तरुण भारत

सिव्हिल हॉस्पिटलमधील 30 व्हेंटिलेटर वापराविना?

बहुतेक तालुका इस्पितळातही अडगळीत : बिम्स प्रशासनाच्या नियोजनाअभावी गरीब रुग्णांना फटका

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तमरीत्या रुग्णसेवा झाली होती. अनेक तक्रारी होत्या. तरीही काहीअंशी बाधितांची सेवा करण्यात बिम्स प्रशासन आघाडीवर होते. दुसऱया लाटेचा सामना करताना योग्य नियोजन व समन्वयाचा अभाव, मनमानी आदी कारणांमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात बिम्स बदनाम झाले आहे. आता तर सुमारे 30 व्हेंटिलेटर वापराविना अडगळीत पडल्याची माहिती हाती आली आहे.

गेल्या आठवडय़ात उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बिम्सला भेट देऊन तेथील परिस्थिती व व्यवस्थेची पाहणी केली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी व्हेंटिलेटर संबंधीची धक्कादायक माहिती दिली होती. आपण पाहणी केली त्यावेळी 28 ते 30 व्हेंटिलेटरचे पॅकिंगही फोडले नाहीत, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली होती.

कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सामना करताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज अधिक प्रमाणात भासली. ही गरज लक्षात घेऊन सरकारने पुरविलेल्या व रुग्णसेवेसाठी काही दानशूर व्यक्ती व संस्थांनी दिलेले व्हेंटिलेटर कार्यान्वित केले असते तर अनेकांचे जीव वाचविता आले असते. मात्र आपल्या मनमानी कारभारामुळे जे गरज आहे ते करायचे नाही आणि जे नको आहे ते करायचे, या वृत्तीने बिम्सच्या प्रशासकांनी त्याकडे लक्ष पुरविले नाही.

उपमुख्यमंत्र्यांनी या व्हेंटिलेटरचे पॅकिंग का फोडले नाहीत? असा प्रश्न विचारला त्यावेळी आमच्याकडे त्यासाठी आवश्यक डॉक्टर, कर्मचाऱयांची संख्या नाही, अशी उत्तरे देण्यात आली आहेत. खरे तर सध्या परिस्थिती काय आहे, यासंबंधी राज्य सरकारशी पत्रक्यवहार केला असता तर हे व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी काही तरी मार्ग निघाला
असता.

उपलब्ध माहितीनुसार सुमारे 28 ते 30 व्हेंटिलेटर अडगळीत पडले आहेत. राज्य सरकारने गेल्यावषी तालुका इस्पितळांसाठीही व्हेंटिलेटर खरेदी केले होते. 100 बेडच्या इस्पितळांसाठी पाच व 50 बेडच्या इस्पितळांसाठी दोन व्हेंटिलेटर पुरविण्यात आले आहेत. अनेक तालुका इस्पितळांत तांत्रिक कर्मचारी व डॉक्टरांविना ते धूळखात पडून आहेत.

सरकारी इस्पितळांसाठी व्हेंटिलेटर खरेदी करताना एक मोठी लॉबी सक्रिय असते. नंतरच्या काळात ते चालविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ सरकारी इस्पितळात आहे की नाही, याचा विचारही न करता यंत्रोपकरणे खरेदी केली जातात. अनेक तालुका इस्पितळात फिजिशियन, भूलतज्ञ व व्हेंटिलेटरसाठी आवश्यक टेक्निशियन नसल्यामुळे ती अडगळीत पडली आहेत.

कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सामना करताना कोरोनाबाधितांवर उपचारासाठी व्हेंटिलेटरची गरज भासल्यानंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागली. खासगी इस्पितळांतील वारेमाप बिलांमुळे आर्थिक गणितही कोलमडले. सिव्हिल हॉस्पिटलसह सरकारी इस्पितळांत असलेली सर्व व्हेंटिलेटर सुस्थितीत असती तर अनेकांचे जीव वाचविता आले असते. मात्र बिम्समधील अधिकाऱयांच्या मनमानीमुळे अनेक व्हेंटिलेटर धूळखात पडून आहेत. 

कोरोनाबाधितांसाठी 30 व्हेंटिलेटर सक्रिय

 या वृत्ताची खातरजमा करण्यासाठी ‘तरुण भारत’ने बिम्सचे सध्याचे वैद्यकीय संचालक डॉ. उमेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता कोरोनाबाधितांसाठी 30 व्हेंटिलेटर सक्रिय आहेत. प्रसूती विभाग व वेगवेगळे वॉर्ड, ऑपरेशन थिएटरमध्ये स्टॅण्डबाय ठेवण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

बेळगाव जिल्हय़ात साडेतीन हजार अहवाल निगेटिव्ह

Rohan_P

सुरळीत बस सोडण्याच्या मागणीसाठी हंगरगे-मंडोळी ग्रामस्थांचे निवेदन

Amit Kulkarni

गतमहिन्यात 1930 जणांनी उडविला लग्नाचा बार

Amit Kulkarni

भरधाव डंपरने 30 बकरी चिरडली

Amit Kulkarni

जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयात आढळला साप

Omkar B

बेळगावची सुकन्या बनली स्वित्झर्लंडमध्ये ‘कोरोना योद्धा’

Patil_p
error: Content is protected !!