तरुण भारत

दहावीची परीक्षा रद्द, बारावीचा निर्णय बुधवारपर्यंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : नियुक्त समितीशी चर्चेअंती झाला निर्णय,कोविडमुळे परीक्षा टाकल्या होत्या लांबणीवर

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून बारावीच्या परीक्षेबाबत बुधवारपर्यंत निर्णय कळविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रविवारी सायंकाळी दिली.

सोशल मीडियावर फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री बोलत होते. कोरोना महामारीमुळे राज्यातील मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे गत कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालकांच्याही मनावर प्रचंड ताण होता. त्यातूनच विद्यार्थी तसेच पालकांकडूनही परीक्षेसंदर्भात मंडळ, शिक्षण खाते, तसेच शिक्षणमंत्री या नात्याने स्वतः मुख्यमंत्र्यांकडे विविध माध्यमांतून सातत्याने विचारणा होत होती. त्या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वरील माहितीमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोविडमुळे परीक्षा टाकल्या होत्या लांबणीवर

राज्यातील बारावीची परीक्षा 24 एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा 13 मे पासून सुरू होणार होती. परंतु कोरोनाचे संकट ओढवल्याने राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसेच नवी तारीख 15 दिवस अगोदर घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यामुळे दोन्ही परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

दहावी, बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारने शालांत मंडळास समिती स्थापन करण्यास सांगितले होते. त्यातून शालांत मंडळ, शिक्षण खाते, शैक्षणिक तज्ञ, खाजगी शैक्षणिक संस्थांमधील तज्ञ या सर्वांशी सल्लामसलत करण्यात आली. तसेच रविवारी त्यासंबंधी व्हर्च्युअल चर्चा करण्यात आली. त्यानुसार गोवा सरकारने सर्वांचे हित लक्षात घेता दहावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुढील प्रवेशासाठी अंतर्गत गुण ग्राह्य धरणार

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता पुढील कक्षेत प्रवेश देण्यासाठी त्यांच्या अंतर्गत गुणांचे मुल्यांकन करण्यात येणार आहे. अंतर्गत गुणांनुसारच त्यांच्या पुढील प्रवेशासंबंधी निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार एखादा दुसरा विषय राहात असेल तर एटीकेटीची सवलत देण्यात येणार आहे.

बारावीबाबत बुधवारपर्यंत निर्णय

जेईई, नीट परीक्षांबाबत केंद्र सरकार येत्या दोन दिवसात निर्णय घेणार आहे. त्यावर आधारून बुधवारपर्यंत राज्य सरकार बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा सहभाग

दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विज्ञान आणि डिप्लोमा प्रवेशासाठी चढाओढ होणार आहे. त्यावर उपाय म्हणून एका दिवसाची तीन तासांची प्रश्नोत्तरी (ऑब्जेक्टिव्ह) परीक्षा घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी सकाळी देशातील अनेक राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शिक्षणमंत्री या नात्याने डॉ. सावंत यांनी भाग घेतला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

बारावीबाबतचाही योग्य निर्णय लवकर घ्यावा : कामत

 दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या घोषणेचे आपण स्वागत करतो. बारावीच्या परीक्षेबद्दलही योग्य निर्णय लवकरच घ्यावा. सरकारने आगामी शैक्षणिक वर्षासाठी सर्व स्तरांसाठी कृती आराखडा तयार करावा, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सूचविले आहे. सरकारने आता ऑनलाईन प्रवेश परीक्षा तसेच योग्यता चाचणी परीक्षांसाठी व्यवस्थित नेटवर्क सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्रांवर अखंडीत नेटवर्क असणार याची खात्री करुन घ्यावी, तरच विद्यार्थ्याना परीक्षा देताना लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

हजारो विद्यार्थी, पालकांना मिळाला दिलासा : सावईकर

राज्यात कोरोना महामारीचा वाढता कहर लक्षात घेऊन गोवा बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा यंदा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल दक्षिण गोव्याचे माजी खासदार व एनआरआय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांनी स्वागत केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असून राज्यातील हजारो विद्यार्थी व पालकांना दिलासा देणारा आहे, असे सावईकर यांनी म्हटले आहे.

Related Stories

म्हादईच्या प्रश्नावर भाजपाकडून गोमंतकीयांची दिशाभूल

Omkar B

सांकवाळ येथील घरात आग लागून लाखभराचे नुकसान

Omkar B

…तर कचरा मुख्याधिकारी, अभियंत्यांच्या दारात आणून टाकू

Omkar B

एफसी गोवाचा सामना आज चेन्नईनशी

Amit Kulkarni

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार

Patil_p

उत्पादनातील सर्वेसर्वा ‘ग्लोबल’ सिस्टम्स्

Amit Kulkarni
error: Content is protected !!