तरुण भारत

पैशांची मागणी हे हताशपणाचे प्रदर्शन : ढवळीकर

जीएसटी काऊन्सिलवरून माविन गुदिन्होंना हटविण्याची मागणी

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

जीएसटी परिषदेकडे नुकसानभरपाईची मागणी करून गोव्यासंबंधी हताशपणाचे प्रदर्शन मांडणारे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना जीएसटी काऊन्सिलवरून त्वरित हटवावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

तामिळनाडूचे अर्थमंत्री पलानीवेल थियागाराजन आणि श्री. गुदिन्हो यांच्यात दि. 28 मे रोजी राज्यांना नुकसानभरपाई देण्याच्या मुद्दय़ावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्री. ढवळीकर यांनी ही मागणी केली आहे. खरेतर राज्याचे अर्थमंत्री या नात्याने जीएसटी काऊन्सिलचे प्रतिनिधीत्व स्वतः मुख्यमंत्र्यांनी करावयाचे असते. परंतु माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत त्यांच्या आजारपणामुळे जीएसटी काऊन्सिलवर गुदिन्हो यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून तेच परिषदेवर गोव्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत, असे ढवळीकर यांनी म्हटले आहे.

दि. 30 मे रोजी गोव्याने आपला घटकराज्यदिन साजरा केला. त्या दिवसाचे औचित्य साधून प्रसिद्ध केलेल्या लेखातून राज्याची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु त्याच्या दोन दिवस अगोदरच गुदिन्हो यांनी जीएसटी परिषदेत राज्य आर्थिक संकटातून जात असल्याचे म्हटले होते. अशा परिस्थितीत राज्याला आर्थिक संकटावर मात करता यावी यासाठी जीएसटी परिषदेने नुकसान भरपाई जाहीर करावी, असे आवाहन गुदिन्हो यांनी केले होते.

याच मुद्यावरून मंत्री थियागाराजन आणि गुदिन्हो यांच्यात शाब्दिक वाद झडला होता. एका बाजूने राज्य सरकार आपल्या ढासळणाऱया आर्थिक स्थितीवर पांघरूण घालण्याचे प्रयत्न करत आहे, तर दुसऱया बाजूने गुदिन्हो यांनी नुकसानभरपाईची मागणी केल्यामुळे गोव्यासंबंधी हताशपणाचे चित्र निर्माण झाले होते, अशी टीका ढवळीकर यांनी केली आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारत असेल तर भरपाई  लवकर देण्याची मागणी का करावी लागते?, असा सवाल उपस्थित करतानाच आता मुख्यमंत्र्यांनीच जीएसटी परिषदेवर राज्याचे प्रतिनिधीत्व करावे, अशी मागणीही ढवळीकर यांनी केली आहे.

Related Stories

सांगे, केपे तालुक्यांतील परीक्षा केंद्रांना भेटी

Amit Kulkarni

रमाकांत खलप अमृतमहोत्सवी गौरव ग्रंथाचे पुणे येथे प्रकाशन

Amit Kulkarni

गजानन देसाई यांच्या ‘ओरबिन’ कादंबरीला पुरस्कार

Amit Kulkarni

‘संकेतस्थळांकडे लक्ष देण्याचे काम मुख्यमंत्री, मुख्य सचिवांचे नव्हे’

Patil_p

मडगावातील घाऊक मासळी बाजार उद्यापासून पुन्हा खुला

Omkar B

गुरुवारी तब्बल 95 बाधित, 64 जण मुक्त

Patil_p
error: Content is protected !!