन माजले आहे. मुख्यमंत्र्यांविरुद्ध वातावरण बनत चालले आहे. भाजपचा सर्वात दमदार मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱया योगींची परीक्षा सुरू झाली आहे. 8-9 महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. देशातील सर्व नागरिकांना, अबालवृद्धांना लवकरात लवकर लस दिल्याशिवाय या महामारीवर दुसरा प्रभावी तोडगा नाही. पण प्रत्यक्षात काय पहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये देखील लसीकरण मोठय़ा प्रमाणावर सुरू झालेले नाही कारण सर्व देशाप्रमाणे राजधानीच्या शहरातदेखील पुरेशी लस उपलब्ध नाही. आता येथील काही पॉश हॉस्पिटल्समध्ये येत्या काही दिवसात रशियाची स्पुटनिक व्ही लस मिळणार आहे पण ती फक्त श्रीमंतांसाठी असेल असे दिसत आहे. कारण या लसीकरता 1,000 रु. द्यावे लागणार आहेत. सध्या देशातील लसींचे उत्पादन महिना तीन कोटींच्या घरात आहे आणि ते 10 कोटी होण्याला काही महिन्याचा अवधी आहे. याचा अर्थ देशातील सर्व 130 कोटींना लस द्यायची असेल तर किमान डिसेंबर तरी उजाडेल. ऑगस्टपर्यंत या महामारीची महाभयंकर अशी तिसरी लाट येणार आहे असे तज्ञ सांगत आहेत. अशा वेळेला जर तोपर्यंत सर्वाना लस दिली गेली नसेल तर देशाला भयानक संकटाला तोंड द्यावे लागू शकते हे सांगायला कोणा पंडितांची जरुरी नाही. जुलैपर्यंत 51 कोटी लोकांना लस दिली जाईल असे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. चीनने आपल्या दुपटीपेक्षा जास्त लस आत्तापर्यंत दिली आहे तर अमेरिकेनेदेखील आपल्यापेक्षा जास्त असे 26.8 कोटी डोस दिले आहेत.  ‘मोदीजी, तुम्ही आमच्या मुलांची लस विदेशी का पाठवली’ अशी दिल्लीत भित्तीपत्रके लावणाऱया 17 जणांना पोलिसानी अटक करून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे कारण देशाच्या सर्व नागरिकांना लस देण्याची जबाबदारी केंद्राची आहे अशी भूमिका काँग्रेससह 12 विरोधी पक्षांनी घेतली आहे आणि या विषयावर भाजपा एकाकी पडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या महामारीत लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी एक व्याख्यानमाला सुरू करून मोदी हे सुपरमॅन राहिले नसून कॉमन मॅन झाले आहेत असाच संदेश दिलेला आहे. मोहनराव भागवत यांनी मोदींच्या मदतीला धावून येऊन एक सुरू झाली आहे. ‘नागपूर’कडे फारसे ढुंकून न बघणाऱया पंतप्रधानांना आता सहकार्याची गरज भासत आहे. मोदींच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला अगोदरच तडा गेला आहे आणि आता देशांतर्गत ते टीकेचे लक्ष्य झाले आहेत. 

Advertisements

‘परीक्षा पे चर्चा’  या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी हितगुज करताना पंतप्रधानांनी त्यांना प्रश्नपत्रिकेतील अवघड प्रश्न प्रथम सोडवायला सांगितले होते आणि एकदा का ते सुटले की सोप्या प्रश्नांचा फडशा पाडा असे मार्गदर्शन केले होते. आता या महामारीने पंतप्रधानांचीच परीक्षा सुरू झाल्यांचे दिसत असताना त्यांनी अवघड प्रश्नही सोडवले नाहीत आणि सोपे प्रश्नदेखील सोडवलेले दिसत नाहीत. भारत हिम्मत हारणारा देश नाही आणि तो या महामारीवर विजय मिळवेल आणि त्याकरता युद्धस्तरावर काम करत आहे असे पंतप्रधानांनी म्हटले असलेतरी जमिनी स्तरावर या सरकारने पावले उचलली नाहीत असे बऱयाच अंशी दिसत असल्याने येता काळ ‘सब कुछ रामभरोसे’ आहे असेच दिसत आहे. पुढील काळात देशाचीच कसोटी लागणार आहे कारण सरकार नावालाच उरले आहे. रामाच्या नावाने जे सत्तेवर आले त्यांच्यात काहीच राम नाही असे दिसू लागले आहे.

सुनील गाताडे

Related Stories

वसुदेवांची नारदमुनींना विनंती

Patil_p

कागदी मतपत्रिकेचा पर्याय!

Patil_p

भगवद्गीता…एक दीपस्तंभ

Omkar B

कोरोना लस घेण्याची भीती वाटण्याचे कारण नाही

Patil_p

हानिकारक गोष्टी

Patil_p

स्वयंशिस्तीची गरज

Patil_p
error: Content is protected !!