तरुण भारत

कर्नाटक किनारपट्टीला ‘तौक्ते’चा दणका

चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस : मंगळूर, उडुपी, कारवार जिल्हय़ांना मोठा फटका : चार जणांचा मृत्यू

Waves hit Bhagavathi Prem Sinken Dredger at Surathkal Beach near Mangaluru on Sunday.KPN### Mangaluru cyclone impact

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

अरबी समुद्रात ‘तौक्ते’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने कर्नाटक किनारपट्टी भागात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पाऊस होत आहे. रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उडुपी, मंगळूर आणि कारवार या जिल्हय़ांच्या किनारपट्टी भागात मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. यावेळी झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

चक्रीवादळाचा कर्नाटक किनारपट्टी भागालाही तडाखा बसला असून अनेक ठिकाणी मालमत्तेची हानी झाली आहे. या भागातील 73 गावांना दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फटका बसला आहे, अशी माहिती राज्य आपत्ती नियंत्रण प्राधिकारणाने दिली आहे. शनिवारी कर्नाटक किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ धडकल्याने तीन जिल्हय़ामध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मंगळूर जिल्हय़ाला बसला आहे. या भागातील उळ्ळाल आणि कापू येथील किनाऱयालगतची घरे, नारळाच्या बागांची मोठी हानी झाली आहे. अनेक ठिकाणी समुद्रकिनाऱयाची हानी होऊ नये, यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षक भिंतीची पडझड झाली आहे. चक्रीवादळामुळे आणखी तीन दिवस पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळूर जिल्हय़ात बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या तुकडय़ा दाखल झाल्या आहेत. किरोस कंपनीची कोरंगल एक्स्प्रेस वेसल बोट नवेमंगळूर बंदरात प्रवेश करण्याआधीच खडकाला धडकून अपघातग्रस्त झाली. नवे मंगळूर बंदरावर नांगर लावून थांबविण्यात आलेली वेसल बोट लाटांच्या तडाख्यात अडकली. परिणामी नांगर तुटून ही बोट कापू समुद्रकिनाऱयावर येऊन पोहोचली आहे. कापू लाईट हाऊसजवळील खडकाला आदळून ही बोट अपघातग्रस्त झाली आहे. या बोटीतील 9 कर्मचाऱयांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तटरक्षक दल, उडुपी जिल्हा पोलीस, किरोस कंपनीचे अधिकारी बचावकार्यात गुंतले आहेत.

उत्तर कर्नाटक, मलनाड भागात जोरदार पाऊस

चक्रीवादळामुळे राज्यातील उत्तर कर्नाटक आणि मलनाड भागातही जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे असंख्य घरे, झाडे उन्मळून पडली आहेत. मंगळूर, कारवार, माल्पे, होन्नावर, भटकळ आणि केरळच्या तिरुवनंतपुरम या भागात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माल्पे बीचवर लाटांच्या तडाख्यांमुळे अनके मच्छीमारी बोटींचे नुकसान झाले आहे. मंगळूरमधील सर्वच जिल्हय़ात पावसामुळे घरे, नारळांची झाडे व इतर बागायतींचे नुकसान झाले आहे. वादळामुळे वीजखांब जमिनदोस्त झाले असून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

उडुपी जिल्हय़ात 40 घरांची पडझड झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बैंदूर, मरवंते येथील 75 हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

कारवार जिल्हय़ात कुमठा तालुक्यातही वादळी वाऱयासह पाऊस होत आहे. मलनाड भागात मडिकेरी, पोन्नंपेठ, विराजपेठ, नापोक्लू, भागमंडल आणि तळकावेरी भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे कावेरी व इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिक्कमंगळूर जिल्हय़ातही दोन दिवस रेड अलर्ट घोषित करण्यात आले आहे.

भाजपाध्यक्षांनी घेतली माहिती

राज्यातील किनारपट्टी भागात झालेल्या नुकसानी संदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माहिती घेतली आहे. कर्नाटकासह विविध राज्यातील प्रमुख नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची संवाद साधला. कर्नाटकाचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची त्यांना माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांकडून बचावकार्याची सूचना

चक्रीवादळामुळे कर्नाटक किनारपट्टीवर झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी देखील माहिती घेतली असून हानी झालेल्या भागात बचावकार्य हाती घेण्याची सूचना त्यांनी संबंधित जिल्हा पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱयांना दिली आहे. चक्रीवादळामुळे उडुपी, मंगळूर आणि कारवार जिल्हय़ांच्या किनारपट्टी भागात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येडियुराप्पा यांनी रविवारी सकाळी तिन्ही जिल्हय़ांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱयांशी फोन करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच नुकसान झालेल्या भागांना भेट देऊन बचावकार्य आणि मदत देण्याची सूचना केली. मदतीसाठी संबंधित मंत्री किंवा थेट आपल्याशी संपर्क साधावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

राज्यात 20 मे पर्यंत पावसाचा अंदाज

चक्रीवादळ अरबी समुद्रात गोव्यापासून नैर्त्रुत्य दिशेला 120 कि. मीवर आहे. त्यामुळे कर्नाटकात 20 मे पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. 9 जिल्हय़ात ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. कारवार, उडुपी, मंगळूर, चिक्कमंगळूर, शिमोगा, हासन, कोडगू, बेळगाव, धारवाड जिल्हय़ांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्हय़ांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आल्याचे हवामान खात्याचे संचालक सी. एस. पाटील यांनी सांगितले.

Related Stories

कर्नाटक सरकारने ६ एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न केल्यास बेमुदत संप

Shankar_P

कर्नाटकात जुलैच्या तिसर्‍या आठवड्यात होणार एसएसएलसी परीक्षा

Shankar_P

कर्नाटक: केंद्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत करून मंत्रिमंडळ विस्तार करा

Shankar_P

आरटीई टास्क फोर्सचे सरकारला शाळा उघडण्याचे आवाहन

Shankar_P

रात्रीच्या संचारबंदीचा आदेश मागे

Omkar B

कर्नाटक: अमित शाह यांच्या दौर्‍यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता

Shankar_P
error: Content is protected !!