तरुण भारत

हरवलेली पिढी

तारुण्य. प्रत्येकाच्या आयुष्यातला सगळय़ात सुंदर, परिवर्तनीय आणि रोमांचक काळ. तुम्हाला तुमचे तारुण्य आठवते का? या काळात जे मित्र भेटतात आणि त्यांच्या बरोबर ज्या आठवणी बनतात, त्या आयुष्यभर लक्षात राहतात. हाच योग्य काळ असतो, आयुष्याचा पाया घालण्यासाठी! तारुण्यात माणूस इतकाही लहान नसतो की मूलभूत गरजांसाठी घरच्यांवर अवलंबून राहायला लागेल, तर इतकाही मोठा नाही की जबाबदाऱयांचे ओझे खांद्यावर पेलू शकेल. या काळात माणूस आपल्या आई-वडिलांच्या संरक्षणात्मक कवचामधून बाहेर पडून स्वतःचे स्वतंत्र आयुष्य आणि ओळख बनवत असतो. तारुण्यात भेटलेले मित्र, मिळालेल्या संधी, आणि अनुभव, हे माणसाच्या पुढील आयुष्याचा मार्ग ठरवतात.

अनेक तरुण तरुणी मनामध्ये खूप आकांक्षा घेऊन आपल्या शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात पदार्पण करतात. शेवटच्या परीक्षेसाठी अपार प्रयत्न करून संपूर्ण ऊर्जेने व्यावसायिक जीवनात पदार्पण करायचे स्वप्न पाहतात. जसा जसा शेवटचा महिना जवळ येऊ लागतो, तशा मिश्र भावना मनामध्ये येतात. परत मित्र-मैत्रिणी भेटतील का? नोकरी मिळेल का? आपण ही जबाबदारी पार पाडू शकू का?

Advertisements

सिनेमामध्ये बघितल्यासारखे पदवी घेताना काळा पोशाख घालून ती टोपी उडवून विद्यार्थी जीवनातून निरोप घ्यायची स्वप्ने अनेक तरुण तरुणी बघितात. एकदा तरी मित्रांच्या टोळी बरोबर गोवा ट्रिप करायची असे पक्के मनात ठरवतात. सर्व विद्यार्थी, नोकरी, पगार आणि प्रौढ जीवनाचा विचार करत असताना त्यांना येणाऱया आव्हानाचा अंदाजच नसतो.

संपूर्ण देश हा एका भयाण संकटाचा सामना करतो आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने कोणत्या ना कोणत्या अडचणीला सामोरा जात आहे. कोणीतरी नोकरी गमवत आहे, तर कोणीतरी आपली माणसं. पण या सगळय़ात तरुण पिढी कुठेतरी अदृश्य झाली आहे. तरुण म्हणजे ऊर्जेने आणि उत्साहाने भरलेली पिढी. घरातदेखील आपल्याला हेच सांगितले जाते की तरुण पिढीने दमून चालत नाही. तरुणांना विविध क्षेत्रात प्रयोग करायला अनेक संधी मिळतात ज्या मध्यमवयीन लोकांना नाही मिळत. पण या महामारीमध्ये तरुणांचे व्यावसायिक जीवनच नाही तर मनदेखील ठप्प पडले आहे. पदवी समारंभ हा कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातला सगळय़ात अभिमानाचा क्षण असतो. आपल्या कुटुंबाला प्रेक्षकांमध्ये टाळय़ा वाजवताना बघून जो आनंद मिळतो, तो शब्दात मांडता येणार नाही. पण मागच्या वषी, अगदी लोकडाऊनच्या मध्यात अनेकांनी अंतिम परीक्षा दिली आणि ऑनलाईन दीक्षांत समारोहाचा अनुभव घेतला. मित्र-मैत्रिणींबरोबर शेवटची परीक्षा झाल्यावर एकदा शेवटचा तो कॅन्टीनचा वडा पाव खाणे, एकमेकांना मन भरून मिठी मारणे, पुन्हा लवकरच भेटू असे वचन देणे, हे सगळे बहुमूल्य क्षण आमची पिढी गमावून बसली आहे. लॉकडाऊनमुळे सगळे विद्यार्थी आधीच घरी गेले होते आणि आता काय माहीत त्या मित्र-मैत्रिणींशी परत भेट कधी होईल. प्रसार माध्यमातून एकमेकांशी संवाद सुरूच असतो, आणि एकदा तरी ती गोव्याची सहल नक्की करू, असा दिलासा, आश्वासन एकमेकांना देत असतो.

प्रत्येक स्नातकाचे स्वप्न असते. शिक्षण झाल्यावर एका चांगल्या कंपनीत, बँकेत नोकरी, नाहीतर एखाद्या प्रख्यात परदेशी महाविद्यालयात प्रवेश. या सर्व स्वप्नांकडे उंच भरारी घेण्याच्या वयात तरुण पिढी जीवनाच्या या शर्यतीत कुठेतरी गहाळ झाली आहे.

अशा वेळेला, ऊर्जा आणि धैर्य असूनसुद्धा आजची तरुण पिढी अगतिक आहे. आई वडिलांना झगडताना बघत असताना हे विचार व्यक्त करणे योग्य वाटत नाही. कारण देशाला सध्या आर्थिक आणि मानसिक आधाराची गरज आहे.

भावना व्यक्त न केल्यामुळे, आज कित्येक तरुण मानसिक रोगाचे शिकार बनून राहिले आहेत. महामारीच्या काळात कोणालाच कल्पना नाही की देशाची आर्थिक परिस्थिती कधी आणि कशी सुधारेल. कोणत्याही ठिकाणी नोकरी मिळवायला काही पूर्व अनुभवाची गरज असते. आणि तो आमच्यासारख्या ‘प्रेशर्स’ कडे नसतो. त्या मुळे, नोकरीच्या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायला खूप कष्ट आणि वेळ द्यावा लागतो. कित्येक वेळेला ते साध्य होतसुद्धा नाही. पण तरुण पिढीच्या या विद्यार्थी ते व्यावसायिकच्या लढाईत आता या महामारीचीसुद्धा भर पडली आहे.

त्यामुळेच तरुणांना सामाजिक लढाईपेक्षा मानसिक खच्चीकरणाची जास्त भीती वाटू लागली आहे. कदाचित या पिढीला अशी भीतीदेखील आहे की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण आज हातातून निसटत चालले आहेत आणि काही वर्षांनी तारुण्यातील आठवणी या फक्त महामारी आणि लॉकडाऊनच्याच असल्या तर? कित्येक स्वप्नांना या महामारीने कैद करून ठेवले असेल? 

या लेखाद्वारे मी ज्ये÷ाना हाच संदेश देऊ इच्छिते की तुमच्या घरात जर कोणी तरुण असेल, तर मुद्दाम वेळ काढून त्यांच्या जवळ जाऊन बसा. त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधा. कधी त्यांच्या स्वभावात किंवा वागणुकीत बदल जाणवला तर त्यांच्यावर रागावण्याच्या आधी त्याच्या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. आजची तरुण पिढी खूप जागरूक आहे आणि तुम्ही जेव्हा जगातील घडामोडींचे उदाहरण त्यांना देता, ते त्यांना पूर्णपणे समजते. पण दबलेल्या स्वप्नांच्या मागची निराशाही माणसाला खूप त्रास देऊ शकते.

दुर्दैवाने सर्वांवर अशी वेळ आली आहे की ही रात्र संपून आशेचे किरण घेऊन येणारा दिवस कधी उगवेल माहिती नाही आणि तरुणांनी अशा महासंकटांबद्दल फक्त इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. त्यामुळे त्याला सामोरे जायचा अनुभव, ताकत आणि मानसिक बळ आमच्याकडे नाही. महामारीच्या काळात आयुष्य थांबवून चालणार नाही. त्यामुळे ज्या गोष्टी तरुणांकडून आधी अपेक्षित होत्या, त्या आत्ताही आहेत. त्यामुळे तुम्ही हे समजून घ्या, की त्या अपेक्षा अशा काळात पार पाडणे अधिक कठीण आहे. तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या घरातील तरुण जर या काळात स्वतःला सिद्ध करायला संघर्ष करत असतील, तर त्यांच्यावर चिडण्यापेक्षा त्यांना आधार द्या. परिस्थितीला सामोरे जायचे बळ द्या. आणि जर एखाद्या तरुणाला मानसिकदृष्टय़ा खचल्यासारखे वाटत असेल तर त्याला वेळ द्या. त्याला त्याच्या पद्धतीने बरे होऊ द्या. तरुण असलो म्हणून काय झालं, भावना सगळय़ांना सारख्याच अनुभवायला मिळतात. या महामारीशी लढाई चालू असताना, या तरुण पिढीला हरण्यापासून तुम्ही नक्कीच थांबवू शकता, गरज आहे ती फक्त एकमेकांना थोडं समजून घ्यायची.

श्राव्या माधव कुलकर्णी

Related Stories

सतर्क राहू, काळजी घेऊ!

Patil_p

विरोधकांना झाले आहे तरी तरी काय?

Patil_p

ग्राम पंचायत यंत्रणा-खरेच असे घडते काय?

Patil_p

शेतकरी आंदोलनाचे जगभर पडसाद

Patil_p

युती मनसेला हवी की भाजपला?

Patil_p

गुरुसेवेने सद्विद्यालक्षणशस्त्र हातात येते

Patil_p
error: Content is protected !!