तरुण भारत

भाजप सरकारने गोव्याची स्थिती संघप्रदेशासारखी करून टाकली

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची टीका, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात स्व. राजीव गांधी यांना आदरांजली

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी गोव्याला घटकराज्याचा दर्जा दिला. स्थानिक स्वराज संस्थांना मजबूत करण्याचे काम त्यांनी केले. परंतु भाजप सरकारने आज राज्याची स्थिती संघप्रदेशासारखी करून टाकली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नाईक, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, प्रदेश काँग्रेसचे सुभाष फळदेसाई, दामोदर शिरोडकर तसेच जिल्हा काँग्रेसचे पीटर गोम्स, ऍड. येमन डिसोझा, रॉयला फर्नांडिस व इतर हजर होते. परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात व दीवची हवाई पाहणी केली. पंतप्रधानांनी घेतलेल्या विविध राज्यांच्या जिल्हा दंडाधिकाऱयांच्या बैठकीत गोव्याला स्थान देण्यात आले नाही. यावरून भाजप सरकारला गोवा व गोमंतकीयांच्या यातनांचे काहीच पडलेले नाही हे स्पष्ट होते, असे कामत म्हणाले.

आज संपूर्ण देशात कोविडची सर्वाधिक लागण झालेल्यांत गोवा अगदी वरच्या स्थानावर आहे. ऑक्सिजनअभावी गोव्यात 74 जणांचे प्राण गेले. आज कोविड लसीकरण व चाचणी यात गोवा अगदी शेवटच्या पातळीवर आहे. या परिस्थितीत गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांकडे बोलणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य होते. परंतु उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालबरोबर पुदुचेरीला सुद्धा सदर बैठकीत सहभागी करून घेताना पंतप्रधानांना गोव्याची आठवण झाली नाही हे धक्कादायक आहे, असे कामत म्हणाले.

भाजपकडून गोव्याला सापत्नभावाची वागणूक

2014 मध्ये सत्तेत आल्यापासून भाजपने गोव्याला सापत्नभावाची वागणूक दिली आहे. म्हादई पाणी वाटपात भाजप सरकारने गोव्याचा विश्वासघात केला. भाजपनेच बंद पाडलेला खाण व्यवसाय सुरू करण्याच्या बाबतीत केंद्रातील भाजप सरकार काहीच करत नाही. गोव्याची अस्मिता नष्ट करून येथे कोळसा हब करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. पर्यावरण नष्ट करून मोले येथे तीन प्रकल्पांचे काम पुढे रेटण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. त्याचा फायदा केवळ क्रोनी क्लबला होणार आहे. भाजप सरकारने गोमंतकीयांना किनारी व्यवस्थापन आराखडा सुनावणीतही भाग घेऊ दिले नाही. यावरून भाजपची गोव्याविरुद्धची भूमिका स्पष्ट होते, अशी टीका कामत यांनी केली.

केंद्रातील काँग्रेस सरकारांचे गोव्यासाठी खास योगदान राहिले. स्व. राजीव गांधी यांनी गोव्याला घटकराज्याचा दर्जा दिला. कोकणीला राजभाषेचा दर्जा व घटनेच्या आठव्या परिशिष्टात स्थान राजीव गांधींमुळेच मिळाले हे सत्य आहे. गोव्यावर केलेल्या उपकारांसाठी गोमंतकीय नेहमीच त्यांचे ऋणी राहतील, असे ते म्हणाले. आज राज्यातील भाजप सरकारला केंद्रातील भाजपचेच सरकार किंमत देत नाही. राज्य सरकारचा रिमोट आज दिल्लीतील नेत्यांच्या हातात आहे. यामुळेच गोमंतकीयांना त्रास व कष्ट सहन करावे लागत आहेत, अशी टीका कामत यांनी पुढे केली.

चोडणकर यांनी यावेळी बोलताना स्व. राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज संस्थांना अधिकार दिल्याचे सांगितले. नगरपालिका व पंचायतींना मजबूत बनविण्याचे काम त्यांनी केले. आजचा दिवस काँग्रेस पक्ष माणुसकीच्या भावनेतून सेवा देऊन पाळणार  आहे, असे त्यांनी सांगितले. आज भाजप सरकार देशात कोविड लसीकरण करण्यासाठी चाचपडत असताना देशवासियांना कर्तबगार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच उणीव भासत आहे. राजीव गांधींनी जी स्वप्ने पाहिली ती प्रत्यक्षात उतरवून दाखविली, असे ते म्हणाले. बीना नाईक यांनी महिला काँग्रेसने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डायस यांनी संपूर्ण दक्षिण गोव्यात विविध गट काँग्रेसतर्फे सेवा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. कोविडची लाट व चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी काँग्रेस सदस्य कार्यरत असल्याचे ते म्हणाले. सुरूवातीला उपस्थित सर्व काँग्रेस नेते, पदाधिकारी व सदस्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी स्व. राजीव गांधी यांच्या तसबिरीला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

Related Stories

ऊस उत्पादकांचे धरणे आंदोलन अखेर समाप्त

Omkar B

कोरोनावर उद्यापासून उपचार मोफत

Patil_p

गोवा मराठी अकादमीच्या कविता स्पर्धेचा निकाल जाहीर

Omkar B

सरकारने आयआयटी संदर्भात फेरविचार न केल्यास आंदोलन

Patil_p

वास्को व परिसरात संचारबंदीतही मुक्त संचार, वाहनांची वर्दळ वाढली

Omkar B

आरिदानेच्या गोलमुळे हैदराबाद एफसीने ईस्ट बंगालला बरोबरीत रोखले

Amit Kulkarni
error: Content is protected !!