तरुण भारत

कोविड सेंटर उभारणीचा मुहूर्तच चुकला!

भाजप नेते दत्ता सामंत यांचा आमदार नाईक यांना टोला

मालवणात वाढती रुग्णसंख्या अन् मृत्यूचे प्रमाण भीतीदायक!

Advertisements

आमदारांनी यापूर्वीच कोविड सेंटर उभारायला हवे होते!

शासकीय निधीची प्रतीक्षा करत बसणे योग्य नाही!

प्रतिनिधी / मालवण:

मालवणात 20 बेडचे शासकीय कोविड सेंटर उभारणीबाबत आता अनेकांचे मृत्यू झाल्यानंतर कागदी घोडे नाचविण्याचे काम आमदार वैभव नाईक करत आहेत. प्रत्यक्षात शासकीय निधीतून एखाद्या मोठय़ा सर्व सोई-सुविधायुक्त कोविड सेंटरची उभारणी यापूर्वीच करायला हवी होती. त्यामुळे नाईक यांचा आताचा मुहूर्तच चुकला आहे. मालवणातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण भीतीदायक असल्याने शासकीय निधीची वाट न पाहता, आमदारांनी स्वखर्चातून कोविड सेंटरची उभारणी यापूर्वीच का केली नाही, असा सवाल भाजप नेते दत्ता सामंत यांनी केला आहे.

येथील शासकीय तंत्रनिकेतननजीक मंदार लुडबे यांच्या हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. कोरोना काळात जनतेचे नाहक बळी जात असून हे थांबविण्यासाठी अधिक प्रयत्न, उपाययोजना, आरोग्य सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे, असे सामंत म्हणाले. भाजपचे शहर मंडल अध्यक्ष दीपक पाटकर, मंदार लुडबे, संदीप भोजने, बाबू गावकर, बाबू धुरी, हेमंत चव्हाण, बाबू कासवकर, राजू बिडये, अभय कदम, महेश सारंग, उमेश बिरमोळे, प्रशांत बिरमोळे आदी उपस्थित होते.

शासकीय निधीची वाट का पाहता?

मालवण तालुक्यात रोज अनेकांचे मृत्यू होत आहेत. येथील रुग्णांना ऑक्सिजन वेळेत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. मात्र, त्याकडे आमदार नाईक यांनी गांभिर्याने न पाहिल्याने कागदोपत्री कोविड केअर सेंटर सुरू करण्यात त्यांनी धन्यता मानली. मात्र, त्यासाठी आवश्यक मशिनरी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. शासकीय निधी कधी येतो आणि कधी खर्च केला जातो, याची कल्पना आमदारांना नक्कीच होती. तरीही त्यांनी स्वखर्चातून कोविड केअर सेंटर उभारून मालवणच्या रुग्णांसाठी तरी अत्यावश्यक सुविधा दिल्या असत्या, तर अनेकांचे प्राण वाचले असते. आता वरातीमागून घोडे दामटविण्याचे काम असल्याने आमदारांनी जाहीर केलेले कोविड केअर सेंटर तिसरी लाट येण्यापूर्वी तरी सुरू झाले, तरी खूप काही केल्यासारखे आहे, असाही टोला सामंत यांनी लगावला.

तपासणीसाठी राजकीय इच्छाशक्ती निर्माण करा!

कोविड काळात राजकीय पक्षांची भूमिका महत्वाची ठरत असून प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचा समर्थक असतो. त्यावेळी राजकीय पक्षाच्या नेत्याने अथवा पदाधिकाऱयाने सांगितल्यास नागरिक टेस्ट करून घेण्यास पुढे येतील. त्यामुळे राजकीय पक्षांनी जनतेत कोरोनाबाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे. आमच्या घुमडे गावात एकाचवेळी कोरोनाचे तब्बल 42 रुग्ण मिळाले होते. लक्षणे दिसून येताच आम्ही ग्रामस्थांना आरटीपीसीआर टेस्टसाठी वेळीच बाहेर काढल्याने पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रुग्ण वेळेत उपचार मिळाल्याने आज ठणठणीत आहेत. चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. नाटेवाड यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य सेवा उभारून रुग्णांना टेस्ट व उपचारासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱयांनी पुढाकार घेतल्यास जिल्हा कोरोना मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.  योग्य खबरदारी घेतल्यास संसर्ग टाळता येऊ शकतो, असे ते म्हणाले.

मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही!

मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे काम करत असून प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार अशीच मदत देण्याची आज गरज आहे. परमेश्वराने हे संकट लवकरात लवकर दूर करावे, अशी प्रार्थना आपण करीत असल्याचे सांगून दत्ता सामंत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्यासह कोविड काळात रुग्णसेवा देणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांचे आभार मानले. माझ्याकडे कोरोनाचे रुग्ण आल्यानंतर वेळीअवेळी डॉक्टरांकडे आपण संपर्क केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱयांनी सर्वतोपरी सहकार्य करून रुग्णांवर उपचार केले. गंभीर स्थितीतील अनेक रुग्णांना जीवदान मिळाले, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांनाही पीपीई किट

सामंत यांनी कुंभारमाठ येथील शासकीय कोविड सेंटर येथे आवश्यकतेनुसार पुन्हा ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नवीन दोन मशीन उपलब्ध करून दिली आहेत. यावेळी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पत्रकारांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किटचे वितरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Stories

एटीएममधून पैसे परस्पर लंपास

NIKHIL_N

‘रत्नागिरी 8’ भात बियाण्यांची सहा राज्यांसाठी शिफारस

NIKHIL_N

रत्नागिरी : मौजे असूर्डे येथील दीर आणि भावजय यांचा अपघातात मृत्यू

Abhijeet Shinde

‘लाईट’ हाऊसच्या मार्गावर..!

NIKHIL_N

बायोगॅस उभारणीत जि.प.राज्यात तृतीय

NIKHIL_N

चिपळुणातील सोळा गावांत ‘वणवा मुक्ती’साठी जनजागृती

Patil_p
error: Content is protected !!