तरुण भारत

जयंत चौधरी रालोदचे नवे प्रमुख

पदाधिकाऱयांच्या व्हर्च्युअल बैठकीत निवड- शेतकऱयांच्या आंदोलनाला समर्थन

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisements

चौधरी अजित सिंग यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर मंगळवारी राष्ट्रीय लोकदलाचा नवा अध्यक्ष म्हणून जयंत चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. रालोदच्या व्हर्च्युअल बैठकीत सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. पक्षाचा अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर जयंत यांनी 26 मे रोजी प्रस्तावित शेतकऱयांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा जाहीर केला आहे.

चौधरी चरण सिंग यांचा राजकीय वारसा सांभाळण्याचे आव्हान जयंत यांच्यासमोर आहे. अजित सिंग यांना चरण सिंग यांचा राजकीय प्रभाव टिकविता आला नव्हता. अजित सिंग केंद्रात विविध पक्षांच्या सरकारमध्ये मंत्री झाले, पण त्यांची ओळख शेतकरी नेत्याऐवजी जाट नेत्याच्या स्वरुपापुरती मर्यादित राहिली होती.

याचमुळे रालोदचा प्रभाव पश्चिम उत्तरप्रदेशच्या काही विशेष जिल्हय़ांपुरती मर्यादित राहिला होता. विविध काळात वेगवेगळय़ा राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची हक्काची शेतकऱयांची मतपेढी विखुरली गेली होती. जाट समुदाय जयंत चौधरी यांना स्वतःचा नेता मानणार का हा प्रश्न उपस्थित होणार आहे.

2013 मध्ये उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्हय़ातील सांप्रदायिक दंगलींनी पश्चिम उत्तरप्रदेशातील सर्व राजकीय समीकरणेच बदलली आहेत. चौधरी अजित सिंग यांची मतपेढी मानला जाणारा जाट समुदाय भाजपच्या बाजूने वळला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रालोदला एकही जागा जिंकता आली नव्हती. अजित सिंग, त्यांचे पुत्र जयंत चौधरी दोघांचाही पराभव झाला होता.

विधानसभेत केवळ एक जागा

2017 च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाला स्वतःची मतपेढी राखून ठेवता आली नव्हती. राज्यातील 403 विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ एका ठिकाणी रालोदला यश मिळाले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही अजित सिंग आणि जयंत चौधरी यांना पराभव पत्करावा लागला होता. पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता.

2022 विधानसभा निवडणुकीचे आव्हान

पंचायत निवडणुकीत पश्चिम उत्तरप्रदेशात रालोदला मोठे यश मिळाले आहे. 2022 ची विधानसभा निवडणूक रालोद आणि समाजवादी पक्ष मिळून लढविणार आहे. या निवडणुकीत भाजपला रोखणे आणि स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याचे आव्हान रालोद म्हणजेच जयंत चौधरी यांच्यासमोर असणार आहे.

Related Stories

धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तुष्टीकरण नव्हे!

Patil_p

दिल्लीच्या पंत रुग्णालयात वादंग

Patil_p

नितीशकुमार घेणार दिवाळीनंतर शपथ

Patil_p

पेट्रोल-डिझेल दरात वाढीचे सत्र संपेना

Amit Kulkarni

कोरोनाने दिवसभरात 300 हून अधिक मृत

Patil_p

सुशिलकुमारचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Patil_p
error: Content is protected !!