तरुण भारत

पहिले द्रोणाचार्य पुरस्कार जेते ओ. पी. भारद्वाज कालवश

यशस्वी खेळाडू-उत्तम प्रशिक्षक व कुशल संघटकाचा अंत, 1985 मधील पहिले द्रोणाचार्य पुरस्काराचे संयुक्त मानकरी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारताचे मुष्टियुद्धातील पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ओ. पी. भारद्वाज यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. निधनसमयी ते 82 वर्षांचे होते. अगदी दहा दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी संतोष यांचेही प्रदीर्घ आजाराशी लढतानाच निधन झाले होते. 1985 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली, त्यावेळी ओ. पी. भारद्वाज यांच्यासह भालचंद्र भास्कर भागवत (कुस्ती) व ओ. एम. नाम्बियार (ऍथलेटिक्स) यांनाही पहिल्या वर्षी सन्मानित केले गेले होते.

‘ओ. पी. भारद्वाज मागील बऱयाच दिवसांपासून आजारी होते व त्यांना इस्पितळात दाखलही केले गेले होते. वय हा देखील एक घटक होता. शिवाय, 10 दिवसांपूर्वीच पत्नी संतोष यांचे निधन झाले, ही देखील त्यांच्या मनाला चटका देणारी घटना होती’, असे त्यांचे निकटवर्तीय, माजी मुष्टियुद्ध प्रशिक्षक टी. एल. गुप्ता वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

ओ. पी. भारद्वाज 1968 ते 1989 या कालावधीत भारताचे राष्ट्रीय मुष्टियुद्ध प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. याशिवाय, त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या छत्रछायेखाली भारतीय मुष्टियोद्धय़ांनी आशियाई, राष्ट्रकुल व दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये सातत्याने भरीव यश संपादन केले. भारतीय मुष्टियुद्ध संघटनेचे अध्यक्ष अजय सिंग यांनी भारद्वाज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

‘ओ. पी. भारद्वाज हे भारतीय मुष्टियुद्धासाठी खऱया अर्थाने ध्वज-धारक होते. त्यांनी खेळाडू म्हणून आपली कारकीर्द गाजवली, शिवाय, प्रशिक्षक, निवडकर्ते या नात्याने त्यांनी नव्या पिढीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. त्यांच्याकडे स्वतंत्र दृष्टी होती. त्यांनी जे योगदान दिले, त्याची सर कशालाच येणार नाही’, असे अजय सिंग म्हणाले.

पतियाळातील केंद्रात मुख्य निरीक्षक

ओ. पी. भारद्वाज यांनी पतियाळातील एनआयएस केंद्रातील डिप्लोमा कोचिंग कोर्समध्ये पहिले मुख्य निरीक्षक म्हणून सिंहाचा वाटा उचलला. त्यांनी एनआयएसमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर समालोचन केले. शिवाय, दिल्ली येथे स्वतःची जिम देखील सुरु केली.

‘पुण्यातील आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंगमध्ये त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 1975 मध्ये एनआयएसने मुष्टियुद्धातील कोचिंग डिप्लोमाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आणि त्यांनीही या प्रस्तावाला होकार दिला. मी त्यांच्या पहिल्या काही विद्यार्थ्यांपैकी एक होतो, याचा मला सार्थ अभिमान आहे’, असे टी. एल. गुप्ता यावेळी म्हणाले. 2008 मध्ये भारद्वाज यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना दोन-एक महिने मुष्टियुद्धाचे धडेही दिले.

विद्यार्थ्यांमध्ये गुरबक्ष यांचा समावेश

भारद्वाज यांच्या पहिल्या काही विद्यार्थ्यांमध्ये माजी राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू यांचा समावेश राहिला. आपल्या काही आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, ‘मी त्यांचा विद्यार्थी तर होतोच. शिवाय, एनआयएसमध्ये त्यांचा सहकारी देखीलही होतो. माझ्यात व त्यांच्यात बराच स्नेह होता. भारतीय मुष्टियुद्धाची जडणघडण होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. ते नेहमी युवा मुष्टियोद्धय़ांमध्ये उतरत. बाजूला थांबून सूचना, मार्गदर्शन करायचे, ही त्यांची वृत्ती नव्हती. प्रशिक्षक म्हणून ते कडक होते. पण, आपले खेळाडू तगडे असावेत, हेच त्यांचे मुख्य ध्येय राहिले. यासाठीच ते आयुष्यभर झगडत राहिले’.

राष्ट्रीय फेडरेशनचे माजी सेक्रेटरी जनरल ब्रिगेडियर (निवृत्त) पीकेएम राजा यांनी भारद्वाज यांचे व्यक्तिमत्त्व लक्षवेधी होते, असे नमूद केले. पीकेएम राजा यांच्या कारकिर्दीदरम्यान ओ. पी. भारद्वाज राष्ट्रीय निवडकर्ते होते.

भारद्वाज आपल्या कडक शिस्तीबद्दल देखील नेहमी चर्चेत राहिले. याचा एक किस्सा सांगताना टी. एल. गुप्ता म्हणाले, ‘1980 मध्ये आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने 2 सुवर्ण, 5 रौप्य व 3 कांस्यपदके जिंकली. त्यानंतर संघ पतियाळात परतला, त्यावेळी त्यांची राहण्याची सोय योग्य ठिकाणी केली गेली नव्हती. ही बाब कळताच भारद्वाज यांनी स्वतः अधिकाऱयांशी संवाद साधला आणि या खेळाडूंच्या निवासाची चोख व्यवस्था केली. आपला आवाज किंचीत वाढवून ते पदाधिकाऱयांना म्हणाले होते, पदकजेत्यांना तुम्ही या प्रकारे वागवणे योग्य ठरत नाही’. .

जेव्हा भारद्वाज यांनी रशियातून टाईपरायटर आणला!

‘डायनॅमिक मॅन’ ही ओ. पी. भारद्वाज यांची खास ओळख होती. ते दिवस असे होते, ज्यात कॉम्प्युटर्स कोणाला माहीत नव्हते आणि अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल, इतक्या कमी लोकांना टाईप करणे म्हणजे काय, हे ज्ञात असायचे. पण, एकदा रशिया दौऱयावरुन परत येत असताना त्यांनी भारतात टाईपरायटर आणला. टाईपरायटरची संकल्पनाच नवी असल्याने टायपिंग येण्याचा प्रश्नच नव्हता. पण, जिद्दीचे ओ. पी. भारद्वाज केवळ एका बोटाने टायपिंग करायचे आणि एनआयएसमध्ये युवा मुष्टियोद्धय़ांसाठी ज्या सरस सुविधा आवश्यक आहेत, त्याची मागणी या टाईपरायटरवर टाईप करुन ते वरिष्ठांना कळवायचे, अशी आठवण टी. एल. गुप्ता यांनी यावेळी सांगितली.

Related Stories

ऋषभ पंतचे यष्टीरक्षणही सुधारेल

Patil_p

इंग्लंड महिलांचा भारतावर 4 गडय़ांनी विजय

Patil_p

पाक महिला क्रिकेट संघाला अक्रम, आझम यांचे मार्गदर्शन

Patil_p

यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर?

Patil_p

राष्ट्रीय सायकलींग सराव शिबीर शुक्रवारपासून

Patil_p

सुदैव आपल्या बाजूने असेल ही मुख्य अपेक्षा

tarunbharat
error: Content is protected !!