तरुण भारत

सध्या ती कोठे आहे…

किनारपट्टीवर वादळ घोंगावते आहे. खरीप हंगामाची धांदल सुरु झाली आहे. जोडीला कोरोना तांडव सुरुच आहे व महाराष्ट्राचे राजकारण तेजीत आहे. महागाई भडकते आहे. लॉकडाऊन नंतरही कोरोनाचा विळखा सैलावलेला नाही. कोरोना नवनवी रुपे घेतो आहे आणि लसीकरण करायचे तर ती सध्या कुठे आहे अशी लसीसंदर्भात विचारणा होते आहे. एकूणच पावसाळा आला तरी माणसाचे भोग संपताना दिसत नाहीत. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ घोंगावते आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह सांगली, कोल्हापूर, बेळगावची हवा बदलली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱयाने पाऊस व हानी पोहचली आहे. केरळ व कर्नाटकात अनेकांचे स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी जिह्यात रत्नागिरीसह, गुहागर, दापोली, मंडनगड परिसरात वादळाची भीती आहे. शासन व प्रशासनाने तयारी केली आहे. खरेतर यंदा पावसाचे वेळेवर आगमन होणार, यंदा चांगला पाऊस पडणार म्हणून सर्वत्र खुशी होती. अक्षय्य तृतीयेपासून खरीप हंगामाला प्रारंभ होतो. यंदा हंगामाच्या तोंडावर लॉकडाऊन आहे आणि महागाई रोज वाढते आहे. दुसरीकडे उद्योग, व्यवसाय, रोजगार अडचणीत आहे. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. बियाणे, खते, औषधे यांचीही भाववाढ झाली आहे. शेतकऱयांना खरीप हंगामासाठी पुरेसे वित्तसहाय्य हवे आहे. केंद्राने शेतकऱयांना जी मदत घोषित केली होती त्यातील शेवटचा हप्ता वर्ग केला आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱयांना पैशांची गरज आहे. अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱयांची देणी अद्याप दिलेली नाहीत. काही कारखान्यांनी एफआरपीचीही तोडफोड केली आहे. या पार्श्वभूमीवर जनतेच्या, लोकांच्या प्रश्नात लक्ष देण्याची आणि कार्यक्षम काम करण्याची गरज आहे. लसीकरण असो, औषध टंचाई असो वा सत्ताकारण सर्वच पक्षांना व नेत्यांना राजकारणात गती आहे. लोकसेवा, लोकहित याकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल हा विषय सतत चर्चेला जातो आहे. एक तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांचे भाजपा विरोधाचे हे मेतकूट इतके जमले आहे की आता हाच प्रयोग देशात करायचा व त्याचा समन्वय शरद पवारांनी साधायचा असे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे काही अघटित घडले तरच नाहीतर हे महाआघाडी सरकार पडण्याची शक्यता नाही. पण राजकारणात काहीही होऊ शकते. राजकारण आणि नाटक हे मराठी माणसांचे आवडीचे विषय आहेत. पण सर्वाना सर्वांत भय वाटते आहे ते कोरोनाचे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे काही ठिकाणी संचारबंदी, काही ठिकाणी कडक निर्बंध पण कोरोना विळखा सैल होताना दिसत नाही. मुंबईत कोरोना फैलाव रोखण्यात काहीसे यश आले असे वाटताना पश्चिम महाराष्ट्रात कहर होतो आणि कर्नाटक सावरु लागला असे वाटत असताना दिल्ली, पंजाबमध्ये भडका उडतो. कोरोनाचा जीवघेणा नाच थांबायला तयार नाही. कोरोनाचे नियम तर पाळलेच पाहिजेत पण कोरोनावर परिणामकारक मात करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिक, मध्यम वयोगट, तरुण आणि किशोर अशा सर्वांचे लसीकरण गतीने झाले पाहिजे पण लस उपलब्ध नाही. दोन लसीतील अंतर 45, 60, 80 दिवस असे वाढते आहे. लस मिळत नाही, उपलब्ध नाही अशी ओरड देशभर ऐकू येत आहे. जी गोष्ट लसीची तीच औषधाची, ऑक्सिजनची आणि समन्वयाची. गोव्यात ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून इतके गेले इथपासून रेमडीसिव्हरसाठी रांगा आणि काळाबाजार इथंपर्यंत रोज समोर येणाऱया बातम्या व घडणारे अपप्रकार आपण एकेकाळी महासत्तेची स्वप्न बघत होतो हे विसरायला लावणारे आहेत. 130 कोटीचा देश लसीकरण करुन सुरक्षित करणे हे मोठे काम आहे. व या कामात सर्वांचा सहभाग, समन्वय, संयम व सहकार्य गरजेचे आहे. काही गोष्टी राजकारण व सत्तेsपेक्षा महत्त्वाच्या असतात. माणुसकी आणि राष्ट्र म्हणून त्याकडे बघावे लागते. कोरोना संकट हे असेच मानवावर आलेले संकट आहे ते एकदिलाने, एकसंधपणे परतवावे लागेल त्यासाठी निर्धार व एकता हवी. कठोर शिस्त व संयम हवा. आगामी काळात सर्वांकडूनच अशा संयम, शिस्तीची अपेक्षा आहे. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी हाच भाव व्यक्त केला आहे. पहिल्या लाटेनंतर सावधानता व सतर्कता गरजेची होती हे त्यांचे सांगणे हितोपदेश आहे. आगामी काळात सर्वांनीच अधिक दक्ष व जागरुक राहून कोरोना विरुद्धचा हा लढा जिंकला पाहिजे. उद्योग, व्यापार, व्यवसाय, पर्यटन हे सारे अडचणीत असताना शेती साथ देईल. भारताची अर्थव्यवस्था सुधारेल असा कयास आहे. सुदैवाने यंदा पावसाचे अंदाज चांगले आले आहेत. शेतकऱयांना चांगले बियाणे, पुरेसे अर्थसहाय्य आणि खत व औषधांचा पुरवठा झाला तर शेतकरी कोरोनाच्या या संकट काळात किमया करुन दाखवतील. शासनाचे कागदोपत्री नियोजन व घोषणा झाल्या आहेत. पण त्या पलीकडे जाऊन शेती हंगामाची यशस्वीता यासाठी राज्य व केंद्र सरकारने जाणीवपूर्वक पावले टाकली पाहिजेत. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आणि तरुण नेते राजीव सातव यांचे निधन हा काँग्रेसला आणि महाराष्ट्राला मोठा धक्का आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्ती व अभ्यासू नेते म्हणून राजीव सातव यांची देशाला ओळख होती. चार वेळा त्यांना संसदरत्न पुरस्कार लाभला होता. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यात त्यांचा सहभाग होता. कोरोनातून ते बरे झाले पण पाठोपाठ न्यूमोनिया झाला अशा बातम्या येत होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण यश आले नाही. काँग्रेसच्या अडचणीच्या काळात पक्षाला हा मोठा फटका बसला आहे. त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Stories

ऐकोनि देवकी पडली धरणी

Patil_p

नव्या इतिहासाचा सरस्वती सन्मान!

Patil_p

नाना रत्ने नाना नाणीं! परीक्षून न घेतां हानी!

Patil_p

एनआरसी : केंद्र, आसाम सरकारला नोटीस

Patil_p

सोनम वांगचूक: वैकल्पिक विद्यापीठाचा कुलगुरु

Patil_p

न्यायदानाची नवीन पद्धतः वैकल्पिक वाद निवारण (एडीआर)

Patil_p
error: Content is protected !!