तरुण भारत

सौम्य संसर्गानंतर हयातभर अँटीबॉडी सुरक्षा

अमेरिकेच्या संशोधकांचा निष्कर्ष ः विषाणूचा पुन्हा सामना करण्यास शरीराची होते तयारी

वृत्तसंस्था  / न्यूयॉर्क

Advertisements

कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येणाऱया लोकांमध्ये अँटीबॉडी तयार करणाऱया इम्युन सेल्स (रोगप्रतिकारक पेशी) आयुष्यभर या विषाणूच्या विरोधात सुरक्षा पुरवू शकतात, असे अमेरिकेच्या संशोधकांना आढळून आले आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांना व्हायरल इन्फेक्शनदरम्यान अँटीबॉडी तयार करणाऱया इम्युन सेल्स प्रचंड वेगाने वाढून रक्तप्रवाहात सामील होऊ लागतात, यातून अँटीबॉडीचे प्रमाण अधिक होत असल्याचे दिसून आले आहे.

संसर्ग संपुष्टात आल्यावर यातील बहुतांश पेशी मृत होतात आणि रक्तातील अँटीबॉडीजचे प्रमाण कमी होऊ लागते. पण अँटीबॉडी तयार करणाऱया पेशी,  दीर्घकाळ राहणाऱया प्लाझ्मा पेशी बोन मॅरोमध्ये स्थिरावतात. तेथे या पेशी सातत्याने अल्प प्रमाणात अँटीबॉडी तयार करून रक्तप्रवाहात पोहोचवत असतात, यातून विषाणूचा पुन्हा सामना करण्यास शरीराची तयारी होते.

कोरोनाची प्रारंभिक लक्षणे आढळून आल्याच्या 11 महिन्यांनी लोकांमध्ये अँटीबॉडी निर्माण करणाऱया पेशी आढळून आल्या आहेत. या पेशी संबंधित व्यक्तीच्या उर्वरित आयुष्यभर अँटीबॉडी तयार करत राहतात. यातून इम्युनिटी दीर्घकाळ राहत असल्याचा पुरावा मिळतो, असे उद्गार संशोधक आणि सहाय्यक प्राध्यापक अली इल्लेबेडी यांनी काढले आहेत. या संशोधनाचा अहवाल नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अध्ययनासाठी पथकाने 77 जणांच्या रक्ताच्या अँटीबॉडीची पातळी दर तीन महिन्यांनी पडताळून पाहिली आहे. प्रारंभिक संसर्गानंतर सुमारे 7-8 महिन्यांनी 18 जणांचे बोन मॅरो नमुने प्राप्त केले आहेत. याचबरोबर कोरोनाची कधीच लागण न झालेल्या 11 जणांचा बोन मॅरो नमुनाही संशोधकांनी मिळविला आहे.

18 पैकी 15 बोन मॅरो नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूला लक्ष्य करणाऱया अँटीबॉडीज तयार करणाऱया पेशी आढळून आल्या आहेत. अशा पेशी संबंधितांच्या 4-5 महिन्यांनी पुन्हा बोन मॅरो नमुन्यांमध्ये सापडू शकतात. तर कधीच कोरोनाची लागण न झालेल्या 11 जणांच्या बोन मॅरो नमुन्यांमध्ये अशाप्रकारच्या पेशी सापडल्या नसल्याचे असे संशोधकांनी म्हटले आहे.

सौम्य संसर्गातून इम्यून पेशी तसेच अँटीबॉडीशी संबंधित इम्युनिटी दीर्घकाळ राहू शकते. लसीकरणाचे मुख्य तत्व अँटिजेन निर्माण करत शरीराला वाढती इम्युनिटी प्रदान करणे हेच असते. तसेच सौम्य संसर्ग झालेल्या लोकांमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण केवळ 2 टक्के असल्याची माहिती फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिटय़ूटचे संचालक डॉ. प्रवीण गुप्ता यांनी दिली आहे. मोठय़ा संख्येत लोकांना सौम्य संसर्ग झालेला असल्यास समूह रोगप्रतिकारक क्षमता विकसित झाली असावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Related Stories

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत वाढ कायम

Rohan_P

राष्ट्रपतींकडून ‘त्या’ अध्यादेशावर शिक्कामोर्तब

prashant_c

पारदर्शक शरीराचा दुर्लभ ऑक्टोपस प्रशांत महासागरात आला दिसून

Patil_p

‘फॉरएव्हर म्यूट’ पर्याय सादर

Patil_p

आज पंतप्रधान मोदींचे व्हिवा टेकला संबोधन

Patil_p

आरटीजीएसची सुविधा आता चोवीस तास

Patil_p
error: Content is protected !!