तरुण भारत

कोयना नदीत आढळले तीन बॉम्ब

कराडच्या तांबवे पुलावरील घटना, दहशतवाद विरोधी पथक दाखल

प्रतिनिधी/ कराड

Advertisements

कराड तालुक्यातील तांबवे येथे सोमवारी दुपारी 11 वाजता जिह्याला हादरवणारी घटना घडली. तांबवेतील कोयना नदी पुलावर मासेमारी करायला गेलेल्या युवकांना नदीपात्रात तीन जिवंत हात बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. मासेमारी करायला टाकलेल्या जाळ्यात तीन जिवंत बॉम्ब असलेली प्लास्टिकच्या पिशवीत बॉम्ब सापडताच कराड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दहशतवाद विरोधी पथकही तत्काळ दाखल झाले. हे बॉम्ब सैन्यदलातील असल्याची शक्यता वर्तवली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस दल व दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे तपास सुरू केला आहे. 

दरम्यान, हे तांबवे पुलापासून दोनशे मीटरवर जेसीबीने खड्डा काढून बॉम्ब जमिनीत गाढून निकामी करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती. त्याचे तुकडे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मासेमारीच्या जाळ्यात जिवंत बॉम्ब अडकले

कराड शहरापासून अवघ्या 11 किलोमीटरवर तांबवे पूल आहे. सोमवारी साडेअकराच्या सुमारास साकुर्डी गावातील संभाजी चव्हाण, योगेश जाधव, अरुण मदने हे युवक एकत्रित मासेमारी करायला पुलावर गेले होते. युवकांनी नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गळ टाकला होता. थोडय़ा वेळाने गळाला जड काही तरी अडकल्याची जाणिव त्यांना झाली. मासे असावेत या अंदाजाने त्यांनी गळ वर घेतले असता प्लास्टिकची पिशवी अडकल्याचे दिसले. पिशवीवर घेऊन पाहिले असता पिशवीचे तोंड बांधलेले होते. युवकांनी पिशवीची गाठ उघडून पाहिल्यावर त्यांना धक्का बसला. पिशवीत बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कराड ग्रामिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अमित पवार, सज्जन जगताप, शशिकांत काळे यांना ही माहिती दिली. साकुर्डीत बंदोबस्त करत असलेले पोलीस वेगाने तांबवे पुलावर दाखल झाले. 

चारशे ग्रॅम वजनाचे तीन जिवंत बॉम्ब

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच युवकांना सापडलेली पिशवी ताब्यात घेत तपासणी सुरू केली. सैन्यदलात वापरले जाणारे हॅण्डग्रेनेड असल्याची खात्री पटताच ही माहिती दहशतवाद विरोधी पथकास कळवण्यात आली. दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपअधिक्षक रणजीत पाटील हे सुद्धा दाखल झाले. पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने तीनही बॉम्बची तपासणी केली. सैन्यदलात वापरले जाणारे हे बॉम्ब अंदाजे चारशे ग्रॅम वजनाचे असल्याचे समोर आले. एफ थर्टी ग्रेनेड असल्याचा अंदाज  वर्तवला जात आहे. बॉम्बच्यावरती बीडचे कव्हर होते. त्या बॉम्बला असलेली पीन व त्यावरील शिक्के पाहता ते सैन्यदलातील असल्याचे समोर येत होते. प्रत्येक बॉम्बचा स्वतंत्र पंचनामा करून त्याचे फोटो पोलिसांनी घेतले. 

‘एटीएस’कडून चौकशीचे सत्र सुरू

सैन्यदलातील हे बॉम्ब कोणी व कशासाठी आणले याचा छडा अजुनही लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू करत दहशतवाद विरोधी पथकाने वेगाने चौकशीचे सत्र सुरू केले होते. त्यांच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागल्याचीही चर्चा होती. अत्यंत गोपनीयता बाळगत या पथकाने त्या दिशेने तपासाची सुत्रे हलवली आहेत. 

तांबवेसह परिसरात तणाव, पोलीस फौजफाटा तैनात

तांबवे येथील कोयना नदीपात्रात बॉम्ब सापडल्यानंतर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक तांबवे येथे दाखल झाले. बघ्यांची गर्दीही जमली होती मात्र पोलिसांनी गर्दी पांगवली. तांबवे पुलावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकाराने तांबवे परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली होती. 

परजिह्यातील कनेक्शन की कोणाचे कारस्थान

तांबवे येथे सापडलेल्या पिशवीतील हॅण्डग्रेनेडचा वापर सैन्यदलात केला जातो. हे बॉम्ब ज्या पिशवीत सापडले त्या प्लास्टिकच्या पिशवीवरून तपासाला वेग आला आहे. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरून याचा तपास सुरू आहे. बॉम्बवर असलेला शिक्का हा सुद्धा तपासाचा महत्वाचा भाग आहे. दरम्यान, एखाद्या जवानाने सैन्यदलातून हे बॉम्ब आणले असावेत अशीही दाट शक्यता वर्तवली जात आहे. बॉम्ब आणल्यानंतर घाबरून त्याने पिशवीत बांधून ते नदीत टाकले असावेत असाही अंदाज व्यक्त होतोय.

Related Stories

पालकमंत्री सन्माननीय आहेत; उदयदादा जवळचे मित्र होते

Amit Kulkarni

स्मृतीदिनी जागल्या डॉ. दाभोलकरांच्या आठवणी

datta jadhav

ग्रामविकास मंत्री 16 ऑगस्टला सांगली दौऱ्यावर

Abhijeet Shinde

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

Rohan_P

सोलापूर : माढा तालुक्यात ३६ कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

शिकाऱयाच्या जाळ्यातून तरसाची सुटका

Patil_p
error: Content is protected !!