तरुण भारत

कोरोनावर ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी’ थेरपी प्रभावी ठरणार

काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या सेंट्रल ड्रग कंट्रोल (CDSCO) संस्थेने कोव्हिड आजारांमध्ये आपत्कालीन वापरासाठी कृत्रिम कॉकटेल ‘मोनोक्लोनल अँटीबॉडीज’ वापरास व विक्रीस परवानगी दिली आहे. एक वर्षापासून भारताला याची प्रतीक्षा होती. अमेरिकेतील रिजनरॉन कंपनीने संशोधन करून दोन प्रकारच्या अँटीबॉडीचे जेनेटिक मिश्रण करून हे इंजेक्शन बनवले आहे. याच्या निर्मितीचे हक्क स्वित्झर्लंडच्या रोश कंपनीकडे आहेत. भारतात याची विक्री व पुरवठा करण्याची परवानगी रोश व सिप्ला कंपनीला मिळाली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनामुक्त होण्यासाठी याच इंजेक्शनचा वापर केला होता.

सध्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खूप कमी औषधे उपलब्ध आहेत या नवीन उपचार पद्धतीमुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होणार आहे. सौम्य व मध्यम प्रकारच्या कोरोना विकारांमध्ये तसेच वयस्कर, हाय रिस्क व्यक्तीमध्ये याचा वापर जीव वाचवण्यासाठी व पेशंट सिरियस होऊ नये म्हणून केला जाईल.

Advertisements

शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणेत अँटीबॉडीज एका योद्धय़ाचे काम करीत असतात. विषाणूंच्या हल्ल्याला परतवून लावण्यासाठी यांची महत्त्वाची भूमिका असते. अँटीबॉडीज म्हणजे शरीराद्वारा बनविलेले रोग-प्रतिकार ‘तत्त्व’ ज्याची निर्मिती आपली इम्युन सिस्टीम करते. वेगवेगळय़ा आजारासाठी वेगवेगळय़ा अँटीबॉडीज असतात. त्या काही काळासाठी कार्य करणाऱया व काही मेमरी टी सेलपासून निर्माण झालेल्या व दीर्घकाळ शरीराचे संरक्षण करणाऱया अँटीबॉडी असतात.

नैसर्गिकरित्या शरीर, आजारानंतर त्याच्याविरोधात अँटीबॉडीज तयार करते.लसीकरणानंतर (व्हॅक्सिन) शरीरात नैसर्गिकरित्या अँटीबॉडीज तयार होतात. कोरोना उपचारावेळी बाहेरून प्लाझ्मावाटेसुद्धा कोरोना बरे होऊन गेलेल्या रुग्णाच्या अँटीबॉडीज उपचारा दरम्यान वापरल्या जातात. सध्या नवीन कृत्रिम मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचार पद्धती ही कोरोना रुग्णावर केल्या जाणाऱया प्लाझ्मा थेरेपीपेक्षा थेट व जास्त प्रभावीपणे काम करतात हे सिद्ध झाले आहे. यांच्या वापराने कोरोना विषाणूची पुनर्निर्मिती व प्रादुर्भाव थांबवला जाऊ शकतो. तसेच विषाणूंमुळे शरीरात होणारे दुष्परिणाम रोखता येतात. प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या बनविलेल्या REGEN-COV यात दोन प्रकारच्या अँटीबॉडीज 1) सिसीरिव्हीमॅब (Casirivimab) व 2) इमडेव्हीमॅब (Imdevimab) यांचे मिश्रण आहे.

कोरोनातून बरा झालेल्या पेशंटच्या शरीरातील प्लाझ्मा घेऊन त्यातील उच्च प्रतीच्या न्यूट्रीलायझिंग अँटीबॉडीची निवड करून मनुष्य पेशीत किंवा उंदरांच्या पेशीत रीकॉम्बनिंट डीएनए टेक्नॉलॉजीद्वारे प्रयोगशाळेत जास्त प्रमाणात निर्माण (क्लोन) केल्या जातात. अशा मोनॉक्लोनाल अँटीबॉडीज यापूर्वी कॅन्सर, इबोलासारख्या अनेक आजारांमध्ये वापरल्या गेल्या आहेत. यावर खूप संशोधन व ट्रायल्स झालेल्या आहेत. ही तयार मोनोक्लोनल अँटीबॉडीज कोरोना शिंगाना चिकटून विषाणूंना पेशीमध्ये घुसूच देणार नाहीत. जरी विषाणूमध्ये म्युटेशन झाले तरी दोन्हीपैकी एक अँटीबॉडी काम करेल म्हणून दोन एकत्र घेतल्या आहेत.

या अँटीबॉडी ट्रीटमेंटचा ऍडव्हान्स प्रकार म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीज या पूर्णतः न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज असतात, म्हणजेच त्या व्हायरसला निष्क्रिय करणे सोबत व्हायरसच्या काटेरी आवरणाला नष्ट करतात व पुढील प्रसार थांबवतात.

कोणाला देता येते?

1) REGEN-COV इंजेक्शन कोरोनाची लक्षणे सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवडय़ातच वापरले तरच त्याचा फायदा होतो. जितक्मया लवकर घ्याल तितके फायद्याचे.

2) यासाठी rt-pcr पॉझिटिव्ह असणे आवश्यक आहे.

3) ऑक्सिजनची तसेच व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णाला याचा फायदा नाही.

4) सायटोकाईन स्ट्रोम सुरू झाल्यावर दिल्यास तोटा होतो.

5) बारा वर्षावरील (40 किलो) वयोगटातील व्यक्तींना सुरक्षित वापरता येते.

6) जे हायरिस्क गटातील नागरिक आहेत जसे 60 वर्षावरील वयोवृद्ध, कॅन्सर, टीबी, शुगर, हृदयविकार, ऑर्गन ट्रान्सप्लांट, किडनी डायलिसिस, एडस, स्थूल व्यक्ती, इम्मुनोसप्रेसंट औषध घेणाऱया लोकांना कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुद्धा वापरता येईल.

7  कोरोना रुग्णाच्या संपर्कात काम करणारे व त्यांचा पेशंटशी संपर्क आला आहे, अशांनासुद्धा सुरक्षा कवच म्हणून वापरता येईल.  प्री एक्सपोजर, पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणून वापरू शकतो.

8) लसीला हा पर्याय म्हणून नाही. उपचार पद्धती म्हणून याचा वापर केला जातो.

9) मोनोक्लोनल उपचार पद्धतीची किंमत लाखात असणार आहे, ज्यांना परवडेल त्यांनी याचा वापर करावा.

10) या उपचार पद्धतीचा अवलंब जास्त लोकांनी केल्यास हॉस्पिटलवरील ताण कमी होईल.

योग्य वेळेत अशा नवीन उपचार पद्धतींचा वापर करून तसेच शरीरात नैसर्गिकरित्या अँटीबॉडीज बनवणाऱया योग्य लसींचे डोस घेऊन कोरोना महामारीस रोखता येईल.

डॉ.संजय पंतबाळेकुंद्री

Related Stories

रिलायन्स रिटेलमधील हिस्सेदारी ऍमेझॉन घेणार ?

Patil_p

बँकांची क्रेडीट वृद्धी नीच्चांकी पातळीवर

Patil_p

देवयानी इंटरनॅशनलचा येणार आयपीओ

Patil_p

जागतिक बाजारातील संकेतामुळे तेजीची झुळूक

Patil_p

‘क्रिप्टोकरंसी’च्या किंमतीमध्ये मोठी घसरण

Patil_p

एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मिनी आईप

Patil_p
error: Content is protected !!