तरुण भारत

आशियाई स्पर्धेत 3 भारतीय बॉक्सर्स अंतिम फेरीत

विकास कृष्णनला 69 किलोग्रॅम वजनगटात कांस्य, शिवा थापा स्पर्धेच्या इतिहासात 5 पदके जिंकणारा पहिला भारतीय मुष्टियोद्धा

दुबई / वृत्तसंस्था

Advertisements

विद्यमान विजेता अमित पांघल (52 किलोग्रॅम वजनगट), शिवा थापा (64 किलो), संजीत (91 किलोग्रॅम) यांनी येथील आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. दुखापतग्रस्त विकास कृष्णनला मात्र 69 किलोग्रॅम वजनगटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

ऑलिम्पिकसाठी पात्र असलेल्या पांघलने कझाकस्तानच्या बिबोसिनोव्हला 5-0 अशा एकतर्फी फरकाने मात दिली. पांघलने तुलनेने कमकुवत भासत असलेल्या बिबोसिनोव्हविरुद्ध जोरदार काऊंटर ऍटॅकवर भर दिला. कझाकचा बिबोसिनोव्ह वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यजेता असून त्या स्पर्धेत त्याला रौप्यजेत्या पांघलविरुद्ध उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. बिबोसिनोव्हने प्रारंभीच आक्रमण करण्यात बरीच ताकद खर्ची घातली तर दुसरीकडे, पांघलने संयमावर भर दिला आणि बिबोसिनोव्हचा जोर किंचीत कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर जोरदार हल्ला चढवला.

सोमवारी या इव्हेंटमधील अंतिम फेरीत पांघलची सुवर्णपदकासाठी विद्यमान ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियन शाखोबिदिन झोईरोव्हविरुद्ध लढत होईल. 2019 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमध्ये देखील हेच दोघे प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत आमनेसामने भिडले आणि त्यावेळी पांघलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी येथे पांघलला असणार आहे.

शिवा थापा पहिला भारतीय मुष्टियोद्धा

शिवा थापा हा या स्पर्धेच्या इतिहासात 5 पदके जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर ठरला. त्याने ताजिकिस्तानचा विद्यमान विजेता उस्मोनोव्हला 4-0 अशा एकतर्फी फरकाने मात दिली. पहिल्या फेरीत संयमावर भर दिल्यानंतर दुसऱया फेरीत त्याने पॉवर पॅक हुक लगावत प्रतिस्पर्ध्याला जेरीस आणले. 27 वर्षीय थापाने 2013 मध्ये सुवर्ण, 2015 मध्ये कांस्य, 2017 मध्ये रौप्य व 2019 मध्ये आणखी एक कांस्य अशा 4 पदकांची यापूर्वी कमाई केली आहे.

संजितचीही आगेकूच

संजीतने 91 किलोग्रॅम वजनगटात उझबेकिस्तानचा मागील आवृत्तीतील रौप्यजेता तुर्सूनोव्हला 5-0 अशा फरकाने नमवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. दुखापतीशी झुंजत असलेल्या विकास कृष्णनला अंतिम फेरीत विद्यमान विजेता, टॉप सिडेड बोबो उस्मान बतुरोव्हविरुद्ध पराभव पत्करावा लागला. ही लढत केवळ एका मिनिटातच थांबवावी लागली. विकासची डोळय़ाची दुखापत चिघळल्याने रेफ्रींना ही लढत थांबवणे भाग होते. अन्य एका लढतीत या स्पर्धेतील पदार्पणवीर व राष्ट्रीय चॅम्पियन वरिंदर सिंगला 60 किलोग्रॅम वजनी गटात इराणच्या डॅनियल शाहबक्षविरुद्ध 2-3 अशा निसटत्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.

महिला गटात मेरी कोम आज सुवर्णपदकासाठी लढणार

आजवर सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली एमसी मेरी कोम 51 किलोग्रॅम वजनगटात आज सुवर्णपदकासाठी कझाकस्तानच्या नेझिमविरुद्ध लढत देईल. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली मेरी कोम सध्या उत्तम बहरात असून उपांत्य फेरीत तिने मंगोलियाच्या लुत्सेखला 4-1 अशा एकतर्फी फरकाने नमवले आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली आणखी एक भारतीय पूजा राणीला उपांत्य फेरीतून पुढे चाल मिळाली असून यामुळे ती देखील सुवर्णपदकाच्या लढतीत आव्हान उभे करेल. पूजा राणी हिची निर्णायक लढत उझबेकिस्तानच्या मोव्हलोनोव्हाविरुद्ध होणार आहे. 81 किलोवरील गटात अनुपमा व 64 किलोग्रॅम वजनगटातील लालबुत्सही यांच्यासमोर अंतिम लढतीत कडवे आव्हान असणार आहे.

Related Stories

फुटबॉलपटू रॉस्सीला शेवटचा निरोप

Patil_p

चेल्सीचे मॅनेजर लॅम्पार्ड यांची हकालपट्टी

Patil_p

स्पेनच्या अल्बर्टो लोपेझला ‘क्लायम्बिंग’चे गोल्ड

Patil_p

तीन वेळा आत्महत्येचा विचार केला होता – मोहम्मद शमी

Patil_p

शरीरसौष्ठव संघटनेत प्रथमच महिला सचिव

Omkar B

श्रीकांत, ध्रृव-सिक्की, प्रणॉय पुढील फेरीत

Patil_p
error: Content is protected !!